एकच जिद्द…!

            गेली पाच वर्षे ‘नाणार की जाणार’ अशी चर्चा करता करता बारसुमध्ये होऊ घातलेली भलीमोठी रिफायनरी आता जीवन मरणाच्या (कोणाच्यातरी जीवनाच्या आणि कोणाच्यातरी मरणाच्या) उंबरठ्यावर येऊन ठेपलीय. “अभी नहीं तो कभी नहीं“ असा संघर्ष सुरु झालाय. त्यापलीकडे एक मोठा संघर्ष होतोय तो समर्थक आणि विरोधक आणि त्यांचे मुद्दे. मग एक निष्ठावंत गाववाला म्हणून मला श्री देव रामेश्‍वराने दिलेली ही सुबुद्धी. स्वतःची मतं मांडण्याची. तेव्हा सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो, जेणेकरून पुढे काही संभ्रम व्हायला नकोय. “रिफायनरी ही कुणाचीही गरज असूद्यात. ती कोकणात नकोच.“

      थोडंसं मागे जाऊया- एवढं मागे की अशा प्रकल्पामुळे तुम्हाला रोजगार मिळेल असं एक नागडं आश्‍वासन मिळालेल्या रेडी या आपल्या वेंगुर्ल्यातील गावाला. डंपर-टिप्पर हा शास्वत रोजगार असेल तर रेडीच्या मायनिंगने तो दिलाय. फक्त आपलं थोडंसं नुकसान केलंय. अर्थात पैसे हवे तर कुणीतरी बलिदान दिलंच पाहिजे की नको? काय गेलंय आपल्या बापाचं यात? पण खराच निपचित पडलेला बाप बघायचा असेल तर रेडीचा समुद्र बघा. खाणीचे उभे खड्डे बघा.लाल झाडं बघा, धुळ उडवत अजूनही जाणारे डम्पर बघा.. आता यामुळे रोजगारासाठी रेडीचा युवक गाव सोडून मुंबई – पुणे – गोव्याला जातो की नाही हे किमान त्या गावच्या समर्थक मंडळीनी जगाला ओरडून सांगावे. आज ती पर्यावरणीय समृद्धी टिकली असती तर वेंगुर्ला – शिरोडाच्या आधी रेडीचं नाव देशाच्या पर्यटन नकाशावर आलं असतं. आहे का नाही मान्य?

      बलिदान क्रमांक दोन- आमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्राथमिक वर्ग देवगडच्या गोगटे विद्यालयात होता. साधारण 2009 चा मे महिना असेल. दोडामार्गच्या बाल स्वयंसेवक मंडळींना थोडंसं अनाथ वाटत होतं, कारण काय असेल तर त्यांचे शिक्षक तुरुंगात होते. खुनाच्या गुन्ह्यात. काय असेल गुन्हा? कळणे मायनिंगचे आंदोलन. त्यात मारहाणीत दुर्दैवाने झालेला एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू! कशासाठी होता हा संघर्ष? तो सुद्धा एका स्वयंसेवकाचा? पर्यावरणासाठी? त्यानंतर मायनिंगवाले, समर्थक आणि राजकीय दलाल (जसे आज सोशल मीडियावर रिफायनरीची वकिली करतात) ते बॅकफुटवर गेले. पण ती माघार संपूर्ण कळणे गाववार झडप घालणाऱ्या लांडग्याची पूर्व तयारी होती हे कळायला आपल्याला 2020-21 वर्ष उजाडावे लागले. अख्खा डोंगर पाताळात गेलेला. गाव संपलं, कारण काय असेल? तेच नागडं आश्‍वासन रोजगार. कंपनीने डम्पर-टिप्पर देऊन रोजगार दिला म्हणे. कळणे गावचा हा विनाशाकडचा प्रवास विरोध ते ग्रामस्थाना विचारात घेऊन ते जनसुनावणी ते मान्यता अशा गोंडस मार्गाने झालाय.

      झोपलेला राक्षस क्रमांक तीन आणि चार- असाच शिस्तबद्ध विरोध धाकोरा – सावंतवाडी येथे होऊ घातलेला औष्णिक विद्युत प्रकल्प आणि मठ – वेंगुर्ला येथील सिलिका मायनिंगने अनुभवला. येथे फक्त कालचे मरण टळलेय, पुढे काय वाढून ठेवलंय हे परमेश्‍वरालाच माहिती. यामधून सुद्धा रोजगार आणि देशाचं भलं निसर्ग संपन्न कोकणाच्या मरणातून साधायचं असा उदात्त विचार न जाणो कोणी देशभक्त दलाल करत असावा.

      मागच्या दरवाज्यातून झालेला विकास क्रमांक पाच- जैतापूर अणू-विद्युत प्रकल्प. काही वर्षांपूर्वी फ्रान्सच्या अरेवा या कंपनीच्या माध्यमातून होणारा जगातील सर्वात मोठा अणूऊर्जा प्रकल्प जैतापूर च्या सड्यावर निश्‍चित केला गेला.आंदोलने झाली. जनसुनावण्या झाल्या. कदाचित गोळीबार पण झाला होता. एका आंदोलकाचा मृत्यू झाला. वाटलं थांबेल हे. कारण सरकार बदललं. पण दलाल तेच होते. ग्रामस्थांच्या विचारानेच होईल. म्हणेपर्यंत आज त्या मोठाल्या भिंती आड काय चाललंय ते तो अरेवाच जाणो. सांगण्याचे तात्पर्य, आम्हाला काय हवंय हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. ते ठरवणार  दिल्ली. दिल्लीचे लाळघोटे राजकीय समर्थक, विरोध केला की तुम्ही सरसकट एकतर कम्युनिस्ट असता किंवा  देशद्रोही. बाकी तिसरा पर्याय उपलब्ध ठेवलाच जात नाहीये. आता जैतापूर किती लाख रोजगार देते याची मोजदाद करेपर्यत कदाचित आपली पिढी म्हातारी झालेली असेल.

      राजकीय महत्वाकांक्षा आणि चिखलफेक – आज महाराष्ट्राचे नवीन जाणते राजे काहीही झालं तरी रिफायनरी होणारच असं बोलून गेले. एक नाही कदाचित चार-पाच वेळा बोललेत. त्याला दाढी खाजवणारे होयबा, ग्रामस्थांची मते विचारात घेऊन वैगेरे तेच कळणेच्या मायनिंगच्या लाल पाण्यात वाहून गेलेलं आश्‍वासन देऊन मोकळे झालेत.  यातच दुसरा एपिसोड गुपचूप सुरु झालाय. म्हणे पूर्वीच्या मुख्यमंत्री महोदयांनी हे नाव सुचवलं होतं. देशाची फाळणी करायचा अधिकार गांधी-नेहरूना कोणी दिला असा विचार जी मातृसंस्था मानते आणि अखंड भारताचे स्वप्न पाहते त्यांच्या नव्याने झालेल्या पायिकांनी असले बिनडोक पर्याय देणे बंद करावेत आणि तथ्यावर बोलावे. कोणी काही सुचवलं म्हणून आमच्या भविष्याचा निर्णय घेणारे तुम्ही कोण? पाच वर्षाची कारकीर्द तुमची आमच्या पिढ्या का नासवताय?

      अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले युट्युबर आणि ब्लॉगर्स आणि समस्त व्हर्रच्युअल विचारवंत- आज फेसबुक किंवा व्हाट्सअप उघडलं असता कोकणवासीय कसे मूर्ख, यांना रोजगार कसा नकोय, पर्यावरण वैगरे काही बिघडणार नाहीय, आळशी कोकणी माणूस, जो इतरांना फक्त नावं ठेवणारा असे एक ना अनेक आरोप चालू झालेत. यात एका राजकीय पक्षाचे  आयटी सेल वाले खूप आघाडीवर असताना दिसतात. मग ते पगारी असोत वा बिनपगारी. यात आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय तो स्वतःला तथाकथित कोकणची मुलगी म्हणवणारी एक सोशल मीडियावर या रिफायनरीचे हास्यास्पद समर्थक करताना दिसली. बाईने संपूर्ण माहुल चा रिफायनरी परिसर शुद्ध हवा भरत भरत फिरवून आणला. ते बघून अशा छोट्या मोठ्या रिफायनऱ्या गावा गावात उभारून रोजगार निर्माण करते की काय अशी शंका वाटली. त्यातच म्हणे वेंगुर्ला वाले आपले हापूस देवगडच्या बॉक्स मध्ये भरून लोकांची फसवणून करतात वैगरे बोलून ‘वडाची साल पिंपळाक’ केली. असो, यशाची हवा डोक्यात भरली की होतं असं कधी कधी, फुटेल कधीतरी हा रिफायनरी समर्थक फुगा. आपलं अर्ध आयुष्य मुंबई-पुण्याच्या पाचशे चौरस फुटाच्या घरात काढणारे आणि बाल्कनीतल्या कुंड्याना सुद्धा पेलाभर पाणी घालू न शकणारे हे विचारवंत पर्यावरण या विषयावर कोकणी माणसाला ज्ञान देणार. अरे घराचं कुंपण सुद्धा फुलझाडांनी सजवणारी आमची संस्कृती तुमचे वांझोटे सल्ले ऐकण्याएवढी रसातळाला अजून तरी गेलेली नाहीये. या सगळ्यात कहर केलाय तो अंबानीच्या जामनगरच्या आंब्यांनी. त्या बिचाऱ्या अंबानीला सुद्धा कल्पना नसेल की त्याच्या केसर आंब्याची आढी एवढ्या मोठ्या प्रमाणात लावली गेलीय. गावी गेल्यावर एक आंबा विकत घेऊन खाण्याची लायकी नसणारे आणि आमच्याकडे अडीचशेला हापूस मिळतो म्हणणाऱ्यांनी पुढील वर्षांपासून थेट अँटीलियाला संपर्क करून अंबानी साहेबांचे आंबे खावेत, एक्स्पोर्ट न होता देशातल्या देशात पैसा खेळता राहील. (आजकाल देश मध्ये आणल्याशिवाय कोणाला विश्‍वासच वाटत नाही, म्हणून नाईलाजाने देशाचा उल्लेख केलाय.)

* कोकणाला हवयं काय? अर्थात यासाठी वेगळा लेख लिहावा लागेल.

* मात्र सर्वात समान धागा असेल तो म्हणजे एक ‘प्रामाणिक राजकीय नेतृत्व’. स्वतःची राजकीय आणि आर्थिक सोय न करता केवळ कोकणाचं कोकणपण जपणारे.

* ज्या कोकणरेल्वे साठी ज्यांनी कोणताही विरोध न करता वडिलोपार्जित जमिनी देणाऱ्या कोकणाला बावीस पंचवीस वर्षात मिळायल काय? तर एकदोन फुटकळ गाड्या, संडासाच्या बाजूला बसून गर्दीत प्रवास करण्याचे सौभाग्य. यावर ‘कोकणासाठी चार नवीन गाड्या सुरु करणारच’ म्हणणारा नेता नाही लाभला अजून. आणि भेटेलच कसा? त्यातून दिल्ली दरबारी थोडेच वजन वाढेल त्याचं, किंवा काही मलिदा मिळेल तो सुद्धा थेट अरबास्थानातून.

* ‘मुंबई ते पत्रादेवी पर्यत रस्त्याचे चौपादरीकरण’ करण्यासाठी नितीन गडकरीना दहा वेळा दौरे आणि पंधरा वेळा धमक्या द्याव्या लागत असतील, तर तुम्ही रे षंढानो काय कामाचे? तुमचा जन्म केवळ टोल नाक्याची कंत्राटे आणि मोक्याच्या जमिनीवर कब्जे करून आपले चिल्ले चपाटे पोसायला झालाय का? त्यावेळी तुमचे समर्थन आणि समर्थक कोणत्या बिळात जाऊन लपतात?

*  ‘पर्यटनाला आधार’ आज सिआरझेड च्या जाचक अटीपासून सर्वसामान्य कोकणी माणसाची मुक्तता करा, कायमस्वरूपी विजेची सोय करा, वाडी वस्त्यापर्यंत रस्ते बनवा बस्स. बाकी संपूर्ण पर्यटन व्यवसाय कसा वाढवायचा यासाठी ना कोणतं मंत्रालय हवंय की कोणतीही सबसिडी. तथाकथित आळशी कोकणी माणूस स्वतःच भलं करायला समर्थ आहे. आहे का तयारी यासाठीच्या समर्थनाची? की स्वतःची हॉटेल्स बनेपर्यत असचं नागवलं जाणार आम्हाला?

* कोकणातील ‘शेत आणि मत्स्य उत्पदनांवर आधारित प्रक्रिया उद्योग’ आज केवळ काजू वगळता कोणतेही मोठे प्रक्रिया उद्योग कोकणात नाहीत. जे आहेत ते प्रत्येकाने आपल्या हिमतीवर उभे करून मोठे केलेत. शासन म्हणून आणि राज्यकर्ते म्हणून तुमचा सहभाग शून्य याची जाणीव प्रत्येक समर्थक मंडळींना असूद्यात. आज आंबा, फणस, नारळ, मासे, कोकम, जांभूळ, करवंद यांना कोणीही वाली नाहीये हे सत्य आहे. पस्तीस रुपयाला विकला जाणारा नारळ कधी दहा रुपयाला सुद्धा विकला जाईल याचा नेम नाही. हीच परिस्थिती कमी अधिक प्रत्येक उत्पादनाची.  आज कुडाळ सारखा एम.आय.डी.सी. उजाड आणि भकास आहे. ना स्थानिकांना त्यात प्रवेश दिला जातो ना प्रोत्साहन. नाही म्हणायला परप्रांतीय मंडळींनी कसं कोणजाणो त्यावर बस्तान बसवायला सुरुवात केलीय किंवा बंगले तरी बांधलेत. तर, संपूर्ण जिल्ह्याला रोजगार देण्याची क्षमता या जागेत निश्‍चित आहेत. हीच परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्याचीही असेल यात तिळमात्र शंका नाही.

* कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात एक सुसज्ज हॉस्पिटल आणि एज्युकेशन हब बनवायला कोणाचं घोडं कुठं पेंड खातंय तेच मुळात कळेना. एका महाविद्यालयावर कित्येक रोजगार निर्माण होतात हे निखळ सत्य आहेत.

      एवढं सगळं असल्यावर रिफायनरी ही केवळ लाख रोजगार देणार असेल तर वर नमूद इतर मार्गातून कमीतकमी दोन लाख रोजगार देण्याची या परशुराम भूमीची क्षमता आहे. केलाय कधी विचार?

      आज रिफायनरी हे निमित्त आहेत, आज बारसु जात्यात असेल तर संपूर्ण कोकण सुपात आहे. पैशाच्या बळावर पोसल्या गेलेल्या व्यवस्थेच्या मुठीत येऊन आपण कधी भरडले जाऊ याचा नेम नाही.

      आज गरज आहेत प्रत्येक कोकणी माणसाने आणि जगाच्या पाठीवर राहणाऱ्या प्रत्येक कोकणी मनाने बारसुची साथ देण्याची. प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून पुढे येण्याची गरज आहे. कदाचित आपली पिढी यातून सहिसलामत निसटून जाईल, मात्र येणाऱ्या पिढ्या याचा त्रास भोगतील. “माझ्या बापाशीन आणि आज्यान त्यावेळी विरोध केलो असतो तर आज आपण असे मेलो नसतो“  असे शाप इसवी सन 3000 मध्ये पुढील पिढ्यांकडून ऐकायचे नसतील तर आजच एकत्र येण्याची गरज आहे. पन्नास शंभर वर्षानंतर याच कोकणी निसर्गात पोसलेल्या केळीच्या पानात वाढलेल्या “वडे-उसळ आणि डाळ भाताच्या पिंडाक कावळ्यान उष्टावक होया“… बाकी आपला आपलं रक्षण करण्यासाठी श्री देव रामेश्‍वर आणि रवळनाथ समर्थ आहेत.

– समीर मधुसूदन घोंगे, उभादांडा – वेंगुर्ला, 9960036174

Leave a Reply

Close Menu