डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून काजू सोडा निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित

काजू उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीचा विचार करून कोकणातील वाया जाणाऱ्या काजू बोंडूपासून काजू सोडा तयार करण्याचे तंत्रज्ञान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे विकसित करण्यात आले आहे.
    भारत हा काजूचा उत्पादक, उपभोक्ता व जगातील काजू निर्यात क्षमता असलेला देश आहे. महाराष्ट्रात काजू पिकाखाली एकूण १.९१ लाख हेक्टर क्षेत्र असून काजू बीचे उत्पादन १.९७ लाख मेट्रीक टन आहे. महाराष्ट्राची उत्पादकता ११४५ किलो प्रति हेक्टर आहे. काजू उत्पादकांनी मुख्यत्वे काजू बीच्या गुणवत्तेकडे व अधिक उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत केले असून काजू बोंडूचे उत्पादन हे वाया जाते. काजू बोंडूचे उत्पादन हे काजू बीच्या उत्पादनापेक्षा सुमारे ६ ते ८ पट अधिक आहे. परंतू काजू बोंडू अल्पावधीत खराब होत असल्यामुळे ९० टक्के काजू बोंडू वाया जात आहे. काजू बोंडूला आरोग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. काजू बोंडू पोषक असून शर्करा, खनिजे व जीवनसत्वे यांचा बहुमुल्य स्त्रोत आहे. काजू बोंडूमधील नैसर्गिकरित्या उपलब्ध क जीवनसत्वाचा वापर करून मानवी शरीराचे पोषण करण्यास मदत होवू शकते. काजू बोंडू मधील रसामध्ये क जीवनसत्वाचे प्रमाण हे सुमारे २६० मि.ग्रॅम/१०० ग्रॅम रस म्हणजेच संत्र्यासारख्या फळांच्या तुलनेत सहा पटीने अधिक आहे. याशिवाय, त्यात ०.२ टक्के प्रथिने, ०.१ टक्के स्निग्धता, ११.६ टक्के कर्बोदके (कार्बोहाड्रेट), ०.९ टक्के फायबर, २६१ मि.ग्रॅम खनिज, थायमिन ०.०२ ग्रॅम/१०० ग्रॅम, रायबोफ्लेवीन ०.५ ग्रॅम/१०० ग्रॅम, निकोटीनिक अॅसिड ०.४ मि. ग्रॅम/१०० ग्रॅम आणि अ जीवनसत्व ३९ आय. यू. इत्यादी प्रकारची पोषणमुल्ये असतात.
    काजू बोंडूला आरोग्याच्या दृष्टीने त्यातील जीवनसत्व व खनिज पदार्थामुळे संरक्षणात्मक अन्न म्हणून विशेष महत्त्व दिले आहे. ते नाशवंत असून पाण्याच्या अधिक प्रमाणामुळे परिपक्व बोंडाच्या काढणीनंतर अल्पावधीत खराब होण्यास सुरू होते. म्हणूनच वाया जाणाऱ्या काजू बोंडाचा व्यावसायिक पातळीवर वापर करून त्यापासून काजू सोडासारखा मुल्यवर्धित प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करणे आवश्यक होते. या सर्व बाबींचा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीचा विचार करून कोकणातील वाया जाणाऱ्या काजू बोंडूपासून काजू सोडा तयार करण्याचे तंत्रज्ञान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे विकसित करण्यात आले आहे. काजू सोडा निर्मितीसाठी विद्यापीठाने शिफारसीत केलेल्या पध्दतीप्रमाणे काजू बोंडूपासून सिरप तयार करून ४० मिली सिरप आणि १६० मिली कार्बोनेटेड थंड पाणी ८० psi दाबाने कार्बोनेशन करण्याची शिफारस केलेली आहे. या पध्दतीने काजू बोंडूपासून विकसित केलेला काजू सोडा ९० दिवसांच्या कालावधीपर्यंत सुस्थितीत राहतो. शीतगृहात साठवणूक केल्यास तो अधिक दिवस टिकू शकतो. सदर तंत्रज्ञानामुळे काजू बोंडूचे मुल्यवर्धन होवून त्याला व्यवसायिक महत्व प्राप्त होईल. परिणामी शेतकऱ्यांना काजू बी व्यतिरिक्त वाया जाणाऱ्या काजू बोंडूपासून अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळेल.

Leave a Reply

Close Menu