आपला देश अनेक जाती, पंथ, धर्म यांच्या जडणघडणीतून निर्माण झाला आहे. जो तो आपली संस्कृती, परंपरा जपत आपापले सण साजरा करतात. परंतु, दिवाळी हा एक असा सण आहे की, तो सर्व जाती धर्मात, सर्व स्तरात साजरा केला जातो. दिवाळी म्हटलं की, बृहदारण्यक उप निषादमधील ‘असतो मा सत गमय तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम् गयम!‘ या सुभाषिताची प्रकर्षाने आठवण झाल्यावाचून रहात नाही. कारण तो मानवाला नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढतो, आशेकडे वाटचाल करायला शिकवतो, असत्याकडून सत्याकडे मार्गक्रमण करण्यास प्रोत्साहन देतो, मृत्यूपासून जीवनाकडे सकारात्मक वाटचाल करण्यास शिकवतो थोडक्यात म्हणजे मानवाला तिमिरातून प्रकाशाकडे नेतो असे मानले जाते. परंतु, सद्यस्थितीत मात्र खया अर्थाने हा सण सर्वसामान्यांच्या जीवनात साजरा होताना दिसतो का? या प्रश्नाचे उत्तर मात्र बहुतांशी नकारात्मकच मिळेल.
आपल्या देशाने नुकताच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पार पडला. गेल्या पंचाहत्तर वर्षाच्या कालखंडाचे अवलोकन केल्यास असे दिसून येईल की या कालखंडात देशाने अनेक चढ उतार पार करत सर्वांगीण प्रगती साधली आहे. पृथ्वीपासून अंतराळापर्यंत आपल्या प्रगतीची गरूड झेप घेतली आहे असे असले तरी सुद्धा इंडिया विरुद्ध भारत ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय विसंगती दुर्दैवाने पाहावयास मिळते. नव्हे तर त्यातील दरी दिवसेंदिवस रूंदावताना दिसते. एकीकडे पंचतारांकित संस्कृती तर दुसरीकडे उकिरड्यावर फेकून दिलेले अन्न मिष्टांन्न समजत पोटाची आग क्षमविणारी संस्कृती. केवढा हा विरोधाभास? सर्वसामान्य, मध्यम वर्गीय किंवा दलित पिडित, डोंगरकपारीत राहणारा समाज की जो अद्यापही जीवन जगताना अनेक मूलभूत समस्यांचा सामना करत आहे. नैराश्येच्या गर्तेत वावरत कष्टपद जीवन जगात आहे त्यांना खया अर्थाने दिवाळी साजरी करण्याचा अधिकार नाही का? याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
आपल्या देशाच्या लोकशाहीप्रणित राज्यघटनेनुसार देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार हक्क, प्राप्त होणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या भगवान बुद्धांच्या तत्वावर आधारित असलेल्या राज्य घटनेनुसार प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण होणे अपेक्षित आहे. कोणत्याही नागरिकाने कोणाच्याही दडपणाखाली जीवन न जगता मुक्तपणे जीवन जगणे अपेक्षित आहे. प्रत्येकाला रोटी, कपडा और मकान मिळणे गरजेचे आहे. घटनेने सर्व प्रदान केलेले अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळणे हा त्याचा घटनात्मक अधिकार आहे. तरच देशातील सर्व सामान्य जनता दिवाळी केवळ चारच दिवस साजरी न करता खया अर्थाने वर्षभर दिवाळी साजरी करेल.परंतु, देशाची आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहता येथे केवळ मृगजळाचाच भास होतो.
एकीकडे देशातील श्रीमंत वर्ग, भांडवलदार, राजकीय व्यक्ती दिवसेंदिवस श्रीमंत होताना दिसतात तर दुसरीकडे सर्वसामान्य, गरीब तळागाळातील नागरिक गरिबीकडे वाटचाल करताना दिसतो. तो महागाईच्या, बेकारीच्या आगडोंब वाढणाया शेतकयांच्या, सुशिक्षित बेकारांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार, प्रशासकीय व राजकीय क्षेत्रात वाढणारा भ्रष्टाचार, आपण म्हणू तेच खरं ही वाढणारी संकुचित विचारसरणी, धर्माधर्मात कलह निर्माण करत सर्वसामान्यांचे दिले जाणारे बळी एकंदरीत सामाजिक व राजकीय क्षेत्रात अस्थिरता निर्माण करणे व त्याचा गैरफायदा घेत समाज हिताच्या मूळ उद्देशांना बगल देण्याची निर्माण होणारी मानसिकता यासारख्या अनेक कारणांनी सर्वसामान्याच्या जीवनात गेल्या पंचाहत्तर वर्षांत ख-या अर्थाने दिवाळी साजरी झालीच नाही. इंडियामधील खया भारतात अद्यापही काही ठिकाणी स्वातंत्र्याची पहाट झालीच नाही हे कटू पण सत्य आहे याचा सर्वांगीणस्तरावर विचार होणे गरजेचे आहे तरच ‘तमसो मा ज्योतिर्गमय‘ हे सुभाषित खया अर्थाने सार्थकी लागत सर्वसामान्याच्या जीवनात दिवाळी साजरी होईल. – संजय तांबे, कणकवली