भुस्खलन : स्खलन भुस्तरांचे की मानवतेचे?

एकीकडे आपण आपल्या स्वर्गाहून सुंदर सोन्या सारख्या पृथ्वीची राख रांगोळी करूनच मानवाची एवढी प्रगती तुफान चालु आहे की मानवी जीवन, पशू पक्षी, नदी, नाले डोंगर सर्वकाही नैर्गिकदृष्टया संपत्ती कवडी मोल करून त्याला काय मिळवायचे आहे हे नक्की शोधून पहायला हवं. घटना घडल्या की केवळ हळहळ आणि पुढे बेफाम प्रगती चालुच, जे याचे चटके खातात त्या जीवांची मात्र कोणी पर्वा करत नाही. 17 जीव मृत अवस्थेत सापडले, 57 जीव हाती देखील आले नाहीत, हे झाले मानवी जीव, बाकी जीवांची तर गिणती देखील नाही. मग जे घडले त्यावर उपाय देखील नको करायला? एवढी जाणीव कसा माणूस हरवून बसला असेल? या लेखातून जाणून घेऊ अशा घटना का घडत असतील तसेच उपाय योजनाही काय आहेत, यावर जरुर मंथन करूयात. बोथट संवेदना जागृत करून संवेदशीलता जपुयात.

      आजकाल माणसाची संवेदनशीलता ही सिलेक्टिव्ह झाली आहे. “कोणतीही आपदा, संकट, अपघात हा कुठं घडलाय आणि त्यात बळी पडणारे कोण आहेत“ यावर आपली प्रतिक्रिया अवलंबून असते आणि याव्यतिरिक्त घटना-प्रसंगामागील सत्य-असत्याचे ज्ञान असणं-नसणं हा भाग वेगळाच. हे मग वर्तमानातला मणिपूरचा प्रसंग घ्या किंवा इर्शाळवाडीचा, ही सिलेक्टिव्हनेस इतर कोणत्याही परिस्थितीला लागु होताना दिसत आहे.

      जात, धर्म, पक्ष, प्रांत या सर्व गोष्टींविरहित निव्वळ माणूस म्हणून आपण संवेदनशील राहिलो आहोत काय? याचं उत्तर दुर्दैवाने बहुतेक “नाही“ हेच आहे. सामान्य माणसाच्या संवेदनशीलतेची ही स्थिती परंतु लोकप्रतिनिधी, प्रशासन, संशोधक या सगळ्यांनीही तितकेच असंवेदनशील असावे काय? हा मोठा प्रश्‍न आहे. आणि जर कोणीही प्रशासक, लोकप्रतिनिधी आपण अजूनही संवेदनशील असल्याचा दावा करतो परंतु त्यांच्या प्रत्यक्ष कृतीत ते दिसत नाही तेव्हा ती निव्वळ दांभिकताच ठरते. व्यवस्था कोलमडणे म्हणजे काय याचीच ही प्रचिती. ईर्शाळवाडी निमित्ताने व्यवस्था म्हणून, प्रशासन म्हणून आपण खरंच किती संवेदनशील आहोत याची प्रचिती खालील माहिती वाचल्यावर

येईल…………………………………….

      भुस्खलन म्हणजे काय?

      खडकांत निर्माण झालेल्या भेगा विस्तारित होऊन खडकांचे तुकडे वेगवेगळे होऊ लागतात. अशा प्रकारे लूज खडक उताराच्या दिशेने घसरत जाऊन खालील सपाट बाजूस स्थिरावण्याचा प्रयत्न करतात, यालाच दरड कोसळणे किंवा भूस्खलन म्हणतात. जमीन खचणे हा प्रकार देखील एक हळूवार किंवा सावकाश होणारं भूस्खलनच होय.

      भूस्खलन होण्यासाठी जे जबाबदार घटक असतात त्यामध्ये महत्त्वाचे आहेत मृदा प्रकार, भूस्तर रचना, पर्जन्य तीव्रता, वनसंपदा आणि मानवी हस्तक्षेप.

      भूस्खलनात पाण्याचं कार्य महत्वाचं आहे जे नैसर्गिक वंगणासारखं काम करतं. ते मातींच्या कणांमधील घर्षण कमी करते, तसेच जमिनीत छिद्रीय बल (Pore pressure) निर्माण करते ज्यामुळे जमिनीची दाब झेलण्याची क्षमता (Load bearing capacity) कमी होते. भूगर्भातील काही रचना खास करून दोन पाषाण थरांमधील लाल गेरूही भूस्खलनास कारणीभूत ठरतात. तसेचं भूगर्भांत सतत हालचाली होतं असतात या सगळ्यांचा परिणाम म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ताण पडतो आणि भूस्खलन होऊ शकतं.

      याव्यतिरिक्त भूस्तर रचना सर्व ठिकाणी एकसारखी नसते. लावा थरांच्या उताराची तीव्रता आणि त्याची जाडी हा एक महत्त्वाचा घटक. दोन लावा थरांमध्ये असलेला लाल गेरू हा देखील यात महत्त्वाची भूमिका बजावतो. लाल गेरू जेव्हा पाण्याने ओला होतो, तेव्हा तो अधिक निसरडा होतो आणि जर त्याच्यावर असलेल्या भूस्तरांची जाडी कमी असेल, ते संख्येने जास्त असतील आणि त्यावर वनसंपदेचे आच्छादन कमी झालेले असेल तर भूस्खलनाची शक्यता अधिकच वाढते. याव्यतिरिक्त जेव्हा तथाकथित विकासाची कामे सुरू असतात तेव्हा जर नेमक्या तीव्र उताराच्या ठिकाणी जर हा लाल गेरू उघडा पडला तर आयतीच अनुकूल परिस्थिती निर्माण होते. आपण जर ठिकठिकाणी घाटात फिरताना बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की हा लाल गेरू वाहत्या पाण्यात सोबत लाल रंगाचे पाणी म्हणून वाहताना दिसेल. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की आपल्या नद्या रक्तासारखे लाल रंगाचे पाणी घेऊन वाहतात, याचा अर्थ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दोन थरांमधील माती निघून जाते आहे आणि यामुळे दोन थरांत गॅप निर्माण होतोय. जर अशावेळी पाऊस एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणात पडला तर जो अतिरिक्त दाब निर्माण होतो त्यामुळे ही लाल माती निघून जाण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होते आणि भूस्खलन होते. संपूर्ण सह्याद्री पर्वत रांगेत अशाप्रकारे तीव्र उताराची ठिकाणी कुठली आणि कोणत्या ठिकाणी वनसंपदा घटली आहे हे ओळखून भूस्खलनाची संवेदनशील ठिकाणी ओळखता येतात.

      मानवी हस्तक्षेप- आपण पाहतोय की विकासाच्या नावाखाली, पर्यटन सोयींच्या नावाखाली सततपणे रस्ते निर्मिती, फार्म हाऊस बंगलोज आणि इतर प्रकारच्या गोष्टीसाठी तिथल्या प्रदेशात टेकडीफोड, वृक्षकत्तल सुरू आहे. वनसंपदेचा जमीनीचा मुख्य आधार असतो, वनसंपदा म्हणजे फक्त मोठी झाडे नव्हे तर गवत, वेली, झुडपे, लहान वृक्ष आणि महावृक्ष ही सगळी मिळून तिथल्या भुस्तरांस मजबूतपणे मुळांच्या आधारानं पकडून ठेवतात. मोठी झाडं तोडली की ही भक्कम योजना कमकुवत होते, अर्थात यानंतर जो पाऊस पडेल तो जमिनीत मुरतो खरा परंतु अधिक नुकसान करण्यासाठीच. शिवाय उतारी भागाचं शेतीसाठी सपाटीकरण करणे याचाही भुस्सखलनाच्या कारणांत समावेश आहे. अतिपर्जन्याच्या काळात उताराचं सपाटीकरण केलेल्या भागात पाणी मुरण्याच्या प्रक्रियेतही अशा दुर्घटना घडतात. विकासकामांत स्फोटकांचाही वापर केला जातो, त्यामुळंही जमीन कमकुवत होऊ शकते.

      खरं तर पश्‍चिम घाटासारख्या प्रदेशात भूस्खलन होणे नवीन नाही. राज्याचा 15 टक्के भाग हा दरडप्रवण क्षेत्र आहे. यात नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना दरड कोसळण्याचा धोका. रायगड जिल्ह्यात 103, रत्नागिरीत 45, पुणे जिल्ह्यातील 72 गावं तसेच इतर जिल्ह्यातील अनेक गावं ही भूस्खलन दृष्टीने संवेदनशील जाहीर करण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी सततपणे लहान-मोठे भूस्खलन दरवर्षी पावसाळ्यात होतातच. परंतु विषय तेव्हाच ऐरणीवर येतो जेव्हा मोठी जीवितहानी होते, तोपर्यंत मात्र कोणालाही या विषयाशी घेणे नसते. याआधीच्या भूस्खलनाच्या मोठ्या घटना म्हणजे “माळीण, तळीये.”

      सध्या भुस्स्खलन रोखण्यासाठी जे काही उपाय केले जातात त्याबद्दल :-

  1. संवेदनशील ठिकाणी जमिनीतले अतिरिक्त पाणी काढून टाकणं. यासाठी उतारावर पाण्याचे पाईप टाकून सर्व अतिरिक्त भूजल त्या पाइपमधून वाहून जाईल अशी व्यवस्था केली जाते.
  2. उतारांवर संरक्षक भिंती (Retaining walls). उताराच्या वरील भागात जरी भूस्खलन झालं तरी, भिंतींमुळं ते अडून राहतं आणि अपघाताची शक्यता कमी होते.
  3. खडकांचे बोल्टिंग (Rock bolting) करणे. खडकांमध्ये मोठे बोल्ट्स ठोकून त्याच्यात लोखंडाची जाळी लावली जाते. त्यामुळं पडणारे लहान खडक लोखंडी जाळीत अडकतात आणि खाली पडत नाही.
  4. संरक्षक भिंत बांधणं शक्य नसेल तर उतारावर खड्डे खणून त्यांच्यात उच्च दाबानं काँक्रीट भरलं जातं. याला ग्युनाटिंग म्हणतात. त्यामुळं जमिनीत घर्षण वाढतं आणि भूस्खलन होत नाही.
  5. वनीकरणामूळं (Forestation) भूस्खलनापासून संरक्षण करता येऊ शकतं. कारण झाडांची मूळं जमीन घट्ट धरून ठेवतात.

      खरं तर पर्यटन आणि विकासकामं ही माणसांच्या जीवांहून जास्त महत्त्वाची झाली आहेत. प्रत्येक गोष्टीत पैसा, पैसा आणि पैसाच दिसत आहे. अशा परिसरात राहणारी माणसं जी बहुतांश गरीब आदिवासी प्रकारात मोडतात, त्यांचे जीव प्रशासन- लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने कवडीमोलच. खरं तर कोणत्याही विकासकामापूर्वी याप्रकारे भूस्खलनासाठी संवेदनशील ठिकाणी वगळूनच पुढे जायला हवं परंतु दुर्दैवाने हे होत नाही. याशिवाय ज्या ठिकाणी विकासकामं अपरिहार्य आहेत तिथे भूस्खलन होणार हे गृहीत धरून किमान मानवीवस्ती तरी इतरत्र हलवायला हवी. एवढे केले तरी किमान हे मौल्यवान जीव वाचले जावू शकतात पण दुर्दैवाने हे घडत नाही. कारण हीच घटना जर पुण्यासारख्या शहरांमध्ये घडली, एखादी इमारत कोसळली आणि त्यात महत्त्वाच्या लोकांचा मृत्यू झाला तर शासनाची हीच प्रतिक्रिया राहील काय? याचा विचार करावा लागेल.

      प्रशासन, संशोधन आणि व्यवस्थेतील धोरणनिर्णयांत ज्यांना प्राधान्यक्रमात सर्वात शेवटी स्थान असते असे वर्तमानात सर्वात कवडीमोल जीव कुणाचे असतील तर ते महिला, बाल-वृद्ध, आदिवासी आणि शेतकरी बांधव यांचेच आणि हेच सध्याच्या मणिपुर, इर्शाळवाडी इत्यादी घटनांतून समोर येतेय.

      शेतकरी मरतो, महिला नागडी होते, मुलं निराधार होतात, आदिवासी ढिगाऱ्याखाली दबून जातात, बस्स एवढंच तर होतंय, बाकी सगळं आलबेल आहे.

-उपेंद्रदादा, सहज जलबोध, पुणे 9271000195

Leave a Reply

Close Menu