व्याख्यानातून कालेलकरांच्या आठवणी जागृत

वेंगुर्ला न.प. आयोजित नाटककार, कथाकार, पटकथाकार व  गीतकार मधुसुदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मधुसुदन कालेलकरांच्या साहित्याचे व्यासंगी अभ्यासक व त्यांचे स्नेही रविप्रकाश कुलकर्णी यांनी व्याख्यानाद्वारे कालेलकरांच्या अनेक आठवणी जागृत केल्या. हा कार्यक्रम १० सप्टेंबर रोजी नाटककार मधुसुदन कालेलकर सभागृहामध्ये घेण्यात आला. न.प.ने नाटककार मधुसुदन कालेलकर यांच्या नावाने उभारलेले भव्य नाट्यगृह पाहून श्री.कुलकर्णी भारावून गेले. कालेलकरांच्या नाटकाची मुखपृष्ठे कोणाकडे उपलब्ध असतील तर ती आपल्यापर्यंत पोहचवा. आपण त्यांच्या मुखपृष्ठांचा संग्रह करुन त्यांची नाटके पुन्हा वेगळ्या ढंगात प्रकाशित करण्याचे आश्वासन रविप्रकाश कुलकर्णी यांनी दिले. वेंगुर्ला न.प.तर्फे जेव्हा संधीचे सोने होतेव किरात ट्रस्टतर्फे  वेंगुर्ला काल, आज आणि उद्याआदी पुस्तकांची भेटश्री. कुलकर्णी यांना देण्यात आली. याच कार्यक्रमात वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या रंगवाचाया त्रैमासिकाचे प्रकाशन रविप्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी सौ. कुलकर्णी, ज्येष्ठ निवेदक प्रसाद घाणेकर, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरातच्या संपादक सीमा मराठे यांनी केले.

Leave a Reply

Close Menu