भयाण वास्तव..

      केरळमधून ३० हजार महिला बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील तरूणींच्या मिसिंग मिस्ट्रीचा चिंताजनक प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. सन २०२० पासून हरविलेल्या व्यक्तींच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. राज्यातून दिवसाला ७० हून अधिक तरूणी / महिला बेपत्ता होत आहेत. जानेवारी ते मार्च दरम्यान ५,५१०, जानेवारीत १,६००, फेब्रुवारी १,८१० आणि मार्च महिन्यात सर्वाधिक २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत.

       भारतात काही संस्था व्हॅनिशिंग गर्ल्सअशी मोहीम चालवतात. जन्म घेण्यापूर्वीच मुली कशा गायब केल्या जातात, याकडे लक्ष वेधणारी ही मोहीम आहे. मात्र, जन्म घेतलेल्या मुली रातोरात आणि हातोहात कशा गायब केल्या जातात आणि नंतर त्या कोणत्या नरकात जाऊन पडतात; हे पोलिसांसहित सा­या व्यवस्थेला माहीत असूनही सगळ्यांची अळीमिळी गूपचिळी आहे. याचे कारण, डोळ्यांनी जे दिसते ते पाहायचे नाही. या मुलींचा आक्रोश ऐकायचा नाही. शहरोशहरी देहविक्रय करणा­या लक्षावधी मुलींचे मूळ शोधायचेच नाही आणि त्यांचे नाव, गाव, कुटुंब सारे पुसून त्यांना केवळ उपभोगाचा देह म्हणून जगवत ठेवायचे आणि त्या मरण पावल्या की त्यांना फेकून द्यायचे; असे आपल्या संभावित व सुसंस्कृत समाजाने जणू ठरवूनच टाकले आहे.

   भारतात सन २०१९, २०२० आणि २०२१ या तीन वर्षांमध्ये एकूण १३ लाख १३ हजार मुली व महिला बेपत्ता झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागसांगतो. याचा अर्थ खरा आकडा किती जास्त असेल, याची कल्पना करता येईल. हा इतकाच आकडा जरी खरा मानला तरी या लाखो मुली केवळ पुढे शिकायचे, प्रियकराशी लग्न करायचे किवा घरात भांडण झाले म्हणून पळून जात असतील का? आणि तशा त्या शिकण्यासाठी, प्रियकरा सोबत किवा घरातल्यांसोबत झालेल्या वादातून घराबाहेर पडल्या असल्या तरी त्यांचा कुठेतरी पत्ता सापडायला हवा? त्या गायबच कशा काय होतात?

   सन २०२१ मध्ये ज्या एकूण महिला बेपत्ता झाल्या; त्यातल्या ९० हजारांहून अधिक १८ वर्षांखालील म्हणजे कायद्याने सज्ञान न झालेल्या मुली आहेत. देशातील राज्यनिहाय आकडेवारी पाहिली तर स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणा­या महाराष्ट्राला खरेतर शरम वाटावी, अशी स्थिती आहे. देशात मध्यप्रदेश यात पहिल्या तर बंगाल दुस­-या क्रमांकावर आहे. तिस­या क्रमांकावरच्या महाराष्ट्रात या तीन वर्षांत १ लाख ७८ हजार महिला बेपत्ता झाल्या. याशिवाय, १३ हजार अल्पवयीन मुली आजही सापडलेल्या नाहीत.

   दिवसेंदिवस बेपत्ता होणा­या मुली आणि महिलांची संख्या वाढत असून ही चिंताजनक बाब असल्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे, लहान मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असल्यास पोलिस अपहरणाचा गुन्हा नोंदवत, तपास सुरू करतात. दिवसाला किमान तीन अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांकडे होत आहे. या मुलींचा सामान्य तपासातून शोध घेण्यासोबतच ऑपरेशन मुस्कानसारखे उपक्रम राबवूनही पोलिस मुलींचा शोध घेत आहेत. मात्र मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात विविध व्यासपिठांवर चालणारी सध्याची चर्चा इतकी दिशाहीन, विकृत, मतलबी, ढोंगी आणि एकमेकांचा द्वेष करण्यात मशगूल झाली आहे की, या डिस्कोर्सला लाखो बेपत्ता मुलींचे काय?

    ‘नॉट विदाऊट माय डॉटरही सत्यकथन लिहिलेली कादंबरी. बेट्टी महमुदी यांनी लिहिलेली ही कादंबरी म्हणजे स्वातंत्र्यया मूलभूत गरजेसाठी स्वातंत्र्यप्रिय व्यक्तींना आजही द्याव्या लागणा­या कठोर लढ्याची कहाणी आहे. प्रगतीकडे झेपावणा­या नव्या युगातही प्रत्यक्ष आपल्या नव­याकडून फसवले जाणे हा मानवतेचा, व्यक्तीस्वातंत्र्याचा अपमानच आहे. अमेरिकेत राहणा­या बेट्टी महमूदीला तिचा नवरा काही कारणाने इराणला घेऊन जातो व तेथेच डांबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या चार वर्षांच्या मुलीवरही तो अत्याचार करतो. यातून सुटका होणे जवळ जवळ अशक्यप्रायच असते. परंतु आपल्या व आपल्या मुलीच्या सुटकेसाठी अत्यंत कठीण मार्ग अवलंबण्याचं धाडस बेट्टी करते. तिच्या या सुटकेच्या संघर्षाची, क्षणाक्षणाला हृदयाचा ठोका चुकवणारी अशी ही कादंबरी आहे. यात त्या देशातील स्त्रियांना दिल्या जात असलेल्या वागणुकीबद्दल / भयाण परिस्थितीबद्दल लिहिले आहे. परंतु, असे वाट्याला येणारे चित्र आणि त्यातून सुटका, याचे अशा घटना आजूबाजूला घडल्यावर, निव्वळ वाचून सोयीने व्यक्त होणार का? किवा अजून माझ्या घरात नाही ना, अशी घटना? असा असंवेदनशील विचार करीत शांत बसणार आहोत.

   भारतात निदान २० लाख मुली, तरूणी सध्या देहविक्रयात असून देशभरात हा व्यवसाय चालणारी दोन लाखांहून अधिक ठिकाणे असावीत, असा अंदाज एका पाहणीत व्यक्त झाला आहे. असे आकडे देणारी संस्था किवा संघटना बाहेरच्या देशातील असली की लगेच अनेक जण भारताविरोधी कटाचा वास येऊन त्यांचे राष्ट्रप्रेम व्यक्त करू लागतात. परंतु, बेपत्ता होणा­या, पळवून नेल्या जाणा-­या मुलींचा पुढचा नरकापर्यंतचा प्रवास होण्यात किती आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, हे मात्र सोईने दुर्लक्षिले जाते. देशातील बेपत्ता होणा­या या लक्षावधी मुलींना कोण साथ देत आहे? बाजारात नेणारे नातलग, दलाल, विक्रेते आणि त्यांच्या आयुष्याचा चोळामोळा करून  टाकणा­-या गिधाडांपासून आम्ही वाचवूअसा विश्वास त्यांच्या मनात कोण निर्माण करत आहे का? काही दिवसांपूर्वी मुली हरविण्याच्या तक्रारी वाढल्या तेव्हा रोज महाराष्ट्रात ६० ते ७० मुली कायमच्या हरवत आहेत, असे लक्षात आले. राष्ट्रीय आकडेवारीवरून ते आता सिद्धच झाले आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनात एकमेकांची उणीधुणी काढण्यात जो वेळ जातो; तेवढा तरी निदान या बेपत्ता मराठी मुलींचा मूक आक्रोश ऐकण्यासाठी द्यावा. तेवढी तरी संवेदनशीलता उरली आहे का? हा शोध घेण्याची वेळ आली आहे.

      एकीकडे मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी बेटी बचाओ-बेटी पढाओही मोहिम विविध माध्यमातून सरकार राबवित आहे. पण जेथे माणूस म्हणून न स्वीकारता केवळ उपभोगाची वस्तू म्हणून स्त्रीकडे पाहिले जाते तेव्हा सध्याचे भयाण चित्र पहाता भविष्यात आपल्या मनाप्रमाणे गायब न होता जन्मा आलेल्या मुलींना जगता येईल का? हे कळायला मार्ग नाही.

Leave a Reply

Close Menu