तू माझा सांगाती

आसने, प्राणायाम, ध्यान करून कुणाला आनंद होतो. संगीत ऐकून कुणाला आनंद होतो. खेळ खेळून कुणाला आनंद मिळतो. संध्याकाळी समुद्रात हळू हळू लपणारा सूर्य पाहताना कुणाला आनंद होतो. माझ्या आनंदाचे निधान मला गवसलेले असते. मी माझा आनंद अनुभवताना तुम्हाला त्रास होईल, पिडा होईल असे काहीच करत नाही.

      मग माझ्या आनंद निधानाशी तुमचे भांडण असण्याचे काहीच कारण नाही. संतांच्या आनंदाचे निधान, सुखाचा ठेवा आहे तो विठ्ठल! ज्ञानोबा माउली म्हणतात – रुप पाहता लोचनी । सुख झाले हो साजणी ॥

तुकोबा आपली आवड व्यक्त करतात –

आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें ॥

आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥

लांचावलें मन लागलीसे गोडी । तें जीवें न सोडीं ऐसें झालें ॥

      आपले सुख दुःख कुणालातरी सांगावे असे आपल्याला नेहमी वाटते. एकटेपणा सहन होत नाही. आपण ज्याला नातेसंबंध म्हणतो ते कशासाठी हवेत? मित्र, मैत्रिण तरी कशासाठी हवेत? देवाने भक्तांशी आणि भक्तांनी देवाशी एक नाते जोडलेले असते. आपल्या जवळचे कुणी आत्ता इथे आपल्यापाशी नाही. अशा परिस्थितीत आपण अडकलोच तर काय करावे. अशावेळी देवावरील श्रद्धा मदत करते.

तुकोबा म्हणतात –

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरुनिया ॥

आपले सुख दुःख मनोमन त्याला सांगावे –

देवा सांगो सुख दुःख । देव निवारील भूक ॥

तो आपल्या सोबत आहे ही भावना मनाला मोठा आधार देईल. ही संतांनी सांगितलेली सायकोथेरपी आहे. या सायकोथेरपीची अनेक रुपे संत साहित्यात आपल्याला वाचायला मिळतात.

      माझे दुखणे, माझे कष्ट हा विठ्ठल दूर करतो ही संतांची भावना आहे. तुकोबा वर्णन करतात –

चर्म रंगूं लागे रोहिदासा संगीं । कबिराचे मागीं शेले विणी॥

सजनकसाया विकुं लागे मास । मळा सांवत्यास खुरपूं लागे॥

नरहरीसोनारा घडु फुंको लागे । चोख्यामेळ्या संगें ढोरें ओढी ॥

नामयाची जनी सवें वेची शेणी ।

      विठ्ठल प्रेमस्वरूप आहे, विठ्ठल प्रेमाचा पुतळा आहे, विठ्ठल प्रेमाचा कल्लोळ आहे असे संतांनी त्याचे वर्णन केले आहे. विठ्ठल आणि त्याचे भक्त यांचे प्रेमसंबंध कसे आहेत?

नामदेवराय वर्णन करतात –

स्फुंदस्फुंदोन नामा उभा महाद्वारी ॥

चित्त पायावरी विठोबाच्या ॥

उभा दीनानाथ उभारुनी बाहे ॥

पालवीत आहे पीतांबरें ॥

आरता येरें नामया धरिला पोटासी ॥

कोणें गांजिलासी दुर्जनानें ॥

अंतरीचें सांगे पडे माझ्या मागे ॥

कांरिसी उद्वेग संसारीचे ॥

नामा ह्मणे विठोबा आसे मी नेणता ॥

आठवी पंढरीनाथा वेळो वेळा ॥

      विठ्ठल भक्तांसाठी काय काय करतो? जनीला काय वाटते पाहा –

जनी डोईने गांजली । विठाबाई धावीन्नली ॥

देव हाते बुचडा सोडी । उवा मारीतसे तातडी ॥

केश विंचरूनी मोकळे केले । जनी म्हणे निर्मळ झालें ॥

जनीच्या केसांचा गुंता सोडवणारी, तिच्या डोक्यावरच्या उवा मारणारी, केस विंचरणारी ही विठाई आहे.

      जनी नामदेवाघरची दासी आहे. नामदेवाच्या घरी मुळात अत्यंत गरीबी. घरात पंधरा माणसांचा गोतावळा. त्या घरात मोलकरीण असलेल्या जनीचे कष्ट किती असतील? देव जनीबरोबर तिची कष्टाची कामे करतो अशी जनीच्या मनाची भावना आहे. जनी काय म्हणते पाहा –

साळी सडायास काढी । पुढें जाउनी उखळ झाडी ॥

कांडितां कांडितां । शीण आला पंढरिनाथा ॥

सर्व अंगीं घाम आला । तेणें पितांबर भिजला ॥

पायीं पैंजण हातीं कडीं । कोंडा पांखडूनि काढी ॥

हाता आला असे फोड । जनी म्हणे मुसळ सोड ॥

      जनीबरोबर कष्टाची कामे करताना देव अगदी दमून जातो. त्याच्या अंगाला इतका घाम येतो की त्याचा पितांबर भिजून जातो. मुसळाने कांडण करता देवाच्या हाताला फोड येतात. शेवटी जनी सांगते, “देवा! पुरे आता! मुसळ सोड.” जनीला कष्टाच्या कामाची सवय आहे, पण देवाला कुठे कष्टाची सवय आहे?

      देवाचे भक्तांचे नाते किती घनिष्ट आहे? खरे जवळचे नाते कोणते? ज्या प्रेमाच्या नात्यात भांडणे करायची, रुसून जायची, प्रसंगी थोडा अबोला धरायची आणि पुन्हा गळा मिठी घालायची मुभा आहे, तेच खरे प्रेमाचे नाते. संतांच्या अभंग गाथ्यात देवाशी प्रेमाचे भांडण हे एक प्रकरणच आपल्याला वाचायला मिळते. या भांडणाचा हा एक नमुना पाहा –

तुकोबा म्हणतात –

पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परि नाम सेंडी धरिली आम्ही ॥

आतां संतांनीं करावी पंचाईत । कोण हा फजितखोर येथें ॥

कोणाचा अन्याय येथें आहे स्वामी । गर्जतसों आम्ही पातकी ही ॥

याचें पावनपण सोडवा जी तुम्ही । पतितपावन आम्ही आहों खरें ॥

      या भांडणात संत प्रसंगी देवाला शिव्याही देतात. नामदेवराय म्हणतात –

बरे आम्हा कळो आले देवपण । आता गुज कोण राखे तुझे? ॥

मारिले का देवा मज आजवरी । आता बरोबरी तुज मज ॥

जे आम्ही बोललो आहे तुझे आंगी । देईन प्रसंगे शिव्या तुज ॥

निलाजऱ्या तुज नाही यातिकुळ । चोरटा शिंदळ ठावा जना ॥

नामा म्हणे मज खवळिले भांडा । आता धीर तोंडा न धरवे ॥

      तर जनी काय म्हणते पाहा –

अरे विठ्या विठ्या । मूळ मायेच्या कारट्या ॥

तुझी रांड रंडकी झाली । जन्म सावित्री चुडा ल्याली ॥

तुझे गेले मढे । तुला पाहून काळ रडे ॥

उभी राहुनी अंगणी । शिव्या देत दासी जनी ॥

      देवाला शिव्या द्यायला मात्र नामदेवराय, तुकोबा, जनी सारखे त्याच्यावर प्रेम हवे. विठ्ठल त्यांच्या शिव्याही सहन करतो.

      भक्तांबद्दल विठ्ठलाच्या मनातील भावना कशी आहे? नामदेवराय वर्णन करतात –

आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ॥

पतित पावन मी तो आहे खरा । तुमचेनी बरा दिसतसें ॥

तुम्ही जाता गावा हुरहूर माझ्या जीवा । भेटाल केधवा मज लागि ॥

धावोनिया देव गळा घाली मिठी । स्फुन्दुन गोष्टी बोलतसे ॥

तिही त्रिभुवनी मज नाही कोणी । म्हणे चक्रपाणी नामयासी ॥

भक्तांचा विरह विठ्ठलाला सहन होत नाही.

      भक्तांवर आघात होतात तेव्हा देव त्यांना धीर देतो, सांभाळतो अशी भक्तांची भावना आहे. तुकोबा वर्णन करतात –

मागे पुढे उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥

नाथबाबा धीर देतात –

आवडीने भावे हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥

नको खेद करू कोणत्या गोष्टीचा । पति लक्षुमिचा जाणतसे ॥

      संतांवर, भक्तांवर संकटे येत नाहीत असे नाही. ज्ञानोबा, तुकोबा यांच्या जीवनात काय कमी संकटे आली? पण या संकटातून पार जाण्याचे बळही तो देतो अशी संतांची भावना आहे. त्यांची देवापाशी मग काही तक्रार नाही.

      तुकोबा म्हणतात –

तुज जैसे वाटे ते करी अनंता ।

तू जर हे संकट माझ्या पदरी घातल असशील तर त्यातून तरून जाण्याचा मार्ग तूच दाखवशील, तूच मार्गावर सांगाती होशील आणि तूच लढण्याचे बळ देशील, मग मी संकटापासून दूर पळणार नाही, अशी त्यांची विठ्ठलाबद्दल भावना आहे.

      लाखो कष्टकऱ्यांना, दीन दुबळ्यांना या विठ्ठलाने असा धीर दिला आहे, आधार दिला आहे.

– ॲड. देवदत्त दिगंबर परुळेकर

 9422055221

Leave a Reply

Close Menu