मराठी नको

आपण नेहमीच बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोंढ्यांबद्दल हिरीरीने बोलत असतो. आपले राजकीय पक्ष तर लगेच मराठी अस्मिता पणाला लागल्यासारखे तळमळत असतात. परप्रांतीयांना शिव्या हासडणे सर्वात सोपे काम आहे पण मराठी माणसाची बुडबुड्यासारखी फुगलेली अस्मिता थोडी बाजूला ठेवून शांतपणे विचार करा की “मराठी तरूण नक्की करतो काय?”

      परवा एक नोकरीसाठी जाहिरात बघितली ज्यात असं स्पष्ट लिहिलं होतं की मराठी मुलं नकोत. वाचून त्रास झाला; वाईट वाटलं. नंतर असंही कळलं की ज्या बाईने ती जाहिरात केली होती तिने ती डिलीट केली आणि माफी मागितली. नंतर कोणीतरी सांगितलं की ते अकाऊंटच फेक होतं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करावं.

      मी जरी कितीही विचार करायचं नाही ठरवलं तरी एक गोष्ट मनातून जात नव्हती. मराठी मुलं का नको असतील?

      जरा महाराष्ट्राची, मराठी माणसाची बुडबुड्यासारखी फुगलेली अस्मिता थोडी बाजूला ठेवून शांतपणे विचार केला तर आपल्या दैनंदिन जीवनात सकाळच्या दूध, वर्तमानपत्रापासून रात्री रिक्षा, टॅक्सीने घरी येईपर्यंत किती व्यवसाय किती स्थानिक मराठी मुलांना करावेसे वाटतात याचा खरंच आढावा घेतला पाहिजे.

      भारत सरकार Skill India च्या आधारे तरुण मुलांना कारागीर होण्याचे प्रशिक्षण देण्याबद्दल प्रयत्न करतेय. पण अशा कारागीर दर्जाचे काम करणारी मराठी मुले अत्यंत तुरळकच दिसतात. इतक्या व्यवसायाच्या संधी आहेत पण त्या मिळवाव्यात असं वाटतच नाही स्थानिकांना? कुठून कुठून राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आंध्र, बंगाल किंवा अगदी काश्‍मिरी किंवा उत्तर पूर्व राज्यांमधून सुद्धा मुलं येतात.

      या लोकांना राहायला जागा नसते, जेवण करून घालायला कुणी नसते. कुठेतरी पथारी पसरतात, वडापाव, मिसळ किंवा पोहे खातात, बसमधून सामान घेऊन 15-20 किमी दूरपर्यंत रोजचा प्रवास करतात. नीट काम पण येत नसलं तर कारागिराच्या हाताखाली शिव्या खात खात पडेल ते काम करत ते काम शिकून घेतात, पण अल्पावधीत जम बसवतात. नंतर स्वत: लहानमोठी कामे घ्यायला लागतात आणि त्यांचं एक ब्रीद असते आणि ते म्हणजे कुठच्याही कामाला नाही म्हणायचे नाही. तुम्हाला प्लंबर, सुतार, गवंडी, पेंटर कोणीही हवा असेल तर देऊ ना साहेब म्हणत काम अंगावर घेतात आणि मित्राला ते काम देऊन त्यालाही व्यवसाय देतात. तेच काम त्यांचा मित्र पण त्यांच्यासाठी करतो. नकळत या सगळ्या व्यावसायिकांची अनरजिस्टर्ड कंपनी तयार होते.

      पण इथल्या स्थानिकांना, मराठी मुलांना स्वत:च्या घरात राहून, घरचं खाऊन अशी कामं का करावीशी वाटू नयेत? कुठल्याही कारागिराला दिवसाला 500 ते 1000 रुपये मिळतात. अंगावर काम घेतले तर अजून जास्त मोबदला मिळवत असतील. ही कामे शिकायला काय अपमान वाटतो का मराठी मुलांना? अशा व्यवसायात मराठी मुले दिसतच नाहीत.

      आपण नेहमीच बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोंढ्यांबद्दल हिरीरीने बोलत असतो. आपले राजकीय पक्ष तर लगेच मराठी अस्मिता पणाला लागल्यासारखे तळमळत असतात. आणि ‘बाहेरचे लोक आले नाहीत तर मुंबई बंद पडेल’ असं कोणी म्हटलं की अनेकांची तळपायाची आग मस्तकात जाते.

      अगदी साधं सोसायटींचे रखवालदार म्हणूनही आठ-दहा हजार कुठे जात नाहीत, मग मराठी मुले अगदी घरी बसून राहण्यापेक्षा अशी कामे का स्वीकारत नाहीत? काहीही न कमावता नाक्यावर टवाळगिरी करण्यात धन्यता मानण्यापेक्षा काही कारागिरी का शिकत नाहीत? अशी कामे का करत नाहीत? केवळ टर्रेबाजी करत आणि आमची कामं घेतली, आमच्या कामांवर गदा आणली असा फालतू टाहो का फोडता? त्यासाठी एक तर हे व्यवसाय तुमचे असायला नकोत का? जे व्यवसाय तुम्ही स्वतःचे करायचा विचारच केला नाही त्यामुळे ते दुसऱ्या लोकांनी बळकावले असं कसं म्हणता येईल? आधी एकही कारागिरीचा व्यवसाय शिकायचा नाही, करायचा नाही आणि परप्रांतीय मुले ते व्यवसाय घेतात त्यांच्या नावाने, तेवढ्यापुरती ओरडाआरड करायची आणि पुन्हा सगळं शांत!!

      परप्रांतीयांना शिव्या हासडणे सर्वात सोपे काम आहे पण आम्ही आधी स्वत:मध्ये तर डोकावून पहायला तयार आहोत का हा कळीचा मुद्दा आहे.

      आणि हो, एक गोष्ट विसरलोच, दरवर्षी गुरूपौर्णिमेच्या दिवशी 10-15 नवीन गोविंदा पथकं जन्माला येतात. मग एक महिना गोविंदा सराव. त्यासाठी आकर्षक टिशर्ट बनवण्यासाठी धावपळ. या सराव शिबीरापासून प्रत्यक्ष गोविंदाच्या दिवसापर्यंत काही मुलं पडून जायबंदी होतात ते आहेच. दरवर्षी गुरूपौर्णिमेच्या दिवशी 10-15 नवीन ढोलताशा पथकं जन्माला येतात. त्यांचा मग एक महिना ढोलताशा सराव चालू होतो. पुन्हा त्यासाठी आकर्षक टिशर्ट बनवण्यासाठी धावपळ. पुन्हा यातसुद्धा प्रचंड संख्येनी मराठी मुलं-मुली गुंतलेली असतात. त्याचवेळी गणेशोत्सवाची लगबग सुरू झालेली असते. प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक मंडळाचा एक राजा असतो. त्या राजाला आणण्यासाठी ट्रॉली बनवण्याची धावफळ. मग सुरू होतं मंडप पूजन, पाद्य पूजन, पाट पूजन, आगमन सोहळा असा एक नवीन खेळ. इथेही पुन्हा आकर्षक टिशर्ट असतातच. यात पुन्हा मोठ्या संख्येने मराठी तरूण-तरूणी गुंतली जातात.

      पण आश्‍चर्य हे आहे की सहा महिने किंवा वर्षभर चालणाऱ्या गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये मोल्डींग-कास्टिंग करायला जे कामगार काम करत आहेत त्यात 80% उत्तर भारतीय आणि मुस्लिम आहेत. यात भर म्हणून कामावर रजा टाकून किंवा असलेली नोकरी सोडून गणपतीसाठी गावाला जाणारी एक जमात! गणपतीचे 11 दिवस. त्यातली जागरणं. तोवर येतं नवरात्र. पुन्हा प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक मंडळाची आई असते, कुणाची माऊली असते. पुन्हा तेच सगळं. हे झालं की दिवाळी.. ती संपली की महाराष्ट्रात चालू होतो तो साई पदयात्रांचा उत्सव. 8-10 दिवस चालत शिर्डीला जायचं वेड. आल्यानंतर पायात गोळे आलेले असतात म्हणून 2-3 दिवस आराम. नंतर साई पालख्या, साई भंडारे हे सर्वत्र सुरू होतं. त्यापाठोपाठ गल्लीगल्लीत होणाऱ्या सार्वजनिक श्री सत्यनारायणाच्या महापूजा. यामध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या तरूण-तरूणींचे सहा महिने निघून जातात.

      नंतर आम्हाला जाग येते तेव्हा कळतं अरे या कॉर्पोरेट युगात आम्हाला कोण किंमतच देत नाही. मग त्याचं खापर आता कोणावर फोडायचं? तर मग आहेत गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय. हे लोक आम्हाला कामं करू देत नाहीत.

      मग “मराठी तरूण काय करतो काय?” मराठी तरुण चळवळी, संघटना आणि युनियन, क्रांती मोर्चा, ब्रिगेड बांधण्यात व्यस्त असतो. सार्वजनिक दहीहंडी आणि गणपती अशा अतिमहत्त्वाच्या कामात व्यग्र असतो. मिरवणुका काढणे, राजकारण्यांच्या हाताखाली कार्यकर्ते म्हणून नाचणे, शिवाजी राजे-टिळक -आंबेडकर याबद्दलचे वाद असे जीवन मरणाचे प्रश्‍न असताना “मी कुठला धंदा करु“ याचा विचार करायला वेळच नाही. पण मग परप्रांतियांच्या नावाने खडे फोडू नये.

      मराठी मुलाच्या आयुष्याची इतिकर्तव्यता काय? कुठल्या तरी राजकारण्याची शेपूट पकडून धावत सुटायचं आणि एखाद्या फ्लेक्सवर पन्नास नावांमध्ये आपलं नाव येणं. टर्रेगिरी करत फिरायचं आणि कधीतरी आपले साहेब आपल्याकडे बघतील या आशेवर जगत राहायचं.

      आमच्या मराठी मुलांना-मुलींना हे कोणी सांगेल का, की महिनोंमहिने तुम्ही तुमचा वेळ, तुमची शक्ती ज्यासाठी वाया घालवतांय त्याचा तुमच्या करिअरला काडीचाही फायदा नाही. आणि नेमकं त्यातच तुम्हाला जास्त रस आहे. उगाच इतरांच्या नावाने गळे काढण्यापेक्षा आधी आपण नेमकं कुठे कमी पडतोय याचा शोध घेतला तर कोणत्या ऑफिसमध्ये मराठी मुलं नकोत असा नियम लावायची गरज भासणार नाही. फक्त मराठी मुलांच्या बाबतीत हे का होतं? याचा विचार कधी करायचा? करायचा की नाही?

      दुसऱ्या बाजूला असेही दिसते की नाभिक, सुतार, गवंडी, इलेक्ट्रिशियन, मसाज करणारा, ऍमेझॉन किंवा स्वीगीसारख्या कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय, ओला किंवा उबर टॅक्सीचालक यांचे उत्पन्न बरेच जास्त असते, पण त्यांच्या कामाचा दर्जा हीन समजला जातो. तसेच शहरात कुत्र्याला फिरवून आणणे हा एक मोठा व्यवसाय आहे पण दर्जाहीन. आज भंगारवाला अथवा कबाडी किती पैसे कमावतो याचा अंदाज करणे अशक्य आहे पण त्याला सामाजिक स्थान शून्य.

      पाश्‍चिमात्य देशात कुठल्याही कामाला कमी लेखले जात नाही, कारण तिथे dignity of labour आहे आणि जे आपल्याकडे अस्तित्वातच नाही. त्याच बरोबरीने मी असे एक धाडसी विधान करतो की – Employement is inversely proportional to education. जेवढे तुम्ही जास्त शिकता तेव्हढे रोजगाराचे आणि मिळकतीचे मार्ग कमी कमी होऊ लागतात. कारण कुठलाही जॉब करायला आपल्याला स्वतःलाच लाज वाटू लागते.

      पूर्वी मी एक पोस्ट वाचली होती की ज्याचे शीर्षक होते – ‘उगीच कशाला?’ मला त्याची आठवण झाली.

      ‘उगीच कशाला’ हे दोन शब्द सगळ्या मराठी लोकांच्या स्वप्नांची राखरांगोळी करतात. असा एकही मराठी माणूस नसेल ज्याने हे दोन शब्द ऐकलेले नाहीत. पालक, मित्र, शिक्षक, नातेवाईक हे शब्द सर्रास तुमच्या तोंडावर फेकतात. बरं ते सांगताना तुम्ही भव्य दिव्य असे काहीही करायचा विचार करत नसता. झाडावर चढू का? काहीतरी व्यवसाय करण्याचा मानस आहे, पोलंडची ट्रिप करण्याचा विचार आहे, बाहेरून जेवण मागवू का? सगळ्या गोष्टींना एकच रिस्पॉन्स उगीच कशाला? या दोन शब्दांनी मराठी मुलांची पार वाट लावली आहे. त्यांच्यातील सगळी कल्पकता मारली जाऊन ते प्रचंड आळशी होतात आणि महत्वाकांक्षेचा पार चुथडा होतो. याच कारणामुळे असेल कदाचित पण धंद्यात मराठी मुले जवळजवळ दिसत नाहीत. चांगली पगाराची नोकरी मिळवणे हीच आयुष्याची इतिकर्तव्यता. काही आयुष्यात वेगळे करण्याची किंवा कसलाही धोका पत्करायची मानसिकताच नाही.

      आम्ही लहानपणापासून काय ऐकत आलो? शिवाजी जन्मला पाहिजे पण शेजारच्या घरी. कारण अशा मुलाला सांभाळण्याची मानसिक कुवतच आमच्याकडे नाही. गंमतीतच बोलायचे म्हणजे जर महात्मा फुले सावित्रीबार्र्ईंंना म्हणाले असते ‘उगीच कशाला’ तर कदाचित आजही बायका अशिक्षित राहिल्या असत्या.

      मला कल्पना आहे की आपले राजकीय पक्ष त्या जाहिरातीवरून वादंग उभा करतील; त्याचे भांडवल करतील. मराठी अस्मितेच्या नावाने मग गळे काढले जातील. पण या सर्व राजकीय पक्षांनी मराठी माणसाला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी काय मदत केली? त्यांचा वापर फक्त निवडणुकीतील मतांसाठी, बस्स. त्यांना बाकी आपल्याबद्दल काहीही मतलब नाही.

      आज रोजगार मिळण्यातील सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे तरुणांची मेहनत करण्याची अनास्था हे आहे. कुठल्याही व्यावसायिकाला विचारा आणि तो हेच सांगेल की तरुण पिढी मेहनत करायलाच तयार नाही. सुतार, गवंडी यांना देखील त्यांच्या हाताखाली कामे करणारी मुलेच मिळत नाहीत. हल्ली सर्वांना कमीतकमी काम करून पैसे मिळवायचे असतात. त्यामुळे टवाळक्या करायच्या, राजकारण्यांच्या शेपट्या पकडून धावायचं ज्यायोगे पैसे तर मिळतीलच पण दादागिरी पण प्रस्थापित होईल. ही असली तरुण पिढी आपले बलस्थान कसे असू शकेल?

      आज गावागावातून फिरताना असेही जाणवते की, आजच्या तरुणांमध्ये एक प्रकारचा राग आणि वैफल्य ठासून भरले आहे, आणि कधीकधी भीती वाटते की यांच्या या रागाला अथवा वैफल्याला जर नीट मार्ग मिळाला नाही तर सामाजिक उद्रेक होईल.

– यशवंत मराठे, yeshwant.marathe@gmail.com

Leave a Reply

Close Menu