नगरवाचनालय वेंगुर्ला संस्थेतर्फे दिले जाणारे आदर्श शिक्षक, शिक्षिका व आदर्श शाळा पुरस्कारांचे वितरण १० सप्टेंबर रोजी करण्यात आले. यात कै.मेघःश्याम गाडेकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राथमिक शाळा आडेली नं.१चे कर्पुरगौर जाधव यांना, कै.जानकीबाई गाडेकर स्मरणार्थ देण्यात येणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार राणी लक्ष्मीबाई कन्याशाळा वेंगुर्ल्याच्या शिक्षिका प्रतिमा पेडणेकर यांना तसेच अनिल सौदागर यांनी दिलेल्या देणगीतून देण्यात येणारा स्व.सुशिला सौदागर स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार (माध्यमिक विभाग) न्यू इंग्लिश स्कूल उभादाडांच्या शिक्षिका मनाली कुबल यांना तर रामकृष्ण जोशी यांच्या देणगीतून देण्यात येणारा सौ.गंगाबाई पांडुरंग जोशी स्मृती आदर्श शाळा पुरस्कार केपादेवी उभादांडा या शाळेस वेंगुर्ला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एस.एस.काळे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
अविद्य बालकाला सुविद्य करणे हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. पूर्वी शिक्षकांना गुरू मानले जायचे. कालांतराने गुरूचा गुरूजी आणि त्यानंतर मास्तर आणि आता टीचर असा बदल होत गेला. या सगळ्या बदलात आपले आचरण नीट ठेवणे महत्त्वाचे आहे. शिक्षकाला स्वतःचे मूल्यमापन करता आले पाहिजे असे उद्गार एस.एस.काळे यांनी काढले. आपल्या पेशाचा उद्देश साध्य करणाया लोकांना समाजापुढे आणले पाहिजे. त्यांचा झालेला सत्कार पाहून इतरांनाही उर्मी आली पाहिजे. त्यातूनच सर्वसामान्याला खरा फायदा असल्याचे अनिल सौदागर यांनी सांगितले.
पुरस्कार प्राप्त मनाली कुबल यांनी विद्यार्थी हेच माझे बळ आहे असे, तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत असे केपादेवी शाळेचे मुख्याध्यापक झिलू घाडी यांनी सांगितले. प्रतिमा पेडणेकर यांनी आपण विद्यार्थ्यांचे लेझिम पथक तयार करून मिळवून दिले असल्याचे तर आपल्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे कर्पूरगौर जाधव यांनी सांगितले.
प्रास्ताविक कार्यवाह कैवल्य पवार यांनी, पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा परिचय कार्यकारी सदस्य प्रा.महेश बोवलेकर यांनी करून दिला. यावेळी संस्थेचे कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, उपकार्यवाह माया परब, रमण किनळेकर, सत्यवान पेडणेकर, अनिल कुबल, जाधव, राजेश पेडणेकर, वीरधवल परब, तुषार कामत, मेहंदी बोवलेकर, गुरूदास मळीक यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.