‘काम जमत नसेल, तर घरी बसा‘

जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदर निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपवन संरक्षक नवलकिशोर रेड्डी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधवले, नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य काका कुडाळकर, सावळाराम अणावकर, अबीद नाईक, प्रफुल्ल सुद्रीक, सचिन वालावलकर, अशोक सावंत, महेश सारंग, राजेंद्र निबाळकर, गोट्या सावंत, सुधीर नकाशे, राजन गिरप आदी उपस्थित होते. प्रशासकीय कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणारा आवाज नियोजन मंडळाच्या सभेत घुमला आणि अख्खं प्रशासन हादरून गेले. पालकमंत्री चव्हाण यांचा रूद्रावतार प्रशासनाने पहिल्यांदाच अनुभवला. ‘काम जमत नसेल, तर घरी बसा‘ अशा शब्दांत थेट जिल्हाधिका­यांना ठणकावल्यानंतर त्यांनी त्या वातानुकुलित सभागृहात विविध खातेप्रमुखांची झाडाझडती घेत अक्षरशः घाम फोडला. आम्ही एवढी मेहनत करून जनतेच्या भल्यासाठी निधी आणतो. हा निधी वाढवून मिळण्यासाठी खूप प्रयत्न करतो आणि तुम्ही अधिकारी मंडळी हा निधी खर्च न करता तसाच अखर्चित ठेवता. वारंवार सूचना करूनही तुमच्या कामात फरक पडत नाही. या मंत्रिपदाचे जे काही तीन-चार महिने शिल्लक राहिले आहेत तेवढे मला पुरेसे आहेत. जाता जाता तुम्हाला सर्वांना कामाला लावून जाईन. एवढं लक्षात ठेवा आणि आतापासून कामाला लागा, असा इशारा पालकमंत्री चव्हाण यांनी सर्व खातेप्रमुखांना दिला.

Leave a Reply

Close Menu