मुंबई-गोवा महामार्गावर सालाबादाप्रमाणे यंदाही मोठी वाहतूक कोंडी झालीय.. कोंडीनं सायांना जेरीस आणलंय.. तळ कोकणात जाणा-या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होताहेत..
कुठं आहेत पाहणी दौरे करणारे पुढारी?
खासदार सुनील तटकरे यांनी रस्त्याच्या पाहणीचं नाटक केलं.. (मी नाटक यासाठी म्हणतो की, सुनील तटकरे रायगडचे.. ते दररोज मुंबई-गोवा महामार्गावरून जा-ये करतात,, महामार्गावरील खड्डा न खड्डा त्यांच्या ‘‘ओळखी‘‘चा आहे. त्यामुळं त्यांना वेगळा पाहणी दौरा करण्याची गरज काय होती ? तरीही प्रसिद्धीचा फोकस स्वतःवर घेण्यासाठी त्यांनी पाहणी वगैरे केली..) गेल्यावर्षी सात वेळा पाहणी करणाया बांधकाम मंत्र्यांनी यावेळी एकच दौरा केला.
पण सोपस्कार पूर्ण करायला ते विसरले नाहीत.. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौरा केला.. बड्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला असला तरी अटक फक्त ठेकेदाराच्या ज्युनियर इंजिनिअरला केली गेली.. ठेकेदाराला अटक होणार नाही हे स्पष्ट आहे..
ते असो,
पण मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौयात आणखी एक घोषणा केली होती, गणपतीपूर्वी महामार्ग खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त होईल..
या घोषणेचं काय झालं?
की, या वाहतूक कोंडीला ही निसर्ग जबाबदार आहे?
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणी जनता हालअपेष्टा सहन करीत, प्रवास करीत आहे. वाहतूक कोंडीमुळे भांडणं, मारामाया होत आहेत.. या सर्व परिस्थितीला विद्यमान सरकार आणि २०१० नंतर जे जे सत्तेवर आले ते सारेच जबाबदार आहेत..
महामार्गासाठी सुनील तटकरे काहीच करीत नाहीत असा आरोप पत्रकारांनी केला, तो खासदारांना आवडला नाही.. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगून पत्रकारांच्या विरोधात पोलिसात तक्रारी केल्या, हे कमी म्हणून की काय? मुंबई – गोवा महामार्गासाठी लढणाया पत्रकारांच्या विरोधात रोह्यात मोर्चाही काढला.. अर्थात हे सारे फंडे, पत्रकारांचा आवाज आणि मुंबई – गोवा महामार्गासाठीचा आमचा लढा बंद करू शकणार नाहीत..
खरं तर मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेला विरोधकही तेवढेच जबाबदार आहेत.. हा विषय हाती घेऊन त्यांना सरकारला झोडून काढण्याची संधी होती, पण तेही या रस्त्याकडे दुर्लक्ष करतात..
अगदी मूग गिळून गप्प आहेत..
त्यांचे काय हितसंबंध आहेत, मला माहिती नाही..
हं, गेल्यावर्षी मनसेनं ‘‘दगडफेक आंदोलन‘‘ केलं.. चार दोन दगड भिरकावले.. राज ठाकरे यांनी पनवेलला येऊन गर्जना केल्या..
मात्र तेवढंच..
त्यानंतर मनसे कुठेच दिसली नाही. अलिकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे टीव्हीवर येऊन आमच्यामुळेच महामार्ग होतोय असा दावा करीत होते. पत्रकारांचा हा लढा श्रेयासाठी नाही. पत्रकार गेली सतरा वर्षे या विषयाचा सतत पाठपुरावा करताहेत, तेव्हा एकही राजकीय पक्ष पुढे आला नाही. आला असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत आम्ही त्यांचा सत्कार करू. पण असं काहीच झालं नाही.
अर्थात श्रेय कोणाला घ्यायचे ते घ्या, पत्रकारांना निवडणुका लढवायच्या नाहीत. म्हणजे श्रेयाची गरज नाही. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी श्रेय घ्यावे, आमचा विरोध यासाठी नाही की, कोकणी जनतेला हे फक्त माहिती आहे की, रस्त्यासाठी कोण लढतेय ते..
कोणीही श्रेय घ्यावे पण कोकणी जनतेची या कोंडीतून सुटका करावी एवढीच आमची अपेक्षा आहे.
कोकणी जनता सोशीक आहे, याचा जास्त गैरफायदा घेऊ नका एवढंच आमचं राजकीय पक्षांना सांगणं आहे. अन्यथा या सहनशीलतेचा एकदा स्फोट होईल. – एस.एम.देशमुख