सावध ऐका पुढल्या हाका

          कोकणात सध्या आंबा, काजू, करंवद, जांभूळ अशा कोकणी मेव्याचा हंगाम आहे. हा कोकणी मेवा घेण्यासाठी स्थानिकांसह चाकरमानी बाजारपेठेत गर्दी करीत असतात. यातील फळांचा राजा असलेला आंबा हे पिक याठिकाणी मुबलक प्रमाणात घेतले जाते. कोकणच्या अर्थव्यवस्थेत निर्यात होणा­या आंब्याचा वाटा अधिक मोलाचा आहे. काही लाख मॅट्रिक टन हापूस आंबा अमेरिका, जपान दुबईच्या जागतिक बाजारपेठेत निर्यात होतो. कोकणातील विविध प्रकल्पातून पर्यावरणात मिसळणारा केमिकल युक्त धुराचा आंब्याच्या दर्जावर परिणाम होत असतो, पर्यावरणातील प्रदूषणाचा आंब्याच्या क्वालिटीवर होत असलेल्या परिणामाचे कारण पुढे करत काही वर्षांपूर्वीच जपानने हापूस आंब्याला बाजारपेठ नाकारल्याची बातमी होती, ही आंबा उत्पादकांसाठी एकप्रकारे धोक्याची घंटाच होती आणि आहेही. यावर्षी तर बदलत्या हवामानाचा फटका या पिकाला बसला आहे. परिणामी फळांचा राजा रुसल्याने यंदा पिकाचे प्रमाण कमी झाले आहे. आंब्याच्या हंगामामध्ये साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहुर्त म्हणजेच गुढीपाडवा येतो. हा मुहूर्त शुभ असल्याने या दिवशी आंबा काढणी, काढलेला आंब्याची निर्यात करणे आदींना प्रारंभ केला जातो. यावर्ष मात्र, आंबा पिकच कमी असल्याने वरील सर्व प्रक्रिया मंदावली.     

      कोकणातील लोकांनी आपापल्या जमिनीत पुष्कळ अशी आंबा व काजू यांची झाडे लावून उत्पन्न घेतले आहे. यातून बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. हंगामानंतर नविन बागा कराराने घेणे, जुन्या-नव्या बागांमध्ये साफसफाई करणे, झाडांना खते घालणे अशी कामे सुरू असतात. परंतु, फळ लागवडीचे दिवस हे बागायतदारांच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे असतात. यासाठी दिवाळीनंतर रात्रंदिवस बागांमध्ये कामाची रेलचेल सुरू होते. झाडांवर औषधे मारणे, मोहरापासून निर्माण झालेले आंब्याचे फळ विक्री होईपर्यंत बागायतदारांची धावपळ असते. त्याच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नातून बागायतदार खते-औषधे, कामगारांची मजुरी आणि इतर खर्च भागवून राहिलेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह करीत असतो. असा हा आपल्या गावातच वित्तपुरवठा निर्माण करणारा व्यवसाय यंदा धोक्यात आला आहे. बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसला आहे. मोहोर यायच्या वेळेला अवकाळी पावसाने पालवी फुटली. त्यानंतर वाढलेला उष्माघात यामुळे पिकाचे नुकसान झाले. या पिकाचा हंगाम अर्धा झाला तरी ब­याच ठिकाणी मोहोर करपलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. तर मोहोर फुललेल्या झाडांवरुन फळगळती होण्याचेही प्रमाण आहे. आंबा-काजू बागांमध्ये लागणारे वणवे हे हाताशी आलेल्या पिकाची राख करते. गेल्यावर्षीपासून या बदलत्या हवामानामुळे फळमाशीचा उपद्रव वाढत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचा सूर दिसून येत आहे.

   आंबा निर्यातीसाठी स्थानिक लोकांनी ट्रान्सपोर्टची व्यवस्था सुरू केली. काहींनी आपापल्या गाड्याही घेतल्या. चांगले उत्पादन येण्यासाठी बागायतदारांनी खत, औषधे यासाठी बराच पैसा गुंतवला आहे. परंतु, पिकच कमी आल्याने गुंतवलेला पैसा कसा उभा करायचा, देणी कशी भागवायची, कामगारांचा पगार कसा द्यायचा या विवंचनेत बागायतदार आहेत. निर्यातीसाठी लागणा­या गाड्यांची रेलचेल मंदावली.

      विजेचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने कोकणपट्ट्यात औष्णिक प्रकल्पांची जणू माळच जुंपली आहे. जयगड, पावसमधील औष्णिक प्रकल्पांमुळे फक्त रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर एकंदरीत सिंधुदुर्गासहित कोकणपट्ट्यातील उष्णता प्रचंड वाढली आहे. याचाही फटका आंब्याच्या पिकाला बसतोय. औष्णिक प्रकल्प हे तर कोळसा, तेल, वायू इत्यादी जेवढी वीज निर्माण करतात. त्याच्या साधारणपणे दुप्पटउष्णता निर्माण करतात तर अणू प्रकल्प तिप्पट उष्णता निर्माण करतात. म्हणजे एखादा अणुऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग, रत्नागिरी पट्ट्यात जर कार्यान्वित झाला तर तीस हजार मेगावॅट उष्णता कोकणच्या पर्यावरणात उत्सर्जित होईल. एवढी उष्णता समाविष्ट करून घेतल्यानंतर आजूबाजूच्या परिसराचे तापमान किमान पाच ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. एवढ्या उच्च तापमानात आंब्याचे पीक येऊ शकते का? हा प्रश्न आंबा बागायतदार आणि स्वतःला अथवा त्या क्षेत्रातील कोणत्याही तज्ज्ञाला विचारून पाहिला तर आंब्याचे भवितव्य किती कठीण आहे हे लक्षात येईल आणि अगदी एवढ्या उच्च तापमानातही आंब्याचे पीक आले तर त्यापुढील धोका संभवतो, तो अणू प्रकल्पातून होणा­या किरणोत्साराचा!

      काही वर्षांपूर्वी कोंबड्यांना झालेल्या बर्ड फ्ल्यूरोग आपल्याला ऐकून माहिती असेलच. त्यावेळी तो रोग देशातील सर्वच कोंबड्यांना झाला नव्हता, फक्त काही भागातील काहीच कोंबड्या बाधित होत्या आणि त्या रोगाला बळी पडल्या होत्या. तरी देखील जीवाला धोका नको म्हणून संपूर्ण देशभर लोकांनी कोंबड्या खाण्याचे सोडून दिले होते. त्यामुळे पोल्ट्रीधारक कंगाल झाले. परंतु सुदैवाने तो रोग संपुष्टात आल्यावर लगेचच पोल्ट्रीचा व्यवसाय पूर्व पदावर आल्याने ते बरबादी पासून वाचले. उद्या हापूस आंबा किरणोत्साराने बाधित झाला तर आंबा उत्पादकांची हालत याच पोल्ट्रीधारकांप्रमाणे होईल. पण दुर्दैवाने किरणोत्साराचा हा राक्षस एखाद्या रोगासारखा ठराविक काळापुरता मर्यादित नसून कायमस्वरूपी टिकत असल्याने कोकणातील हापूस आंब्याचा व्यवसाय मात्र कायमस्वरूपी संपुष्टात येऊ शकतो. आंबा उत्पादकांजवळ उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपू शकते.

      कोकण जसा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे तसाच कधीकाळी फ्रान्स देश द्राक्षांच्या वाईनसाठी प्रसिद्ध होता. पण अणू प्रकल्पांनी फ्रान्सची वाईन किरणोत्सार बाधित करून तिला जगात बदनाम केले. अगदी तारापूर अणू प्रकल्पा लगतच्या बागायतदारांच्या समस्या अनाकलनिय आहेत. अणू प्रकल्पांमुळे चिकूच्या फळांचा आकार लहान झालाय आणि तेथे उत्पादनही घटले आहे. तिथल्या झाडावरील चिकू कापून बघितला तर आज बी जवळ हमखास कीड आढळते. नारळाच्या देठाजवळचा भाग किडीमुळे सडल्याने ते आपोआप खाली पडतात. हे सगळे तारापूर प्रकल्पामुळे झालेल्या स्थानिक उष्णता वाढीचे परिणाम आहेत. विकासाच्या नावाने चाललेले मानवनिर्मित काही हट्टकदाचित पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी आपल्याला कोकणचा हापूस आंबा शिल्लक असेल का अशी शंका मनात येते. म्हणूनच निसर्गाच्या या सावध हाकाअभ्यासून आपले पाऊल योग्य दिशेने पडले पाहिजे तरच आंब्याचा रसाळ मधुर स्वाद आपण घेऊ शकू आणि आपल्या पुढील पिढीला दाखवू शकू.

 

Leave a Reply

Close Menu