नाही पुस्तक नाही दप्तर…

    कल्पना नवी नाही. तशी जुनीच. पण नवीन शैक्षणिक धोरणात परत नव्याने आलेली- म्हणून जुन्याचाच पुन्हा नव्याने विचार!

      मुलांच्या पाठीवरच्या दप्तराच्या वाढत्या वजनाची चिंता अनेकांनी व्यक्त केली. अनेक शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन मुलांच्या दप्तराचे प्रत्यक्ष वजन करून, मुलांची आरोग्य तपासणी करून अनेकांनी निष्कर्ष मांडले. त्यावर उपायही सुचवले. त्यातून काही पर्यायही समोर आले. काही शाळांनी, शिक्षकांनी त्या पर्यायांचा अभ्यास करून पाहिला. उदा.१) पुस्तकाचे दोन संच. एक शाळेत ठेवायचा आणि एक घरी ठेवायचा. २) शाळेचं दप्तर घरी न नेता शाळेतच ठेवायचे. ३) पुस्तक सुटी करून प्रत्येक विषयाचे तीन- चार धडे / प्रकरणे एकत्र करून एकच पुस्तक बनवायचे वैगेरे. पण हे केवळ काही शाळा आणि शिक्षकांपुरतेच मर्यादित राहिले. व्याप्ती वाढली नाही.

     शैक्षणिक धोरणात एक नवीन विषय सुचवला आहे. बॅगलेस डेअसावा अशी सूचना आहे. केवळ पुस्तकांच्या दप्तराचे ओझे नको इतका मर्यादित अर्थाने ही सूचना नाही. एक दिवस दप्तराचे ओझे नसल्यामुळे ओझ्याच्या संदर्भात काय फरक पडणार? दप्तराचे ओझे आणि दप्तराशिवाय शालेय दिवस या दोन्ही भिन्न संकल्पना आहेत. दोन्ही महत्त्वाच्या आहेत याबद्दल वादच नाही. पण दोन्हीचे हेतू वेगवेगळे आहेत.

      दप्तराविना शालेय दिवस (बॅगलेस डे) चा अर्थ, हेतू आणि क्रियान्वयन समजून घ्यायला हवे. हे समजून घेतले तर शिक्षक आणि शाळांना बॅगलेस डेहे आणखी एक वेगळे ओझे आहे असे वाटणार नाही.

      शिक्षण म्हणजे पुस्तक एके पुस्तक अशी बहुसंख्य बालक- पालक आणि शिक्षकांची समजूत झाली आहे आणि हे पुस्तक तरी कोणते? तर पाठ्यपुस्तक! सर्वजण पाठ्यपुस्तकात इतके अडकून पडलेत की शाळेच्या आणि सार्वजनिक ग्रंथालयातही पुस्तके आहेत हे ब­याच लोकांना माहीतही नसावे. बॅगलेस डेचा अर्थ बालक-पालक-शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातून शिकणे, शिकवणे यातून बाहेर पडणे.

      आज सुरू असलेल्या पारंपरिक पद्धतीने शिकणे आणि शिकवणे सोपे आहे. धडा वाचणे, कठीण शब्दांचे अर्थ सांगणे, काही संकल्पना समजावणे, धड्याखालचे प्रश्न विचारणे- सोडवणे हे सोपे आहे. यापुढे जाऊन काही विद्यार्थी मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवतात. काहीजण शिकवणीला जातात. या सगळ्या ठराविक चाकोरीबद्ध पद्धतीला शिक्षण असे समजले जाते.

    दप्तराविना शालेय दिवस ही ठराविक, चाकोरीबद्ध, पारंपरिक संकल्पना नाही. प्रत्येक शिक्षकाने आपले प्रयोग, पद्धत आपणच राबवायची आहे. शिक्षणखात्याकडून नाही तर मुख्याध्यापकांच्याही आदेशाची वाट न बघता शिक्षकाने स्वतःच्या बुद्धीने, प्रतिभेने, कल्पनेने आपली पद्धत-प्रयोग ठरवायचे आहेत. कधीकधी आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा फायदा, उपयोग करून घेणंही कळत नाही. अशा स्वातंत्र्याची सवयही नसते.

   मी माझ्या विषयात, माझ्या वर्गात हा दिवस कसा उपयोगात आणणार या दिशेने विचारचक्र सुरू केले तर अनेक नवनव्या कल्पना, प्रयोग, योजना डोळ्यासमोर तरळायला लागतील. गरज आहे संकल्पाची, निर्धाराची आणि एक पाऊल पुढे टाकण्याची! हे काही गुंतागुंतीचं रॉकेट सायन्स नाही. ईच्छाशक्तीच हवी. बाकी सगळं देवाने प्रत्येकाला भरभरून दिलेच आहे. त्याचा या जन्मातच उपयोग करायचा आहे. पुढच्या जन्मासाठी साठवून ठेवण्याची गरज नाही.

      प्रत्येक शिक्षक आपल्या कल्पनेने, बुद्धीने आपल्या विषयाला, वर्गाला धरून जसे उपक्रम ठरवेल तसेच संपूर्ण शाळेने मिळून सर्व विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम, प्रयोग ठरवावेत.

      पण हे सगळं करताना परिपूर्ण विचार आणि योजना मात्र हवी. अन्यथा सगळा सावळा गोंधळ होईल. सहकार्य, सामंजस्य, समायोजन नीट असेल तर वेळ, शक्ती, संसाधनांचा अधिकतम उपयोग होईल आणि अपेक्षित परिणाम मिळेल. त्यासाठी उद्देश, पद्धत, नियोजन, क्रियान्वयन आणि मूल्यांकन याचा साकल्याने विचार करावा लागेल.

      केवळ विचारचक्राला दिशा आणि गती मिळण्यासाठी म्हणून दप्तराविना शालेय दिवशी काय करता येईल हे आपण पाहू. परंतु काय करायचे हे बघण्यापूर्वी का करायचे हेही बघू.

१) मुलांच्या मनातील भिती घालवणे – भीती खूप प्रकारची आणि खूप गोष्टींची असते. एकदोन भीतींचा विचार करू. वर्गात मुले प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत? आपले उत्तर चुकले तर? – ही पहिली भीती आणि चुकले तर सगळे हसतील ही दुसरी भीती! या भीतीच्या बेड्यात अडकून पडल्यामुळे मुले पुढे जाऊच शकत नाहीत. ही भीती काढून टाकण्यासाठी उपक्रम करावेत.

२)आत्मविश्वास वाढवणे-प्रत्येकाला सारखे काम देण्याऐवजी त्याच्या क्षमतेनुसार, कुवतीनुसार थोडे व सोपे काम देणे. सुरवातीला एकट्यानेच करण्याऐवजी समूहात करायला लावायचे. आत्मविश्वासाच्या बाबतीत वर्गातील सर्व मुले एकाच समान पातळीवर असणार नाहीत. प्रत्येकाला भरपूर व वारंवार संधी मिळाली तर हळूहळू आत्मविश्वास वाढत जाईल.

३) निरीक्षण क्षमता विकास – सर्वांसमोर पुढे यायला, बोलायला, काही करायला सर्वजण एकदम पुढे येतील असे नाही. पण त्याच्या अगोदरची एक सोपी पायरी म्हणजे निरीक्षणशक्ती! उदा. आपली पेन किवा पेन्सिल हातात पकडून निरीक्षण करा असे सांगता येईल. त्या वस्तूच्या बाबतीत जे जे लक्षात येईल ते नोंदवा. ( नंतर सांगा.) असं साध्या सोप्या वस्तूच्या निरीक्षणापासून प्रारंभ करत काठिण्यपातळी (डीफिकल्टी लेव्हल) वाढवत नेता येईल.

४) प्रश्नकौशल्य विकास – काही विचारायचं आहे का? असा प्रश्न प्रत्येक शिक्षक वर्गात विचारतात. पण बहुसंख्य मुले चुपचाप बसतात. प्रश्न विचारण्याची भीती आणि नेमका काय, कोणता, कसा प्रश्न विचारायचा याबाबतीत गोंधळ असतो. त्यामुळे सगळ्यात सोपे काय?-तर गप्प बसणे. म्हणून प्रारंभी छोटे छोटे विषय देऊन प्रश्न तयार करून फक्त लिहिणे आणि नंतर विचारणे अशा क्रमाने प्रश्नकौशल्य विकास करता येईल.

५) अभिव्यक्ती कौशल्य विकास – बघितलेले, ग्रहण केलेले, अनुभवलेले हे सगळे अभिव्यक्त करता यायला हवे. व्यक्तिमत्त्व विकासात अभिव्यक्ती खूप महत्त्वाची. विविध प्रकारे, विविध माध्यमाद्वारे अभिव्यक्ती होत असते. प्रभावी अभिव्यक्ती ही आजची गरज आहे. त्या दृष्टीने प्रयोग, उपक्रम, कार्यक्रम, गटकार्य, प्रकल्प याची योजना करावी लागेल.

     काय करायचे हे थोडक्यात बघितल्यावर आता काय करता येईल? याची काही उदाहरणे बघू.

   विनादप्तराच्या दिवशी विद्यार्थ्यांना गटा -गटाने सामाजिक विविध क्षेत्रातील मंडळींशी अभिसरणाची संधी मिळावी. विद्यार्थ्यांनी समाजात जावे आणि समाजातील विविध घटकांनी शाळेत विद्यार्थ्यांपर्यंत यावे अशी योजना आखता येईल. उदा. विद्यार्थ्यांनी कारखाने, शेती, बागायती, छोटे उद्योग, बँक, पोस्टऑफिस, विविध कार्यालयांना भेटी द्याव्यात. दुस­या बाजूने या क्षेत्रातील मंडळींना शाळेत बोलावून त्यांच्याशी विद्यार्थ्यांचा वार्तालाप, मुलाखती, चर्चा, संवाद, प्रश्नोत्तरे असे उपक्रम योजता येतील.

      आपल्या शाळांमध्ये वर्षातून एकदा स्नेहसंमेलन होतात. त्यात सर्वच विद्यार्थ्यांचा सहभाग असतोच असे नाही. अनेक शाळांमध्ये तर एक वर्ष स्नेहसंमेलन आणि पुढच्यावर्षी क्रीडामहोत्सव असं आलटून पालटून असतं. दोन महिन्यातून एकदा वर्गशः स्नेहसंमेलन होऊ शकते आणि तेही अभ्यासक्रमावर आधारित! जेणेकरून अवांतर वेळ आणि शक्ती खर्च करावी लागणार नाही. या संमेलनात कोणी विज्ञान प्रयोग करून दाखवेल, कोणी अभ्यासक्रमातील कवितांचे अभिवाचन करेल, कोणी कवितांवर आधारित गायन किवा नृत्य करेल. काही धड्यांवर आधारित नाट्य किवा कथाकथन होऊ शकते. गणितासारख्या विषयावरही काही सादरीकरण होऊ शकेल. कोणी योगासनांचे प्रात्यक्षिक करेल तर कोणी लेझीम, मानवी मनो­यांचे प्रदर्शन करेल. हे सर्व विनाखर्च कसे करायचे, हाताशी उपलब्ध असलेल्या साधनांच्याच मदतीने कसे करायचे याचा विचार केल्यास अनेक कल्पना व मार्ग सापडतील. प्रत्येक विद्यार्थ्यांस अधिकाधिक वेळा सर्वांसमोर उभे राहून काही ना काही सादर करण्याची संधी मिळाली तर हळूहळू भीड, संकोच चेपत जाईल आणि अपेक्षित असलेला आत्मविश्वास व इतर कौशल्ये विकसित होत जातील.

      अनेक शिकलेल्या लोकांकडे व्यवहारज्ञान असतेच असे नाही. दैनंदिन जीवनात अनेक व्यवहार करावे लागतात. त्यात पुस्तकी ज्ञान व पांडित्य नेहमीच चालत नाही. ही व्यवहारकुशलता विकसित करण्यासाठी उपक्रम आखावे लागतील.

      विनादप्तर दिवस फक्त प्राथमिक शाळेपुरता असे समजण्याचे कारण नाही. अगदी महाविद्यालयापर्यंतही उपयुक्त आहे. उपक्रम एकच असला तरी प्राथमिक पासून महाविद्यालयस्तरापर्यंत त्याच उपक्रमाची काठिण्य पातळी सारखी नसेल. ती काठिण्य पातळी वाढत जायला हवी तरच त्याच्यात खरी गंमत येईल. उदा. मुलाखत घेणे. प्राथमिक स्तरावरील मुले शिक्षकांची, शिपायांची, गावातील कारागिरांच्या मुलाखती घेतील. तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अधिक क्लिष्टविषयावरच्या, अधिक जबाबदार व्यक्तिच्या मुलाखती घ्याव्यात.

      शाळेतील मुले शाळेतील स्वच्छतेसंबंधी पाहणी करून त्यावर उपाय शोधतील तर उच्चमाध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी त्यापेक्षा अधिक कठीण विषय घेऊन उपाय शोधतील. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी आपला वर्ग स्वच्छ व सुंदर कसा करता येईल याचा विचार करतील तर महाविद्यालयातील विद्यार्थी तालुका, जिल्हा पातळीवरील प्रश्नांचा मागोवा घेतील. जे पिंडी तेच ब्रह्मांडी

      विनादप्तराचा दिवस हे वरवर ठरवले जाणार नाही, ठरवता कामा नये. लवचिकता हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा, मुक्तपणे काम करण्याचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा.

    लेखाला मर्यादा आहेत पण विचार आणि कामाला मर्यादा नाहीत. आणि हो, ‘बॅगलेस डेम्हणजे दप्तरापासून कायमची मुक्ती नाही बरं का.. त्यामुळे पालकांनी टेन्शन घेऊ नये आणि बालक-शिक्षकांनी सुटलो बुवा असं समजू नये.

दिलीप वसंत बेतकेकर. शिक्षणतज्ज्ञ, गोवा.

Leave a Reply

Close Menu