वेंगुर्ला-कॅम्प येथे थोर संसदपटू बॅ.नाथ पै यांच्या नावाने ‘बॅ.नाथ पै समुदाय केंद्र‘ साकारण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा आज शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी नागरीक व बॅ.नाथ पै प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन बॅ.नाथ पै फाऊंडेशनचे सदस्य सचिन वालावलकर यांनी केले पत्रकार परिषदेत केले.
बॅ.नाथ पै समुदाय केंद्राबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॅ.नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट अध्यक्षा अदिती पै, नितीन मांजरेकर, उमेश येरम, बॅ. नाथ पै महाविद्यालयाचे चेअरमन उमेश गाळवणकर, व्हीक्टर डान्टस लॉ कॉलेजचे चेअरमन व्हीक्टर डान्टस आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. वालावलकर म्हणाले की, वेंगुर्ला कॅम्प येथे नगरपरिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या बॅ.नाथ पै समुदाय केंद्रात बॅ नाथ पै यांच्या विविध स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. शनिवारी या केंद्राचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविद्र चव्हाण व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. तर या लोकार्पण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार नारायण राणे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, विधान परिषदेचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नीतेश राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी अनिल पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
बॅ.नाथ पै यांच्या आठवणी समाजासाठी उपयोगी होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला काही तरी प्रयत्न करायला हवे यासाठी सन २०१५ मध्ये मी बॅ.नाथ पै यांच्यावर एक पुस्तक लिहिले. हे पुस्तक इंग्रजीमध्ये होते. त्यानंतर त्याचे मराठीमध्ये अनुवाद करून त्याचे प्रकाशन बॅ.नाथ पै ज्या प्राथमिक शाळेत शिकले त्या शाळेत केला आणि त्यावेळी त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत, तत्कालीन आमदार व आताचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार विनायक राऊत यांनी या बॅ.नाथ पै समुदाय केंद्राची घोषणा केली. पुढे जाऊन जिल्हा नियोजन तसेच दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शासनाकडून या केंद्राला निधी देण्यात आला व याचे जलद काम होऊन आज आमचे हे स्वप्न साकार होत आहे याचा आनंद असल्याचे अदिती पै म्हणाल्या.
या लोकार्पण सोहळ्याला नाथ पै प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन बॅ.नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा अदिती पै, मुख्याधिकारी परितोष कंकाळ व प्रशासक तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी केले आहे.