कोकणामध्ये ओल्या काजूगराला बाजारात प्रचंड मागणी असते. मोठमोठ्या शहरातील हॉटेल्समध्ये भाजी, मटण, चिकनमध्ये ओले काजूगरांचा वापर केला जातो. ओले काजूगर सुक्या भाजीसाठी आणि पुलाव व बिर्याणीमध्ये देखील वापरले जातात. वेगवेगळ्या भाज्यांत ओले काजूगर वापरल्याने जेवणाची लज्जत वाढते. त्यामुळे या ओल्या काजूगराला बाजारात खूप मागणी असते. ओले काजूगर हंगामामध्ये ३०० ते ४०० रूपये शेकडा दराने मिळतात. ओले काजूगराचा हंगाम जानेवारीपासून सुरू होतो. अन्य जातीच्या काजूच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात चिक असतो व त्यांचीही साल जाड असल्यामुळे बियांमधून काजूगर काढणे फार अवघड असते. ब-याचदा गर काढताना जाड सालीमुळे अखंड गर न मिळता गराचा तुकडा होतो. तसेच बियांमध्ये असलेल्या अधिक चिकामुळे हात खराब होतात.
कोकणातील ओल्या काजूगराची वाढती मागणी व ओल्या काजू बीमधून ओले काजूगर काढताना येणा-या अडचणी लक्षात घेऊन डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ, दापोली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे १५ वर्षांच्या संशोधनानंतर खास करून ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजूचे वाण ‘वेंगुर्ला-१० एमबी‘ या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहे. हे वाण निवड पद्धतीने विकसित करण्यात आले असून या वाण्यामध्ये टरफलामधील तेल कमी, टरफलाची जाडी मध्यम व काजूगर काढण्यास सुलीा आहे. ही विकसित केलेली नवीन जात शेतक-यांसाठी मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणार आहे.
या वाणाच्या काजू बीमधून आले काजूगर काढण्यास सुलभ असल्यामुळे काजूगर काढण्यासाठी कमी वेळ खर्च होतो. त्यामुळे इतर वाणांच्या तुलनेत कमी वेळेत जास्त काजूगर मिळतात. पर्यायाने मजूरीमध्ये बचत होते. ओल्या काजू बीमधील ओल्या काजूगराचे प्रमाण ३२ टक्के असल्यामुळे एकूण ओल्या काजूगराचे प्रति झाड उत्पादन वाढते. हे वाण चालू वर्षात प्रसारित झाल्यामुळे या वाणाची कलमे शेतक-यांना पुढील वर्षापासून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे उपलब्ध होतील.
ही जात विकसित करण्यासाठी डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृशी विद्यापिठ, दापोली विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे, संशोधन संचालक डॉ.प्रकाश शिनगारे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ.महेंद्र गवाणकर आणि डॉ.मोहन दळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.