कर्नाटकातील यक्षगानाचा कानडी भाषेतून महाराष्ट्राच्या या किनारपट्टीवरील प्रदेशातील पहिला प्रयोग म्हणून 15 फेब्रुवारी 1986 या दिवशी नेोंद झाली. आपल्या जिल्ह्यातील आंदुर्ले या गावी श्रीदेवी चामुंडेश्वरीच्या मंदिरातील प्रांगणात यक्षगान प्रयोग संपन्न झाला होता.
कर्नाटकातील उडुपी येथील कन्नड भाषिक कलाकारांकरवी दि. 11, 12 व 13 मे 2024 रोजी अनुक्रमे सावंतवाडी, वेेंगुर्ला व आंदुर्ले या गावी याच यक्षगानाचा मराठी भाषेतून प्रयोग संपन्न होणार आहे. या निमित्ताने प्रा. विजयकुमार फातर्पेकर यांनी या लोककलेच्या 4 दशकाच्या अभ्यास नि संशोधनावर आधारित लिहिलेला हा संक्षिप्त स्वरुपातील लेख…
कालाचे अनादी अनंत रूप नृत्यमय आहे. त्यामुळे असेल प्रत्यक्ष जीवनातून नृत्याला वेगळे काढणे अशक्य असावे. आपण जीवन व्यतीत करीत असताना तालात पाऊल कसे टाकावे हे नृत्य शिकवित असते. जीवनातील लय, ताल आणि तोल सावरण्याचे कसब नृत्यच तर आपल्या तन-मनात रूजवत असते. दक्षिण कोकणातील आपला दशावतार, कर्नाटकातील सागरकिनाऱ्यावरील प्रदेशातील यक्षगान हेच सत्य आपल्या मनी मानसी बिंबवत असतात. ग्रामीण जीवनाशी अतूट नाते दर्शविणाऱ्या या लोककला होत.
कर्नाटकातील सागरकिनाऱ्या लगतच्या प्रदेशात प्रचलित असणारा यक्षगान हा नृत्यनाट्य प्रकार सुमारे साडे चारशे-पाचशे वर्षांपूर्वी रूजू झाला असावा असा एक अंदाज किंबहुना त्याही आधीपासून यक्षगानाच्या पाऊलखुणा काही पुरावे, घटना, इतिहासातून डोकावणाऱ्या, अस्पष्टसे का होईना आढळणाऱ्या नोंदी यातून संशोधकांना आढळतात. कर्नाटकातील मंगळुरू (दक्षिण कन्नडा), उडुपी, आणि कारवार (उत्तर कन्नडा) जिल्ह्यात हा लोककलाप्रकार मोठ्या प्रमाणात आपले अस्तित्व ठळकपणे दर्शवित असतो.
इंद्रधनुष्याच्या स्वर्गीय रंगसंगतीने साधलेली रंगभूषा व वेशभूषा, तालबद्ध पदन्यासातून साकारलेल्या नृत्यमय हालचाली, सुरेल शास्त्रोक्त सुरावटीत गायली जाणारी पद्यरचना, उत्स्फूर्त संवाद व त्याबरहुकूम आढळणारा मुद्राभिनय याचा सुरेख मेळ साधत रामायण महाभारत तथा विविध पुराणांतर्गत कथानकांवर आधारित आख्याने सादर करण्याकडे यक्षगानाची संपूर्ण भिस्त असते. महाभारतातील चक्रव्यूह, द्रोणपर्व, कर्णार्जुनयुध्द, कीचकवध, सुभद्राविवाह, विराटपर्व, द्रौपदी स्वयंवर ही कथानके सादर करण्याकडे यक्षगानाचा विशेष ओढा! रामायणांतर्गत रामराज्याभिषेक, जटायुवध, भरतभेट, लवांकुश युध्द, वाली-सुग्रीव युध्द ही कथानके त्यांच्या विशेष आवडीची. शिवाय भागवत, पद्मपुराण, स्कंदपुराण, जैमिनी भारत यातील कथानके, उपकथानके देखील सादर केली जातात. इ.स. 1400 ते 1500 यादरम्यान या विविध कथानकातील प्रसंग त्यातील काव्यरचनांसह कानडी भाषेतून लिहिलेली आढळून आली आहेत. यक्षगानाची सुरूवात साडेचारशे-पाचशे वर्षांपूर्वी झाली असावी असा जो अंदाज व्यक्त केला जातो त्यामागील कारण हेच असावे. पुराणांतील युध्द अथवा विवाह प्रसंगावर आधारित कथानके यक्षगानाची विशेष आवडीची! साहजिकच वीर, रौद्र, शृंगार तथा करूण रसावर आधारित यक्षगानातील काव्यरचना, गायन तसेच नृत्यातून अत्यंत प्रभावीरित्या व्यक्त करण्याकडे त्यातील कलाकारांचा प्रयत्न असतो. कारण त्यामुळेच तर प्रेक्षकावर त्यातील भावभावनांचा अधिक प्रभाव पडू शकतो. सर्वसामान्यांच्या मनीमानसी कथानकातील प्रसंगांचा नेमका परिणाम साधला जातो. शिवाय संवादाची जोड तर असतेच.
गायन व वादन हा यक्षगानाचा प्राण म्हणावयास हवा. यक्षगान कलाकारांच्या समूहाचा भागवत हा मुख्य सूत्रधार! भागवत हातातील टाळ तालबध्दरित्या वाजवत गात असतो नि कथानकाला गती प्राप्त होत जाते. हिंदुस्थानी तथा कर्नाटकी संगीतातील जवळपास एकशेदहा विविध रागांवर आधारित असे हे संगीत. काही अप्रचलित रागही आढळतात. ते यक्षगान शैलीतील संगीत असावे असा एक अंदाज वर्तविला जातो. गायनाला साथ असते ती टाळ, मड्डले (मृदंगासारखे परंतु आकाराने लहान असे तालवाद्य), चंडे (हे देखील तालवाद्य) आणि श्रुती (हार्मोनियम) या वाद्यांची. काही पात्रांचा रंगमंचावर होणारा प्रवेश, युध्दाचे प्रसंग, तीव्र संघर्ष, राग, क्रौर्य, शौर्य अशासारख्या गोष्टी अधिक परिणामकारक रंगस्थळी दिसाव्यात यासाठी चंडे विशिष्ट लकबीने व खुबीने वाजविले जाते. 15 इंच उंची आणि 10 इंच व्यास असलेले माडाच्या बुंध्यापासून तयार केलेले दंडगोलाकृती आकाराचे हे वाद्य होय. ते एखाद्या चौरंगावर ठेवले जाते व वाजविणारा दोन्ही हातात छोट्या दोन काठ्या घेऊन ऊंच अशा आसनावर स्वतः बसून ते वाजवित असतो. मडले आणि चंडेच्या तालावर नि भागवतांच्या हातातील झांजेच्या विशिष्ट ठेक्यानुसार रंगस्थळी विविध पात्रांच्या नृत्यमय हालचाली पाहणे ही एक वेगळाच आनंद देणारी चीज होय. श्रुतीचा उपयोग गायक भागवतला एक सूर देण्यापुरताच असतो.
सादर होणाऱ्या आख्यानातील प्रत्येक नवीन व्यक्तिरेखा रंगस्थळी जेव्हा प्रथम अवतरते तेव्हा त्याचा प्रेक्षकांना परिचय करून देण्यासाठी विशिष्ट नृत्यात्मक आकृतिबंधाचा आधार घेतला जातो. ते अतिशय मोहक नि चित्तवेधक असते. वास्तविक यक्षगानशैलीतील नृत्याला यक्षगानाचा आत्मा असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अप्रतिम पदलालित्य आणि उत्कट मुद्राभिनय तथा देहबोलीद्वारे कथानकातील पात्रांचे स्वभावविशेष, आनंद, दुःख, शौर्य, क्रौर्य सर्व काही अभिनय, संगीत नि नृत्यातून साकारण्याचे सामर्थ्य यक्षगानात आढळते. तेव्हा प्रत्येक यक्षगान कलाकाराचे ठायी नृत्यनैपुण्य नसले तरी नृत्याची बऱ्यापैकी जाण असणे आवश्यक असते. त्याशिवाय कलाकार रंगस्थळापर्यंत जाऊच शकत नाही, इंद्रधनुष्याचे सारे उत्कट नि गहिरे रंग ओतून साकारलेली रंगभूषा व वेषभूषा हे देखील यक्षगानाचे खास वैशिष्ट्य मानता येईल. तांबड्या, नारिंगी, पिवळ्या, निळ्या, काळ्या अशा गडद परंतु कलात्मक आणि आकर्षक रंगसंगतीचा रंगभूषा नि वेशभूषेत प्रादुर्भाव दिसून येतो. पुन्हा कलाकार आपली रंगभूषा स्वतःच करतो. वैशिष्ट्यपूर्ण रंगभूषा व विविध पात्रांची वैविध्यपूर्ण आकर्षक शिरोभूषणे ही तर यक्षगानाची खासियत मानायला हवी. यक्षगान खेळापूर्वी किमान दोन-अडीच तास त्यांना आपल्या रंगभूषा तथा वेशभूषेसाठी का लागतात हे प्रत्यक्ष जेव्हा आपण त्यांना रंगस्थळी पाहतो तेव्हाच उमगू शकते.
अशा या यक्षगानाचा सिंधुदुर्ग (किंबहुना महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीतील भूप्रदेशात) जिल्ह्यातील पहिला खेळ म्हणून नोंद होईल 15 फेब्रुवारी 1986 या दिवसाची! त्या दिवशी कुडाळ जवळील पाट-परूळेला जाणाऱ्या रस्त्यावरील आंदुर्ले गावी श्रीचामुंडेश्वरी देवी मंदिराच्या प्रांगणात वार्षिकोत्सवाप्रसंगी यक्षगानाचा खेळ प्रचंड गर्दीत सादर झाला होता. आख्यान कानडी भाषेत होते. तब्बल चार तासाचा कार्यक्रम होता. कलाकार मंडळी होती उडुपीजवळील चेर्काडी इथली कुडाळ देशकर कला संघ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या समूहाची. मूळ कोकणातील, तीदेखील पाट-परूळ्याकडची ही मंडळी होत. कधीतरी त्यांचे पूर्वज दीड-दोनशे वर्षापूर्वी कर्नाटकातील त्या भागात स्थलांतरीत झाले असावे. त्यांची नावेदेखील पाटील, पाटकर, प्रभू, सामंत अशीच आहेत. त्यांची कुलदेवता आंदुर्ल्याची श्रीचामुंडेश्वरीदेवी! त्यांना आंदुर्ल्याच्या या मंदिराच्या व्यवस्थापन समितीकडून आमंत्रित केले होते. 1986 च्या फेब्रुवारी महिन्यात प्रथमच ही मंडळी या भागात येत होती. या यक्षगान खेळाच्या आयोजनात मी देखील होतो. यक्षगानाची माहिती देणारे एक छापील माहितीपत्रक मी त्यावेळी प्रेक्षकांत वाटले होते. प्रत्यक्ष खेळासमयी प्रेक्षकांत बसून ध्वनिक्षेपकावरून रंगस्थळी कानडीतून चाललेल्या संवादांचा गोषवारा मी मराठीत देत होतो. भारावल्या मनाने प्रेक्षक तल्लीन होऊन कलाकारांना दाद देत होते. हा सारा माहोल पाहून त्यावेळी सर्वप्रथम मला जाणवले की अस्सल कलाकृती यक्षगान तथा दशावतारादी लोककला शब्दांच्याही पलिकडल्या असतात. भाषा, प्रांत, पंथ, धर्म, भौगोलिक सीमा या सर्वांच्याही पलिकडे जात या लोककला अंतःकरणाचा ठाव घेत असतात. हा एक अपूर्व आनंद देणारा अनुभव होता. अशीच अनुभूती आमचा दशावतार जेव्हा उडुपीच्या महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजच्या नाट्यगृहात 9 ऑक्टोबर 2006 रोजी झाला, त्यावेळी मला प्राप्त झाली होती.
आता पुन्हा तोच आनंद आपण सारे, वेंगुर्ले नि परिसरातील रसिकजन मिळवणार आहोत. दिनांक 12 मे 2024 रोजी सायंकाळी ठीक सात वाजता आपल्या वेंगुर्ले शहरी, नाटककार मधुसुदन कालेलकर नाट्यगृहात, रसिकजनांसाठी उडुपीच्या यक्षसंजीवा यक्षगान केंद्राचे निष्णात कलाकार चक्रव्यूह हा महाभारतातील एका घटनेवर आधारित यक्षगानाचा खेळ सादर करीत आहेत. प्रयोग आहे चक्क मराठी भाषेत. त्यातील संवाद व पद्यरचना कानडीतून मराठीत अनुवादित केली आहे सावंतवाडीचे प्रा. विजयकुमार फातर्पेकर यांनी. उडुपीच्या या कन्नड भाषिक कलाकारांना मराठी भाषेत बोलतंही केले आहे त्यांनीच. नृत्य नि अभिनयाचे मार्गदर्शन आहे गुरू संजीव सुवर्णा यांचे, जे राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर यक्षगानाचे धडे अनेक देशात देत आले आहेत. ज्ञानपीठ पारितोषकाने सन्मानित, सुप्रसिध्द साहित्यिक तथा यक्षगानाचे गाढे अभ्यासक डॉ. कोटा शिवराम कारंत यांचे ते पट्टशिष्य मानले जातात.
वेंगुर्ले शहरी सादर होणारा हा खेळ नाईक-मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोकनाट्य मंडळाचे श्री. तुषार नाईक यांच्या सहकार्याने आयोजित होत आहे. ही एक अत्यानंदाची गोष्ट आहे. दोन भिन्न प्रदेशातील भिन्नभाषिक लोककला नि लोककलाकारांची ही गळाभेट होणार असे म्हटल्यास वावगे वाटू नये. कन्नड नि मराठी या दोन भाषाभगिनी त्याप्रित्यर्थ रंगस्थळी अवतरणार आहेत. आजवरचा अनुभव पाहता वेंगुर्ला व परिसरातील रसिकजन मोठ्या संख्येने येऊन या अभिनव प्रयोगातील कलाकारांना दाद देतील हे निःसंशय.
– विजयकुमार फातर्पेकर, 9422964040