पर्यावरण शिक्षण-संवर्धनासाठी सामंजस्य करार!

स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय एनएसएसच्या व इतर विभागांच्या माध्यमातून मालवण तालुका परिसरात सातत्याने स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण जनजागृती, निसर्ग संवर्धन या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी घेत असते. तसेच मालवणमधील पर्यावरण चळवळीतील अग्रणी संस्था युथ बिट्स फॉर क्लायमेटगेली काही वर्षे बीच क्लिनअप, वाढत्या तापमानाबद्दल जाणीवजागृती, इकोमेट्सच्या माध्यमातून निसर्ग सहली असे उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन १३ जून रोजी सामंजस्य करारावर सह्या केल्या. निसर्ग, पर्यावरण संवर्धन व संरक्षण या उद्देशाने दोन्ही संस्था यापुढे एकत्रितपणे विविध, अभिनव, उपक्रम राबविणार आहेत. मालवण परिसराचा पर्यावरण शिक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने महाविद्यालयाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे मत प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर यांनी  करारावर सही करताना व्यक्त केले. युथ बिट्स फॉर क्लायमेटच्यावतीने अध्यक्ष स्वाती पारकर यांनी सही केली. दोन्ही संस्था कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी एकत्रितपणे निसर्गविषयक चर्चासत्रे, शिबिरे, सहली, क्षेत्र भेटी, स्वच्छता अभियान, निसर्ग शिक्षण, स्पर्धा, निसर्ग संवर्धन आणि संशोधन असे उपक्रम राबविणार असल्याची माहिती अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ.सुमेधा नाईक यांनी दिली. कैलास साळुंके, स्वाती पारकर, नेहा कोळंबकर व महेश काळसेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu