महाराष्ट्र राज्याच्या 2024 च्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी व स्कुबा डायव्हिंग प्रकल्पाला चालना देण्यात आली आहे. वेंगुर्ले बंदरात पाणबुडी केंद्र व मालवण वेंगुर्ले दरम्यानच्या खोल समुद्रात नौदलाच्या विनावापर युद्धनौकेचा वापर करून समुद्रात कृत्रिम प्रवाळाद्वारे सबमरिन स्कुबा डायव्हिंग प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. त्यामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनालाही आता खऱ्या अर्थाने झळाळी मिळणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच या प्रकल्पाला चालना मिळाली, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी दिली.
समुद्राखालचे जग पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये मोठी उत्सुकता आहे, मात्र लहान मुले व वयोवृद्धांना समुद्राखालचे जग पाहण्याचा आनंद लुटता येत नाही. याचाच विचार करून 2019 साली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी अर्थ खात्याचे राज्यमंत्री असताना हा प्रकल्प शासनास सादर केला होता.
महत्त्वाकांक्षी पाणबुडी प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. अमेरिका, युरोप आदी प्रगत देशांमधील प्रकल्पांचा बारकाव्याने अभ्यास करून पाणबुडी केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. पर्यटकांना यामुळे समुद्राच्या अंतरंगातील जग प्रत्यक्ष समुद्रात जाऊन पाहता येणार आहे. वेंगुर्ले बंदर भागात याचे केंद्र निर्माण केले जाणार आहे. पाणबुडीद्वारे पर्यटकांना समुद्राच्या अंतरंगाची सफर केली जाणार आहे.
मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्कुबा डायव्हिंग चालते. समुद्राखालचे अद्भूत जग अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक मालवणात खेचून येतात. मात्र, पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सुरक्षित ठिकाणीच हे स्कुबा डायव्हिंग चालते. त्यालाही आता मर्यादा आल्या आहेत. लहान मुले व वयोवृद्धांना पाण्यात उतरविणे धोक्याचे असल्याने त्यांना या अद्भूत आनंदापासून मुकावे लागते, याचाच विचार करून सबमरिन स्कुबा डायव्हिंगद्वारे नवीन संकल्पना वेंगुर्ले, मालवणच्या समुद्रात साकार केल्या जाणार आहेत. जेणेकरून सर्वांनाच समुद्राखालचे अद्भूत जग अनुभवता येणार आहे.
समुद्राच्या अंतरंगातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सखोल संशोधनाअंती जगातील प्रगत देशांच्या धर्तीवर सबमरिन स्कुबा डायव्हिंग प्रकल्प विकसित केला जाणार आहे. यासाठी नौदलाच्या विनावापर युद्धनौकेचा वापर केला जाणार आहे. ही युद्धनौका मुंबई येथील डॉकमध्ये आणण्यात येईल. तेथे ती कृत्रिम प्रवाळ निर्मितीसाठी सर्व प्रदूषणकारी घटक काढून समुद्रात बुडविण्यासाठी सज्ज केली जाणार आहे. ही युद्धनौका वेंगुर्ले व मालवण यांना मध्यवर्ती असलेल्या निवती रॉक भागातील समुद्रात बुडविली जाणार आहे. या बोटीवर काही दिवसातच कृत्रिम प्रवाळे विकसित होतील. समुद्रातील विविध प्रकारचे मासे व जीवजंतू या प्रवाळांकडे आकर्षित होतील.
मंत्री केसरकरांमुळेच प्रकल्पाला चालना – सचिन वालावलकर
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तयार केला होता. यासाठी ते गेली सात-आठ वर्षे कार्यरत आहेत. जगभरातील अनेक प्रगत देशातील प्रकल्पांचा अभ्यास करून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. 2019 साली ते जेव्हा अर्थ राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने चालना दिली. त्याच सालच्या अर्थसंकल्पात तात्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांची मान्यता घेऊन अर्थमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या संमत्तीने या प्रकल्पासाठी 66 कोटीचा निधी मंजूर केला होता. 30 मार्च 2019 रोजी यातील 25 कोटी रुपये पर्यटन खात्याकडे वर्गही करण्यात आले होते. मात्र, तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाला गती दिली नाही. परिणामी, तो रेंगाळला. सिंधुदुर्गासाठी मंजूर हा प्रकल्प गुजरातला जाणार वगैरे वावड्या उठविण्यात आल्या. मात्र, आता केसरकर महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी गेल्याने त्यांनी या प्रकल्पाला पुन्हा चालना दिली. वारंवार पाठपुरावा करून अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा करून अखेर हा प्रकल्प मंजूर करून घेतला आहे. पुढील आठ महिन्यात प्रत्यक्षात हा प्रकल्प साकार होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे खरे प्रणेते दीपक केसरकर हेच असून त्यांच्यामुळेच हा प्रकल्प साकार होत आहे, असे वालावलकर म्हणाले.