नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेतर्फे दिले जाणारे आदर्श शिक्षक, शिक्षिका व आदर्श शाळा पुरस्करांचे वितरण २२ सप्टेंबर रोजी झाले. यावेळी व्यासपिठावर देवगड येथील स.ह.केळकर महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.महेंद्र कामत, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, संस्थेचे अध्यक्ष अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परूळेकर, कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात कैवल्य पवार यांनी संस्थेच्या कार्याचा आणि वाटचालीचा आढावा घेऊन पुरस्कारांबद्दल माहिती दिली.
मान्यवरांच्या हस्ते वायंगणी-सुरंगपाणी केंद्र शाळेच्या उपशिक्षिका शामल मांजरेकर-पिळणकर यांना कै.मेघःश्याम रामकृष्ण गाडेकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार, मातोंड-पेंडूर येथील पेंढयाचीवाडी शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका देवयानी आजगांवकर यांना कै.श्रीम.जानकीबाई मेघःश्याम गाडेकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार, केळुस येथील स.का.पाटील विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक महेश चव्हाण यांना कै.सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार देऊन तर जिल्हापरिषद शाळा आरवली-टांक या शाळेला कै.सौ.गंगाबाई पांडुरंग जोशी स्मृती आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रूपये २ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गेल्या दोन दशकांमध्ये शिक्षकांपुढे मोठी आव्हाने उभी आहेत. टेलिव्हिजन व मोबाईल यांची आमिषे दूर ठेऊन मुलांवर सुसंस्कार करणे ही आव्हानात्मक परिस्थिती हाताळताना शिक्षकांची दमछाक होऊ शकते. तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. शिक्षकांच्या हाती खडू व फळा असतो. तर समोरचा विद्यार्थी मोबाईल हाताळतो. त्यामुळे अद्ययावत ज्ञान ठेवणे व विद्यार्थ्यांना मोबाईलच्या वाईट प्रवृत्तींना दूर ठेवणे हे आव्हान पेलणे फारच कठीण आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ.महेंद्र कामत यांनी केले.
विद्यादान हे पुण्याचे काम आहे. नगर वाचनालयास थोर मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमास नगरपरिषद जरूर सहकार्य करेल असे आश्वासन मुख्याधिकारी कंकाळ यांनी दिले. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे दैवत असते म्हणून शिक्षक आदर्शच असले पाहिजेत असे अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर म्हणाले. वेंगुर्ला नगरवाचनालय प्रत्येक उपक्रमासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तिना निमंत्रित करते. सर्व क्षेत्रांना व विविध व्यक्तिमत्वांना जुळविणारी नगर वाचनालय ही संस्था आहे. तिच्या सर्व उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अनिल सौदागर यांनी केले.
पुरस्कार प्राप्त शिक्षिका शामल मांजरेकर-पिळणकर, देवयानी आजगांवकर, मुख्याध्यापक जाधव व महेश चव्हाण यांनी आपले मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला सत्यवान पेडणेकर, मंगल परूळेकर, माया परब, शांतराम बांदेकर, मेहंदी बोवलेकर, शामराव काळे, भाऊ करंगुटकर, किरातचे व्यवस्थापक मेघःश्याम मराठे, संजय परब, संजय पिळणकर, जयराम वायंगणकर, वृंदा कांबळी, राजेश परब, श्रीनिवास सौदागर, नाना कांबळी, सुभाष परब, काळोजी गुरूजी, शंकर मांजरेकर, त्रिबक आजगांवकर, तेंडोलकर गुरूजी, विशाखा वेंगुर्लेकर, आरवली टांक शाळेचे पालक, मातोंड-पेंडूर शाळेचे पालक, पाटकर हायस्कूलचे विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश बोवलेकर यांनी तर आभार अनिल सौदागर यांनी मानले.