दि.२५ सप्टेंबर हा दिवस बॅ. नाथ पै यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस त्यांच्या जन्मगावी वेंगुर्ला येथे विविध उपक्रमांनी साजरा केला गेला. याचवर्षी नाथ पैंच्या विचारांची जोपासना करणारं देखणं स्मारक वेंगुर्ल्यात साकारलं गेलं. आजच्या काळात खरंतर ‘स्मारक‘ म्हणजे आपल्या प्रिय नेत्याचे पुतळे किवा शोभिवंत वास्तू बनून राहता नयेत. ‘स्मारक‘ ही नवीन आदर्श विचारांची प्रेरणा देणारी तसेच विचार परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरणारी असायला हवीत. म्हणूनच वेंगुर्ला येथील स्मारक जरी शासनाने उभारलं असलं तरी त्याचे पालकत्व बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट या संस्थेने स्वीकारले आहे. नाथ पैंची नात आदिती पै या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. या वास्तूमध्ये विविध विषयावरील पुस्तकांचा संग्रह आहे, विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तयारीसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका आहे, वातानुकूलित प्रशस्त हॉल आहे. ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला नामवंत वक्त्यांची व्याख्याने, तरूणांसाठी स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे घेण्याचे नियोजन आहे. अशा सातत्यपूर्ण कृतिशील उपक्रमामुळे बॅ.नाथ पैंचे स्मारक समाजातील विविध घटकांशी जोडले जाईल अशी अपेक्षा आहे.
बॅ.नाथ पै राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय होते तेव्हाचा काळ आणि आजचा काळ यामध्ये फार मोठा फरक झाला आहे. सामाजिक जाणीवांचे संदर्भ बदलले आहेत. बॅ.नाथ पै, मधु दंडवते, अलिकडच्या काळातल उदाहरण घ्यायचं तर सुरेश प्रभू या नेत्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि विचारातला सच्चेपणा कोकणातल्या जनतेला भावायचा. बॅ.नाथ पैंची भाषणे ऐकण्यासाठी मैलोन मैल पायपीट करून लोक स्वखर्चाने यायचे हे आजच्या काळातील तरूण पिढीला सांगून खरे वाटणार नाही. बॅ.नाथ पनी पाहिलेले कोकण रेल्वेचे स्वप्न अनंत अडचणीवर मात करून पूर्ण झाले. ते पाहायला नाथ पै हयात नसले तरी कोकणवासीय त्यांच्या सत्यात उतरलेल्या स्वप्नाचा प्रत्यय घेत असतात. मंजुरीनंतर तब्बल सतरा वर्षे होऊन देखील मुंबई-गोवा महामार्गाचे काम का रखडले आहे हा प्रश्न मात्र सामान्य नागरिकांना सतावतो आहे.
सोशल मीडियाच्या आजच्या काळात वातावरण बदलले आहे. एखादी जातीय अगर धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना घडली तर लगेच मागचा पुढचा विचार न करता व्हाट्सअप, फेसबुकचा वापर करून ती व्हायरल केली जाते. धर्माचा, जातीचा आधार घेत तरूणांना भडकवणे सोपे झाले आहे. विचार न करता भावनेच्या भरात द्वेषाचे रूपांतर उन्मादात कधी होते तेच कळत नाही. सारे काही बेचिराख होऊन संपण्याअगोदर तरूणांमध्ये असलेल्या ऊर्जेला सकारात्मक दिशा देण्यासाठी ही विचाररूपी स्मारके नक्कीच सहाय्यक ठरतील. त्या स्मारकापर्यंत तरूणांचे पाय कसे वळवायचे हे मात्र आव्हान आहे.
नाथ पै संसदीय परंपरांच्या बाबतीत मुरब्बी ठरले होते. संसदेचे एक लंगडे अधिवेशन लेमडक सेशन भरविण्याचे ठरले होते. काँग्रेस पक्ष जेमतेम बहुमतात होता. जुने खासदार पराभूत झालेले होते. लंगड्या अधिवेशनासाठी त्यांनी उपस्थित राहून देशाचा अर्थसंकल्प मंजूर करणे नैतिकदृष्टीने चुकीचे होते. नाथ पैंनी राष्ट्रपतींना तसे पत्र लिहिले. त्यांची भेटघेतली. या अधिवेशनामुळे चुकीची प्रथा दृढमूल होईल असे स्पष्ट केले आणि हे अधिवेशन रद्द झाले. जाहिरातबाजी आणि आरडाओरडा केल्याशिवाय शांतपणे व सातत्याने काम केले तर विरोधी पक्षातील एकटा खासदारही किती उत्तम कामगिरी बजावू शकतो हे नाथ पैंनी या अधिवेशनाच्या बाबतीत मिळवलेल्या विजयावरून कळते.
‘फ्रँक मोराईस‘ या आंतरराष्ट्रीय श्रेणीच्या पत्रकार महर्षीने नाथ पैं विषयी लिहिले, ‘देशाला विधायक सूचना व चिकित्सक सल्ला देणारा नाथ पै यांच्यापेक्षा दुसरा बुद्धिमान तरुण खासदार मला आज तरी दिसत नाही. नाथ पै आपण प्रथम भारतीय या भावनेने पाहतात आणि पक्षापेक्षा देश अधिक थोर मानतात.‘ नाथांच्या कार्याचे एका त्रयस्थ व्यक्तीने केलेले हे मूल्यमापन विशेष महत्त्वाचे आहे.
राज्यघटना श्रेष्ठ की जनता? या वादात नाथ पै जनतेच्या बाजूने असत. जी घटना अपरिवर्तनीय असते ती मृतात जमा असते या वाक्यावर नाथ पैंचा विश्वास होता. राजशक्तीचे अधिष्ठान तत्वतः लोकशक्तीत असते राजशक्ती आणि लोकशक्ती यांच्यात जर झगडा सुरू झाला तर लोकशक्तीचेच मत प्रस्थापित झाले पाहिजे. घटनादुरूस्तीचा ‘संसदेचा अधिकार‘ या शीर्षकाचे घटनादुरूस्ती विधेयक नाथ पैंनी मांडले. वेगवेगळ्या व्यासपीठावरून या विधेयकावर चर्चा झाली. हे घटना दुरूस्ती विधेयक नाथ पैंच्या संसदीय कर्तृत्वाचा कळस मानला जातो. लोकशाहीत जनता जनार्दन आहे असेच काहीसे नाथांचे मत होते हे आजच्या राज्यकर्त्यांनी नक्कीच लक्षात घेण्यासारखे आहे.
सध्याचा जमाना हा कोणत्याही प्रकारे निवडणुका जिंकणे महत्त्वाचे आहे असा झाला आहे. निवडणुकांपूर्वी आड वळणाने राजकीय पक्ष जी आमिषे दाखवत असतात. तशा प्रकारची आमिषे वैयक्तिक लाभाच्या योजनांद्वारे दस्तूरखुद्द सरकारच निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सर्व वयोगटातील जनतेला देत आहे असे चित्र आहे. खैरात वाटणाया अशा या योजनांच्या अंमलबजावणीविषयी, आर्थिक तरतुदीविषयी प्रश्न विचारणारे लोक, विचारवंत, पत्रकार सरकारला अडचणीचे ठरू लागले आहेत. निवडणूक काळातील प्रचार सभांमधील वरिष्ठ नेत्यांची भाषणांची पातळी इतकी घसरली आहे की,सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा या भाषणांचा वीट आला आहे. ‘आम्ही घराणेशाहीचा विरोध करतो‘, ‘राजकारणातून घराणेशाही संपली पाहिजे‘ अशी वल्गना करणारे राजकीय पक्षच प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या मुलांना तिकिटे देऊ लागले आहेत.
लोकशाही व्यवस्थेत अशा घटनांना पायबंद घालायचा असेल तर सामान्य जनतेने मनापासून काही गोष्टी ठरवायला हव्यात. तरच हे लोक सुतासारखे सरळ होतील. यासाठी डावे-उजवे, आस्तिक – नास्तिक, गरीब-श्रीमंत हा भेद थांबवून सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी सहमती दाखवणे गरजेचे आहे. अर्थात अशा गोष्टी काही एका रात्रीत होत नाहीत. समाजमनामध्ये त्यासाठी नैतिक आणि वैचारिक अधिष्ठान निर्माण व्हायला हवं. त्यासाठी नाथ पैंच्या कृतिशील विचाररूपी स्मारकाचे नक्कीच सहाय्य होईल अशी अपेक्षा आहे.