चित्रमंदिर ते मल्टिप्लेक्स

आजकाल ‘गदर-2’ या चित्रपटाची सर्वत्र हवा आहे. वेंगुर्ल्यात सध्या चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृह उपलब्ध नाही. त्यामुळे अजून तरी मी हा चित्रपट पाहिलेला नाही. फेसबुक – युट्यूबवर तुकड्या तुकड्याने या चित्रपटातील लिक झालेली काही दृष्य बघून चित्रपटाची बरीचशी कल्पना येऊन गेली. पायरेटेड असलेल्या या चित्रफितीमध्ये चित्र नीट दिसत नव्हते, संवाद नीट ऐकू येत नव्हते तरीही या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. नव्वदच्या दशकातील बहुतांशी चित्रपट असेच असायचेत. बरेचसे लाऊड, मेलोड्रामा, ॲक्शन, इमोशनने भरलेले चित्रपट सिंगल स्क्रीनवर धुमाकुळ घालायचेत. या चित्रपटाच्या निमित्ताने मग मला आमच्या नव्वदीच्या दशकातील मनोरंजनाच्या माध्यमांची अलिकडच्या काळातील मनोरंजनाच्या माध्यमांशी नकळत तुलना करावीशी वाटली, म्हणून हा लेखन प्रपंच.

      खरतर या चित्रपटाचा पहिला भाग ‘गदर’ (निर्मात्यांनी तेव्हा पुढे जाऊन आपण गदर 2 नावाचा चित्रपट काढू अशी कल्पनाही केली नसेल) हा चित्रपट काही नव्वदीच्या दशकात रिलिज झाला नव्हता, परंतु सन 2001 मध्ये मेलोड्रामाने भरलेला हा चित्रपट प्रचंड हिट होऊनही तदनंतर काही वर्षात रियलॅस्टीक चित्रपटांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होऊ लागली. ‘गदर’ आणि ‘लगान’ एकाच दिवशी रिलिज झालेले सिनेमा. ‘गदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचे यापूर्वीचे हुकुमत, ऐलान-ए-जंग, फरिश्‍ते, तहलका (अपवाद श्रध्दांजली) वगैरे सारख्या चित्रपटांचा अनुभव लक्षात घेता मी मात्र पनवेलला सिंगलस्क्रीन वर लगान चित्रपटाला प्राध्ाान्य दिले होते. सव्वातीन तासाचा स्वातंत्र्यलढा आणि क्रिकेट मॅच अशी विचित्र पार्श्‍वभूमी असलेला लगान चित्रपट मला प्रचंड आवडला होता. ऑफिसमध्ये बरेचजण मात्र गदर चित्रपट बघून त्याची तारीफ करीत होते. मी का कोण जाणे उगाच गदर चित्रपटाबद्दल निगेटिव्ह विचार मनात ठेवून या चित्रपटाचा राग करत होतो. गदर लगान पेक्षा जास्त कमाई करत होता हे ही एक त्यामागे कारण असू शकते. पुढे लगान ने बरेच पुरस्कार पटकावले, अगदी ऑस्कर पुरस्कारसुध्दा मिळवला. गदर चित्रपट हॅण्डपंपचा सिन, सनी देओलची डायलॉगबाजीने गेली एकवीस वर्षे लोकांच्या स्मरणात होता. नंतर कधीतरी टिव्हीवर मी गदर पाहिला, अनिल शर्माच्या दिग्दर्शनात एरव्हीच्या चित्रपटांपेक्षा थोडासा वेगळेपणा दिसला पण नव्वदीच्या काळातील चित्रपटातील लाऊडपणा मात्र ठासून भरला होता.

      नव्वदीच्या काळातले सलमान, शहारुख, आमिर खान हे नवोदित चेहरे आमच्या कॉलेज जीवनातील सुरुवातीच्या काळातील हिरो. सनी देओल तर आमच्या बालपणीच्या काळातला. आता अस्मादिकांनीच पन्नाशी ओलांडली म्हणजे आजच्या काळात हिरो म्हणून झळकणाऱ्या वरील स्टारच्या वयाचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. गेली दहा-पंधरा वर्षे वरील स्टारना आपला क्रश समजणाऱ्या तरुणपोरी जेव्हा अस्मादिकांना अंकल म्हणून हाक मारत तेव्हा अस्मादिकांच्या हृदयाला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना फक्त अस्मादिकांनाच. कधीतरी हे दु:ख धर्मपत्नीकडे व्यक्त केल्यावर ‘तुमचा वाढलेला पॉट आणि पांढरे होत चललेले केस वायच बघा आणि मगे बोला’ असे अजून जखमा खोल करणारे उत्तर मिळायचे. मग या हिरोंचे चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखविण्यासाठी मी सौं ना चित्रपट गृहात घेऊन जायचो. मोठ्या पडद्यावर या हिरोंच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वार्धक्याची लक्षणे लपत नव्हती, त्यामुळे अस्मादिकांना एक प्रकारचा आसुरी आनंद व्हायचा. आता व्हिएफएक्सने यावर सुध्दा मात केलीय, साठीच्या घरातील या हिरोंच्या चेहऱ्यावर व्हिएफएक्सच्या माध्यमातून तरुणाई चकाकू लागली, असो.

      नव्वदीच्या काळातील लाऊड आणि ठराविक साच्यातील चित्रपटांना रसिक कंटाळले होते. यावर औषध म्हणून अनुराग कश्‍यप सारख्या दिग्दर्शकांचे रियलॅस्टीक चित्रपट येऊ लागले आणि ते लोकांना आवडूही लागले. सुरुवातीला अशा चित्रपटातील नग्नता, हिंसा आणि शिव्यांचा भडीमार लोकांना आवडत होता. मग ओटीटी च्या माध्यमातून अनेक वेब सिरीजमध्ये हेच लोकांसमोर येऊ लागले, त्या कारणाने असेल कदाचित हिंदी चित्रपटांपासून लोक दुरावू लागले. याच काळात साऊथचे लाऊड चित्रपट हिंदीमध्ये डब होऊन प्रचंड हिट ठरू लागले. आता हिट होत असलेला गदर 2 चित्रपटाचा दिग्दर्शक अनिल शर्मा तर नव्वदीच्या दशकात लाऊड चित्रपटसाठी प्रसिध्द, थोडीफार तांत्रिक बाब सोडली तर हा चित्रपट नव्या काळातील चित्रपट आहे असे वाटतच नाही.

      नव्वदीच्या काळात म्युिझकल चित्रपटांचाही ट्रेंड आला होता. नदिम-श्रवण, आनंद-मिलिंद आणि बरेच नवोदित म्युिझक डायरेक्टरची गाणी प्रचंड गाजू लागली होती. त्याकाळी जुन्या पिढीतील लोक या गाण्यांना नाक मुरडत असत, ‘ही कसली गाणी चार दिवसांची नाटके… काही दिवसानंतर कुणाला आठवणारही नाहीत’ अशी टिका केली जायची. खरंतर अशी टिका प्रत्येक दशकात त्या काळी गाजणाऱ्या गाण्यांवर, कलाकृतींवर केली जायची. त्याकाळी सोशल मिडीया नव्हती परंतु वेंगुर्ल्याच्या नगरवाचनालयात फार जुने दिवाळी अंक (जूने म्हणजे मी 1990 मध्ये 1960 सालापासूनचे अंक) वगैरे वाचल्यामुळे हे विधान करतोय. चित्रपट संगीतापेक्षा नाट्यसंगीत श्रेष्ठ, नाट्यसंगीतापेक्षा शास्त्रीय संगीत श्रेष्ठ अशी साखळी मागे मागे जात राहील. असो, आजची पिढी नव्वदीच्या काळातील चित्रपट संगीताची वेडी आहेत हे मात्र खर आहे. रिमिक्स वगैरेच्या माध्यमातून ती आजच्या चित्रपटात पुन्हा वापरली जात आहेत.

      नव्वदीच्या काळातील चित्रपट गीते आणि त्याचे संगीत हे चोरलेली आहेत असे त्यावेळी आरोप व्हायचे. त्याकाळी युट्यूब वगैरे नसल्याने जग एवढे सहज जोडले गेलेले नव्हते. आजमात्र देशविदेशातील गाणी घरबसल्या सहज उपलब्ध होत असल्याने त्या आरोपातील तथ्य होते याची खात्री पटते. अर्थात याच माध्यमातून कृष्ण धवल चित्रपटाच्या कालावधीपासूनच आपल्या सिनेसंगीतातील बरीचशी गाणी कुठून ना कुठून प्रेरणा घेऊन बनविलेली होती याचे दाखले उपलब्ध होतात. असो, ‘जुने ते सोने’ हे प्रत्येक पिढीला वाटत आलेय. अलिकडेच बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला प्रचंड ट्रोल केले गेले. या चित्रपटाची ‘रामायण’ या टिव्ही मालिकेशी तुलना केली गेली. गंमत या गोष्टीची वाटत होती की अवघ्या तिशीतील तरुणाई 36 वर्षापूर्वीच्या मालिकेशी तुलना करून या चित्रपटाला ट्रोल करीत होती. अरे बाळांनू त्यावेळी तुमचा जन्म तरी झाला होता का? रामायण मालिकेची त्याकाळी प्रचंड क्रेझ होती, प्रत्येक एपिसोडच्या वेळी सर्व समाजातील, सर्व जातीधर्मातील, सर्व वयोगटातील लोक मिळेल त्या टिव्ही समोर जाऊन बसायची. आवडीने मालिका बघायचीत, हे जरी खरे असले तरी पण टिकाही करायचीत. त्याकाळी सोशल मिडीया नव्हती तरीही वृत्तपत्रांतील लेख, गावच्या कट्ट्यावरील गप्पा इत्यादी माध्यमातून या मालिकेतील खटकणाऱ्या गोष्टीवर चर्चा व्हायची. मला आठवते त्याप्रमाणे ‘रामायणात असा काय लिवलेला नाय’ ही टिका बऱ्याच दृष्यांवर मोठ्या प्रमाणात केली जायची. मग निर्मात्यांतर्फे असे अमुक अमुक रामायणात लिहीले आहे याचे दाखले त्याकाळच्या प्रसारमाध्यमातून दिले जायचेत. ट्रिकसीन्स, युध्दाची दृष्ये यावरही बरेचदा टिका व्हायची. स्वर्गीय दारासिंह यांनी यापूर्वी बरेचदा हनुमानाची भुमिका रंगविली होती, तरीही रामायण मालिकेच्या वेळीचे त्यांचे वय तरुण हनुमानाला शोभत नव्हते म्हणूनही बरेचजण नाराज होते. लढाईचे दृष्य चालू असताना ‘तो बघ तो बघ थय लायटीचो खांब दिसलो’ असे कुणीतरी मध्येच ओरडायचे. त्याला दिसलेला तो लाईटीचा खांब एवढ्याश्‍या टिव्ही स्क्रीनवर परत दुसऱ्याला दिसेल याची शाश्‍वती नसायची. रिपिट टेलिकास्टचा तर प्रश्‍नच नव्हता. परंतु हे जरी काहीही असले तरी आज मात्र रामायण ही मालिका माईलस्टोन म्हणून लोकांच्या आठवणीत आहे. रामायणा संबंधित कोणत्याही कलाकृतीशी या मालिकेसोबत तुलना होतेच होते.

      वेंगुर्ल्यात टिव्ही येण्यापूर्वी टूरींग टॉकीज आणि नटराज चित्रमंदिर ही करमणुकीची साधने होती. नटराज चित्रमंदिर म्हटल्यावर जर तुम्हाला काही आठवले नसेल तर नानाचा थेटर आठवा… हो हो त्याचेच नाव नटराज चित्रमंदिर होते. मी जन्मा पासून वयाची पंचवीस वर्षे वेंगुर्ल्यात व पुढील पंचवीस महानगरी मुंबईत वास्तव्यास होतो. आता पुन्हा वेंगुर्ल्यात, परंतु पहिल्या पंचवीस वर्षात जेवढे चित्रपट नटराज मंदिर मध्ये पाहिले त्याच्या 10 टक्के सुध्दा चित्रपट मी मुंबईतील मल्टिप्लेक्समध्ये पाहिले नाहीत. वेंगुर्ल्यात त्याकाळी आम्हाला काही मोजकेच अपवाद वगळता जुने, फ्लॉप, बी आणि सी ग्रेड चित्रपट बघणेच नशीबात असायचे. पौराणिक, कौटुंबिक, हॉरर तसेच हाणामारीने भरलेले हे चित्रपट क्लासिक या चौकटीत कुठेच बसत नाहीत तरीही अजूनही आठवतात. लाकडी बाकड्यावर बसून (पीटात) पाहिलेले हे चित्रपट हेच ग्रेट होते अशी आमुची भाबडी समज. नानाच्या थेटरात ‘फिर वही रात’ बघून आपण कसे घाबरलो होतो याचे वर्णन करताना थकणार नाही अशी आमच्या पिढीतील अनेक माणसे तुम्हाला भेटतील.

      असो, गदर 2 सध्यातरी प्रचंड गर्दी करीत आहे, याची कारणे बरीच असतील. तरी मला वाटते नव्वदीच्या काळातला मेलोड्रामा परतून मोठ्या पडद्यावर आलाय हे एक मोठे कारण असावे. आता बघूया ‘अशी ही बनवाबनवी’ चा रिमेक किंवा दुसरा भाग कधी येतोय. पण हे धाडस कुणी पेलवू शकेल का आणि कुणी धाडस केलेच तरी या चित्रपटाचा प्रत्येक सीनचे हृदयात स्थान असलेला आमच्या पिढीतला सिनेरसिक ते स्विकारेल का? हा मोठा प्रश्‍नच आहे.                               – संजय गोविंद घोगळे, 8655178247

Leave a Reply

Close Menu