‘अरे xxxxx,’ त्यांच्या त्या काठीच्या फटक्यापेक्षा खूप जिव्हारी लागला तो शिव्यांचा वार. ‘चोर नाय आसय वो मी….’ डोळ्यातून घळघळणाऱ्या अश्रूंना रोखण्यासाठी एक हात मी डोळ्यांजवळ घेतल्याने पाठीवर पडणारे काठीचे फटके मी रोखू शकत नसतानाच मी चोर किंवा भिकारी नाही हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. अंगावर फाटके कपडे, पाठीवर आंब्याच्या बाटांनी अर्धवट भरलेली पिशवी आणि त्या आंब्याच्या बाटांमधून निघणाऱ्या स्त्रावांनी घाण झालेले माझे कपडे यामुळे ती व्यक्ती माझ्या शब्दांवर विश्वास ठेवायलाच तयार नव्हती.
“थांबा बाबा… चोर नाही तो, माझा वर्गमित्र आहे तो. वर्गात माझ्यापेक्षा सुध्दा चांगले मार्क असतात त्याला. तो मेहनत करतोय, चोरी नाही.” कुठेतरी खेळायला गेलेला मित्र नेमका त्यावेळी घरी आल्याने माझी सुटका झाली. आपल्या मुलाची वाक्य पूर्ण होऊन सुध्दा अजून दोन काठीचे फटके माझ्या पाठीवर लगावून रागाने (कि अजून कश्याने) लालबुंद झालेल्या डोळ्याने माझ्याकडे बघत बघत ते गृहस्थ आपल्या घरात निघून गेले.
मे महिन्यात शाळेला सुट्टी पडली की लोकांनी आंबा खावून टाकलेली आंब्याची कोय/बाटी गोळा करायची आणि शेकडा सात-आठ रुपये या दराने ती विकायची हा अस्मादिकांचा बालपणीचा उपक्रम. दत्त मंदिरासमोर खर्डेकर रोडवर नर्सरीवाली ती ताई विकत घ्यायची आमच्याकडून अशा आंब्याचा बाटा. शिक्षणासाठी चाललेली माझी ती धडपड पाहून त्यातील काही निकामी बाटा माहित असूनसुध्दा बाजूला करायची नाही. एक-दोन रुपयांच्या नोटा आणि काही चिल्लर घेऊन मग अस्मादिकांची स्वारी घरी येऊन जून्या वहीच्या पानात हे पैसे साठवून ठेवायची. वहीची किंवा पुस्तकांची पाने हिच आमुची बँक असायची. या बँकेत महिनाभर जमेल तसे आंब्याची बाटी विकून मिळालेले पैसे साठवायचे आणि पुढच्या वर्षीच्या वह्यांची तजवीज करायची. मागच्या वर्षीच्या वह्यांची शिल्लक राहिलेल्या पानांपासून तयार झालेली एकतरी वही त्याकाळी प्रत्येकाच्या दप्तरात आढळायचीच. ही वही बायडींग करण्यासाठी सुध्दा पैसे लागायचेच, यासाठी सुध्दा पैशाची तजवीज करायला लागायची.
मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात आंब्याचा बाटा गोळा करताना बरेवाईट अनुभव यायचे. काही अनुभव कैरीसारखे आंबट तर काही अनुभव हापूस आंब्यासारखे गोड. ह्या आंबट-गोड अनुभवाच्या शिदोरीचा पुढील आयुष्यात खूप आधार वाटला. विस्कटलेले केस, अनवाणी पाय, दुसऱ्याने वापरलेले जुने कपडे – हे कपडे मापाचे कधीच नसायचे, ढगळम-पगळम त्यात थोडेसे फाटलेले किंवा ठिगळ लावलेले, पाठीवर गोणत्याची पिशवी, त्यातून ओघळणारा आंब्याच्या बाट्यांचा ओंगळवाणा रस, त्याची दुर्गंधी अशा अवतारात फिरताना अस्मादिकांची मुर्ती पाहून बरेचजणांचा गैरसमज व्हायचा. कुणी भिकारी किंवा चोर समजून हाकलून लावायचा, तर कुणी हा चोरी तर करणार नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या परसातून मी बाहेर पडेपर्यंत लांबून वॉच ठेवून असायचा. कुणी दयाळू त्यांच्या परसात कुठे कुठे आंब्याचा बाट्या पडला आहे हे दाखवण्यासाठी पुढे सरसवायचा, मला मदत आणि त्यानिमित्ताने त्यांचे अंगण साफ हा दुहेरी हेतूही असायचा त्यांचा.
लोकांच्या परसदारात, अंगणात, रस्त्यावर, कचऱ्याच्या कुंडीत आंबा खावून टाकलेला बाटा आढळायचा. कधी बागेत गुरांनी आंबा चघळून थुंकलेला बाटाही मिळायचा. त्यावेळच्या माझ्यापेक्षा मोठा असलेल्या एका मित्रामुळे मला हा ‘व्यवसाय’ समजला. थोडसे घाबरत आणि बरेचसे लाजतच आपणही चार पैशे कमवू शकू या भावनेन आंब्याचा बाटा गोळा करुन तो विकण्याचे मी ठरवले. विक्रीसाठी गिऱ्हाईक शोधण्याचे कारणच नव्हते, नर्सरीवाले किंवा काही खरेदीदार अशी खरेदी करण्यासाठी मे महिन्यात तात्पुरते शेड उभारायचे. विक्रीचे काम सोपे होते, त्यात ती ताई फारच मायाळू होती. त्यामुळे बालपणीतील अस्मादिकांच्या या व्यवसायातील अर्धा भाग खूपच सुलभ होता.
असेच एके दिवशी बाटा शोधताना मला माझ्या वर्गातील एका मित्राने पाहिले. आधीच मोठे असलेले डोळे अजूनच विस्फारले. ‘संजू… काय करतोस तू हे’, बेळगावी वळणाच्या मराठीत त्याच्या प्रश्नांचा भडीमार सुरु झाला. परंतु या घाणेरड्या वाटणाऱ्या माझ्या कामामुळे त्याला माझी किळस न वाटता दयाच आली. ‘आमच्या अंगणात ये तीथे बराच बाटा पडलेला असतो’ असे सुचवून तो खेळायला निघून गेला. माझा हा वर्गमित्र मुळचा बेळगावचा, सरकारी नोकरीत त्याचे वडील असल्याने बदली झाल्याने तो वेंगुर्ल्यात काही काळ वास्तव्यासाठी होता. पुढे त्याची आणि माझी कधी भेट झाली नाही. परंतु हा प्रसंग माझ्या मनावर कोरला गेला असल्याने कायम आठवतो. त्याने सांगितल्यामुळे त्याच्या अंगणात बरेचवेळा बाटा गोळा करायला गेलो होतो. तो घरात असायचा तेव्हा मला त्याच्या परसातील बाटा शोधायला मदत देखील करायचा. त्या दिवशी रविवार वा कोणता तरी सरकारी सुट्टीचा वार असल्याने त्याचे वडील घरात होते आणि मित्र कुठेतरी फिरायला किंवा खेळायला गेला होता. नेहमीच्या सवयीने मी त्याच्या परसात आंब्याचा बाटा शोधत असतानाच कुणीतरी परसात आल्याची चाहुल त्याच्या वडीलांना लागली आणि ते बाहेर आले. माझे एकंदर रुप पाहून त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी मला फटकावयाला सुरुवात केली.
दोष त्यांचा नव्हताच, माझे बाह्यरुपच असे होते की त्यांचा गैरसमज होणे स्वाभाविकच होते. वरील एकाच प्रसंगात मला तिरस्कार आणि प्रेम यांची रुपे अनुभवायला मिळाली. बाह्यरुप पाहून तिरस्कार करणारे वयाने परिपक्व असलेले माझे मित्राचे वडील आणि आपल्याच वर्गात असणाऱ्या एका मुलाच्या जगण्यासाठीचा संघर्ष पाहून सहानभुती दाखवणारा त्यांचा अल्पवयीन (म्हणजे माझ्या वयाचा) मुलगा या दोघांनी मला मानवी स्वभावाची विविधरुपे त्यावेळी दाखवली. मला त्या गृहस्थाचा तेव्हाही राग आला नव्हता आणि आताही नाही.
त्यावेळी गोळा करुन मी विकलेल्या बाटां पासून नर्सरी वाल्याने कलमे बनवली असतील, त्यातील काही कलमे आता आंब्याचे वृक्ष होऊन आंब्याचा गोडवा कुणाला ना कुणाला देत असतील. मला त्या आंब्याच्या बाटांनी शिक्षणासाठी संघर्ष करताना मदतीचा हात दिला. या शिक्षणाने रोजगाराचे साधन दिले, तेही सरकारी नोकरी. सरकारी नोकरी करताना आपल्या ड्युटीचा भाग असलेल्या कामातून जनतेची सेवा करण्याचे भाग्यही लाभले. आता निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतन देताना कुणाला ना कुणाला मदत होतच असते. त्यांना ते मी केलेले उपकार वाटत असतात, परंतु उपकार नसून ते माझे कर्तव्यच असते. सरकार पगार देते मला याबद्दल, पण तरीही काही वयोवृध्द थरथरते हात मला ‘साहेब’ म्हणत माझ्या समोर जोडले जातात. मी खजील होऊन जातो, एका सरकारी माणसाने माझे बाह्यरुप पाहून चोर समजून फटके देणारे हात आणि आता आभारासाठी जोडले जाणारे हात (माझी लायकी नसतानाही) मला या जगातील ‘श्रीमंत’ माणूस बनवून जातात.
आंब्याच्या या टाकाऊ असणाऱ्या भागाने मला आज श्रीमंत साहेब बनवून टाकले. फळांच्या राजाचे हे अनोखेरुप तुमच्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो.
– संजय गोविंद घोगळे, 8655178247