स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश‘ अर्थात ‘माझी माती माझा देश‘ या अभियानाच्या दुस-या टप्प्यात ‘अमृत कलश यात्रा‘ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच अभियानाच्या अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत १५ सप्टेंबर रोजी ढोल ताशांच्या गजरात ‘अमृत कलश यात्रा‘ काढण्यात आली.
तत्पूर्वी या यात्रेचा शुभारंभ मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते नगरपरिषद प्रशासकीय इमारत परिसरात करण्यात आला. त्यानंतर वेंगुर्ला शाळा नं.३, वेंगुर्ला हायस्कूल, आनंदवाडी, सातेरी मंदिर, वेंगुर्ला तालुकास्कूल नं.१, बसस्थानक वेंगुर्ला, वेंगुर्ला शाळा नं.२ या ठिकाणी या यात्रेचे स्वागत करुन आपापल्या भागातील माती संकलीत केली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘जय जवान जय किसान‘, ‘भारत माता की जय‘, ‘वंदे मातरम‘, ‘माझी माती माझा देश‘ असे नारे देत देशाप्रती असलेले प्रेम व निष्ठा व्यक्त केली. या यात्रेत मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांच्या नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, शहरातील नागरिक सहभागी झाले होते. याच यात्रेने ‘माझी माती, माझा देश‘ अभियानाचा समारोप करण्यात आला.