डोळ्याने बघतो….

  “आई हा बघ पक्षी, इथे लपला आहे म्हणून दिसला नाही“ रत्ना म्हणाली. मी आणि रत्ना चित्रांमधले लपलेले पक्षी त्यांचे सारखेपण वेगळेपण पाहण्याचा खेळ खेळत होतो. रत्ना अगदी निरखून निरखून चित्रामधली रेष न्‌ रेष बघत होती आणि वेगळे काही दिसले की हरवून जात होती. तिच्याशी खेळताना तिच्या निरीक्षण करण्याच्या शक्तीने मी थक्क होत होते!!

      माणसाला काय किंवा प्राण्यांना काय निरीक्षणाचे वरदान मिळाले आहे. पंचेद्रियांमार्फत सृष्टीला जाणण्याची अनुभवण्याची क्षमता खरंच अलौकिक आहे, त्याचाच उपयोग करून आपण आपली समज वाढवतो, आसपास जे दिसतं, ऐकू येतं, वास येतात, स्पर्श जाणवतात, नानाविध चवी कळतात याची बारकाईने नोंद मेंदूत केली जाते, त्यांचा अर्थ लावला जातो आणि त्यानुसार आपल्या क्रिया प्रतिक्रिया दिल्या जातात, असंही मनात आले.

      रत्नाने ते कोडे सोडवून झाल्यावर आम्ही ते सगळे आवरून ठेवले आणि शाळेत गेलो. हो! मी माझ्या मुलीच्याच मॉटेसरी मधे मदत करायला जाते ना! गेल्या गेल्या ‘दिनेश’ ने माझा ताबाच घेतला, “ताई, आपण खेळूया ना, चला” म्हणत मला घसरगुंडीकडे ओढूनच नेले, जीना चढून वर जायचं आणि सर्रकन खाली यायचं, मी त्याचा उत्साह बघत होते. पण दरवेळी जीना चढताना त्याचा पाय हमखास पायरीवर पडायचा नाही, मधेच कुठेतरी जायचा, त्यामुळे सतत त्याच्यामागे मला उभे रहावे लागे. थोड्याच वेळात तो कंटाळला त्याला घेऊन वर्गात जाताना तो उंबऱ्याला अडखळलाच. “किती रे धांदरटपणा करतोस, जरा बघून चाल की!“ मावशी म्हणाल्या. माझ्या मनात आलं की, तो छोट्या छोट्या गोष्टींना धडकतो, दप्तरातल्या पटकन वस्तू त्याला सापडत नाहीत. डावी…. उजवी. यामध्ये त्याचा गोंधळच होतो हे काही बरे नाही.

      सुरुवातीला वाटलं की पळण्याच्या खेळण्याच्या नादात त्याच्या हे लक्षात येत नाहीये, तो बघतच नाही त्यांमुळे धडकतोय!! मग वाटलं की त्याला दिसण्याचीच समस्या आहे बहुतेक! म्हणून त्याच्या आईबाबांना सांगून त्याचे डोळे तपासायला सांगितले, थोड्या दिवसांनी “त्याचे डोळे व्यवस्थित आहेत हो ताई! तो लक्ष देत नाही म्हणूनच धडकतो“ असे सांगत आईबाबा परत आले, मग मात्र माझ्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली.

      मी त्याच्याकडे जरा जास्तच लक्ष देऊ लागले पण त्याचे लक्ष असतानाही तो धडपडतो. अगदी माझ्या शेजारी बसवुन काम करताना, खेळ खेळतांना काही ढोबळ चुका होतात हे लक्षात आले. काही विशेष मुलांना काही वेळा या बाबतीत समस्या जाणवते असे ऐकून होते म्हणून माझ्या एका मैत्रिणीशी बोलले तेव्हा कळलं की, त्याला व्हिज्युअल प्रोससिंगमधे समस्या असू शकते म्हणून!

      मला आधी कळेच ना. हे काय नवीन? असं वाटलं, मग ती म्हणाली, “आपण जे बघतो, त्या प्रत्येक दृश्‍य अनुभवाचं मिश्रण, विश्‍लेषण करून त्याद्वारे माहिती ग्रहण करण्याची प्रक्रिया मेंदूत घडते, त्यामुळे समोरच्या दृश्‍याकडे, वस्तूकडे, व्यक्तीकडे बघून त्याला साद प्रतिसाद देणे, समोर दिसणाऱ्या माहितीचा उपयोग करणे होत असते. पण काही वेळा मेंदूला दृश्‍य नीट समजून घेता येत नाही. प्रोसेस नीट होत नाही, त्यातला फरक समजत नाही, त्यांमुळे अशी गडबड होत असते.

      आता आपलंच बघ ना, काही वेळा झेरॉक्स काढताना ती तिरपी येते, त्यातली खालच्या वाक्यातली निम्मीच अक्षरे दिसतात, पण आपले फारसे अडत नाही. जे दिसते आहे, त्यावरून अंदाज करून आपण ते वाक्य बरोबर पूर्ण करतो किंवा अर्ध्या दिसणाऱ्या चित्रावरून ते चित्र काय असेल याचा अंदाज आपण करतो. हे आपण करतो कारण आपली दृक्‌ प्रक्रिया व्यवस्थित होत असते.

      तुझ्या त्या दिनेशच्या बाबतीत अशीच दृक प्रक्रियेसंबंधीची समस्या असू शकेल. त्याच्या पालकांशी बोलून त्याची चाचणी करून घ्यायला सांगितलीस तर त्याला नेमकी काय समस्या आहे ते कळेल बघ. आणि हो; त्या दिनेशचं नीट निरीक्षण कर म्हणजे तो शब्द नीट लिहीतो ना की त्यामधे अक्षरांचा क्रम चुकवितो. त्याला दोन सारख्या दिसणाऱ्या चित्रांमधला फरक नीट ओळखता येतो का? बघितलेली दृश्‍य, माहिती त्याला नीट ओळीने आठवतात का? हे पण जरा बघ! त्यांच्या आईबाबांनाही बघायला सांग, वयाने लहान आहे ना तो! वेळीच लक्षात आलं तर त्याच्यासाठीच्या उपाययोजनाही तुला शाळेत सुरू करता येतील, आणि त्याला पुढे जरा कमी त्रास होईल.” हे ऐकून मला थोडे हायसे वाटले.

      दुसऱ्या दिवशी मी मॅडमच्या कानांवर सगळी माहिती घातली. त्यांनी दोन तीन दिवसांनी दिनेशच्या आई बाबांना शाळेत बोलावून घेतले तेव्हा त्यांच्याशी मी आणि मॅडम याबद्दल बोललो. त्यांनाही हे सगळे नवेच  पहिल्यांदाच कळत होते.

       त्यांच्याशी बोलून मी बाहेर पडले तेंव्हा डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो, जिव्हेने रस चाखितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो हाताने बहुसाल काम करीतो विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरूनी उठतो ही ईश्‍वराची दया“

      ही प्रार्थना मुले करत होती, ती म्हणता म्हणता लक्षात आले की खरंच या छोट्याशा प्रार्थनेमध्ये आपल्या ज्ञानेंद्रियांच्या कार्याचे वर्णन केले आहे. ते किती समर्पक आहे आणि त्याचे किती महत्त्व आहे हे नव्याने लक्षात आले.

– विद्या भागवत,

प्रिझम फौंडेशन संचलित,बेन्यू प्रशिक्षण केंद्र

Leave a Reply

Close Menu