पावसाळ्यात अनेक साथरोग फैलावण्याचा धोका असतो. त्यापैकी काही रोग हे डासांमुळे पसरतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती थांबविणे गरजेचे असल्याने वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरात डासनाशक औषध फवारणीचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक परितोष कंकाळ यांनी दिली आहे.
दरम्यान, गाडीअड्डा ते दाभोली नाका, शिरोडा नाका, जुना स्टॅण्ड, दाभोसवाडा, राजवाडा, विठ्ठलवाडी, गावडेवाडी आदी परिसरात डास प्रतिबंधक फवारणी पूर्ण झालेली असून सध्या नगरपरिषद कार्यालय परिसर, क्रॉफर्ड मार्केट, भाजी मार्केट, मच्छी मार्केट आदी ठिकाणी फवारणी सुरू आहे. शहरातील गटार व ओहोळांचीही साफसफाई करण्यात आली असून गटा आणि ओहोळांसह इतर भागांमध्ये साफसफाई करण्यात येत आहे.
पावसाळी साथरोग नियंत्रणाकरिता भंगारवाले, गॅरेजवाले यांना नियमितपणे कचरा साफ करण्याबाबत व भंगार साहित्य, टायर्स यामध्ये पाणी साचून डास निर्मिती होणार नाही यासाठी योग्य सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच नागरिकांनी सुद्धा आपल्या घरात व आजूबाजूच्या परिसरात जास्त दिवस पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.