सन १९५० पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या प्रोत्साहनातून देशांत निर्माण झालेल्या खादी उद्योग वा व्यवसायातील बनविलेल्या वस्तु विक्रीसाठीची शासकीय विक्री केंद्र अर्थात खादी भांडार अद्यापही कांही जिल्ह्यात झालेली नाहीत. यात सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले नारायण राणे यांना देशाच्या केंद्रीय मंत्री मंडळात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाच केबिनेट मंत्रीपद मिळालेले असल्याने मिळालेल्या या मंत्रीपदाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कौशल्य विकास आधारावर विविध व्यवसायातून बनविल्या जाणाया वस्तुंना जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे कुडाळ येथे शासकीय खादी भांडार सुरू करून अशा व्यावसायिकांना व ग्राहकांना दिलासा देण्याची गरज आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्यावर आधारित विकास कामांना विविध प्रकारे प्रोत्साहन देत आहेत. त्याअनुषंगाने देशात कौशल्यावर आधारित व्यवसाय करणाया उद्योग व व्यावसायिकांचे ते जेथे जेथे व्यवसाय करतात अशा ठिकाणी जाऊन खास सत्कारही करण्यात आले. त्याचा गवागवा मोठ्या प्रमाणांत झाला. त्यामुळे आतातरी आमच्या मालाला बाजारपेठ मिळेल अशी आशा या व्यावसायिकांत निर्माण झाली होती. मात्र त्या गोष्टीनंतर बराच कालावधी उलटला तरी कांहीच निर्माण झाले नसल्याने अशा व्यावसायिकांत नाराजी निर्माण झालेली आहे. देशांत अनेक ठिकाणी खादी भांडार माध्यमातून खांदीसह कौशल्य विकासाने बनविलेल्या वस्तुंचे विक्री केंद्र शासनामार्फत चालविले जात आहेत. आपल्या जवळपास असलेल्या बेळगांव येथे हे खादी भांडार विक्री केंद्र आहे. पण सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात नाही.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून अनेक दिग्गज केंद्रात खासदार म्हणून निवडून गेले. सत्तेतही सहभागी झाले. पण आपल्या मतदार संघात जे कौशल्य विकासावर आधारित असलेल्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचे काम झालेले नाही.
आज सुदैवाने केंद्राच्या शासनांत या जिल्ह्याचे सुपुत्र नारायण राणे हे सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग केबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांना या दोन्ही जिल्ह्यांचा चांगला अभ्यास आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कौशल्य विकासावर आधारित असलेल्या खादी व अन्य व्यवसाय हे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अखत्यारीत येत असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्यावर आधारित व्यवसायांना जे प्रोत्साहन दिलेले आहे, त्या अनुषंगाने या व्यावसायिकांना खरी गरज आहे ती उत्पादित केलेला माल विक्रीसाठी जिल्ह्यात शासनाच्या मदतीने चालविले जाणारे खादी भांडाराची.
शासनाच्या खादी भांडारात खादीच्या बनविलेल्या वस्तुत राष्ट्रीय तिरंगा ध्वज, खादीचा जॅकेट, शर्ट, पँट, कुर्ता, पायजमा, धोतर, पंचा, हातरूमाल, टोप्या, टॉवेल, साड्या, विविध सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू, साबण, शॅम्यु, फुड प्रॉडक्ट, बांबूपासून बनविलेल्या वस्तू, काथ्या व्यवसायांतील विविध वस्तू यासह अन्य प्रकारच्या कौशल्यावर आधारित बनविलेल्या वस्तू यांचा समावेश असतो.
शासनाच्या खादी भांडारात कौशल्यावर आधारित बनविलेल्या विविध स्वरूपाच्या वस्तू विकल्या जातात. त्यामध्ये ग्राहकांची फसवणूक होत नाही. १०० टक्के मालाची प्रत, दर्जा असतो. पण कांही परराज्यातील खादी व कौशल्यावर आधारित बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी खाजगी माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात. त्यांची प्रत व दर्जा याची शाश्वती नसते. कारण ते कांही दिवसांपुरतेच येतात आणि त्या वस्तूंची किमतही अव्वाच्या सव्वा लावली जाते. त्यामुळे अनेकांना या खादी उद्योगातील वस्तू घेणे परवडत नाही.
केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अशी खादी भांडारे सुरू करण्यात आलेली असल्याने त्या त्या ठिकाणच्या उद्योग वा व्यवसायांना उभारी मिळालेली आहे. मात्र यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यावसायिक व ग्राहक यांना केंद्र शासनाकडून न्याय मिळालेला नाही. अर्थात यासाठी पूर्वी प्रयत्नही झालेले नसावेत. मात्र आता केंद्रात आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र असलेले नारायण राणे यांचेकडे असलेले सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय हे अशा उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती म्हणजे कुडाळ किवा कणकवली येथे कौशल्य विकासावर आधारित व्यवसायातील बनविलेल्या वस्तू विक्रीचे केंद्र खादी भांडार सुरू करण्याची मागणी अशा व्यावसायिक व ग्राहकांतून केली जात आहे.
महात्मा गांधींनी धोतर, पंचा, टोपी नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॅकेट, कुर्ता, धोतर, टोपी या कपड्यांचा वापर केल्याने देशातील केंद्रात व राज्यातील मंत्री तसेच विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या खादींच्या कपड्याचा सर्रासपणे वापर करतात. त्यामुळे खादी उद्योगास चालना मिळत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता सिंधुदुर्गात खादी भांडार निर्माण होण्याची गरज आहे. त्यातून आपल्या जिल्ह्यातील व्यावसायिकांचा व ग्राहकांचा फायदा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कौशल्यावर आधारित अनेक व्यवसायांचा विकासही रोजगारमय होऊ शकेल.
– भरत सातोसकर, वेंगुर्ला ७५८८३४५०१६