वेंगुर्ला तहसिल कार्यालय व वेंगुर्ला पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तहसिल कार्यालयाच्या सभागृहात शासन आपल्या दारी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार ओंकार ओतारी, नायब तहसिलदार संदिप पानमंद, गटविकास अधिकारी मोहन भोई, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, पशुधन विकास अधिकारी विद्यानंद देसाई, एकत्मिक बालविकास अधिकारी सामंत, भाजपाचे सुहास गवंडळकर, शिवसेनेचे नितीन मांजरेकर उपस्थित होते.
‘शासन आपल्यादारी‘ अभियानात वेंगुर्ला तालुक्यात दिलेल्या उद्दिष्ठांपेक्षा जास्त काम झाल्याने सर्व प्रशासकीय अधिकारी आणि लाभार्थी यांचे कौतुक आहे. लोककल्याण हे ध्येय उराशी बाळगून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनांचा लाभ देता यावा या उद्देशाने आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी शासन आपल्यादारी अभियान शासनातर्फे राबविण्यात येत आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी पानवेकर यांनी केले.
वेंगुर्ला तालुक्यासाठी विविध विभागातील १० हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ठ देण्यात आले होते. मात्र, तालुक्यातील सर्व कार्यालयीन प्रमुखांनी उत्कृष्ठ काम केल्याने अभियान कालावधीत एकूण १२ हजार २६६ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्यातील ५११ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. तर उर्वरित ५७५५ तर लाभार्थी प्रस्तावित आहेत. या कार्यक्रमात माझी कन्या भाग्यलक्ष्मी, महात्मा गांधी सिचन विहिर योजना, गुरांसाठी गोठा बांधणे वगैरे विविध योजनांमधील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.