कवी, लेखकांनी आपले विचारसत्त्व टिकवून ठेवत निर्भयपणे व्यक्त व्हावे

विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशन आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कार वितरण सोहळा वेंगुर्ला नगरवाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अनिल जाधव, डॉ. गोविद काजरेकर, ज्येष्ठ कवी वीरधवल परब, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर, नाथ पै सेवांगणचे अॅड.देवदत्त परुळेकर, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रभाकर जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात जीवनसत्व‘, ‘तूर्तास तरी‘, ‘सूर्योन्मुख शतकांच्या दिशेनेया कवितासंग्रहांचे कवी अनुक्रमे कल्याण श्रावस्ती (सोलापूर)बुद्धभूषण साळवे (नाशिक), सिद्धार्थ तांबे (सिंधुदुर्ग) यांना मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम, शाल, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

        स्वातंत्र्य, समता, विवेकनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, लोकशाही मूल्यव्यवस्था आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासंदर्भात बोलणा­या सगळ्या कवी, लेखक, विचारवंत यांच्यावर प्रस्तापित यंत्रणांच्या दहशतीचा डोळा रोखलेला आहे. समाजाचं पुन्हा एकदा वेगान वर्णवादी अवस्थेत रूपांतरण केलं जाण्याच्या या काळात कवी, लेखकांनी आपली ऊर्जा व विचारसत्त्व टिकवून ठेवत निर्भयपणे व्यक्त होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन डॉ. गोविद काजरेकर यांनी केले.

      कल्पना मलये म्हणाल्या की, धार्मिक प्रतिकांचा मारा करत बहुजन समाजाला पुन्हा एकदा मनुवादी काळात ढकलण्याचे मनसुबे आज सर्वत्र दिसतात. त्याचा सर्वाधिक फटका स्त्रियांना बसण्याची शक्यता आहे. अॅड. देवदत्त परुळेकर, प्रभाकर जाधव, वीरधवल परब व जयप्रकाश चमणकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. सत्काराला उत्तर देत कल्याण श्रावस्ती, बुद्धभूषण साळवे, सिद्धार्थ तांबे यांनी विनोदिनी जाधव फाऊंडेशनने आजवर दिलेल्या काव्य पुरस्काराचे महत्त्व स्पष्ट करून या सन्मानामुळे काव्य लेखनासाठी आपल्याला नव्याने बळ लाभल्याचे स्पष्ट केले. अनिल जाधव म्हणाले की, परिवर्तनाची भूमी व भूमिका अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने गेली ७ वर्षे विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशनतर्फे काव्यपुरस्कार वितरीत केले जात आहेत.

     सूत्रसंचालन राजेश कदम, स्वागत राकेश वराडकर, प्रास्ताविक सुनील जाधव तर आभार विशाखा जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विदिशा जाधव, संचिता जाधव, प्राशिल जाधव यांनी परिश्रम घेतले.

      त्यानंतर कल्पना मलये यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या कवी संमेलनात ज्येष्ठ कवी अरुण नाईक, मोहन कुंभार, डॉ. संजीव लिंगवत, मनीषा जाधव, सरिता पवार, पी.के कुबल, कल्याण श्रावस्ती, सिद्धार्थ तांबे, बुद्धभूषण साळवे, गोविंद काजरेकर, वीरधवल परब यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी गुरुदास मळीक, मोहन जाधव, वैशाली वराडकर, गिल्बर्ट फर्नांडीस, अंकुश तेंडोलकर, प्रज्ञा मातोंडकर, नरेंद्र तांबे, विश्वनाथ कदम, भीमराव जाधव, प्रथमेश मठकर, स्नेहल तांबे, अनंत तोटकेकर, संतोष तांबे, प्रभाकर जाधव, सुगंध तांबे, शंकर जाधव, सलोनी सकपाळ, वैशाली वराडकर यांची उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Close Menu