राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना‘ महाराष्ट्र शासनाकडून घोषित करण्यात आली आहे. वेंगुर्ला भाजपाच्यावतीने या योजनेचा शुभारंभ चांदेरकर विठ्ठल मंदिरात ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवा यांच्या उपस्थितीत मोफत फॉर्म वितरण करून करण्यात आला.
यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, प्रणव वायंगणकर, गुरूनाथ घाडी, किशोर रेवणकर, वसंत तांडेल, महादेव मेस्त्री, गजानन कुबल, दिवाकर कुर्ले, दिलीप कुर्ले, रमेश तांडेल, अंकुश वराडकर, सहदेव गिरप, राजा वेंगुर्लेकर, नारायण मोंडकर, रमाबाई तांडेल, चित्रा केरकर तसेच इतर अनेक वारकरी संपदायातील मंडळी उपस्थित होती. या योजनेंतर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रापैकी एका यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रूपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार असावे. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व वय वर्ष ६० वरील ज्येष्ठ नागरिक असावा.
विविध दळणवळणाच्या साधनांद्वारे प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टूरिस्ट कंपन्या तसेच आय.आर.सी.टी.सी किवा समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित नियमांच्या निविदा प्रक्रियेचे पालन करून करण्यात येईल. प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येऊन प्राप्त झालेल्या अर्जांच्या उपलब्धतेनुसार लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाणार आहे.
७५ वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वय वर्षे ६० वरील ज्येष्ठ नागरिकांनी ३१ ऑक्टोबर पूर्वी ऑफलाईन व त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.