दाभोलीचा सुपुत्र वसंत दाभोलकर यू.पी.एस.सी. परीक्षेत देशात 76 वा

वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावचा सुपुत्र वसंत प्रसाद दाभोलकर याने यू.पी.एस.सी.परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले असून संपूर्ण देशातून चक्क 76वी रँक पटकावत अखित भारतीय स्तरावर सिंधुदुर्गात टॅलेंटचा झेंडा रोवला आहे. वसंत दाभोलकर याचे प्राथमिक शिक्षण दाभोली शाळा नं.1 मध्ये झाले. त्यानंतर वेंगुर्ला हायस्कूलमधून त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. तर रत्नागिरीच्या फिनोलेक्समधून इंजिनिअरिंग पदवी मिळविली. या ग्रामीण भागातील सुपुत्राने दुसऱ्या प्रयत्नात हे प्रचंड यश मिळवले आहे. त्याची ही रँक पाहता तो आता आय.ए.एस. अधिकारी होणार हे निश्‍चित आहे.

      वेंगुर्ला एसटी डेपोमध्ये क्लार्क या पदावर त्याचे वडील नोकरीला होते. सुरुवातीपासून हुशार असलेल्या वसंत याने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये स्कॉलरशिप मिळविली. समाजातील बहुतांशी मुले कठिण परीक्षा देत नाहीत. म्हणून आपल्याला काहीतरी वेगळे करुन दाखवायचं होतं. समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करायचे होते. म्हणून यू.पी.एस.सी.सारख क्षेत्र निवडले. यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक मदतीची भरपूर गरज होती. यासाठी आपण स्वत: मुलांचे क्लास घेतले आणि त्यातून मिळालेल्या पैशाचा वापर मी माझ्या पुढील शिक्षणासाठी वापरला. यासोबतच आपल्याला विविध स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक मदतही उपयोगी पडली. देशाची सेवा करायचे स्वप्न असल्याचे वसंत दाभोलकर याने सांगितले. वसंत दाभोलकर याने जिद्दीने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.   

Leave a Reply

Close Menu