महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयातर्फे जिल्हा स्तरावर असंघटित युवक युवतींना संघटित करून त्यांच्या सुप्त कलागुणांना संधी देऊन सामाजिक क्षेत्राबरोबर कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देत समाजात उल्लेखनीय कार्य करणाया व्यक्तींना जिल्हा युवा पुरस्कार दिला जातो. सन २०२०-२१ या वर्षाचा जिल्हा युवा पुरस्कार तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांना शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले. सन्मानपत्र व रोख दहा हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस आदी उपस्थित होते.