आज हा प्रश्न समोर येण्याचे कारण म्हणजे ‘कॉमन मॅन‘ आणि त्यांचे प्रश्न बाजूला पडले आहेत. राजकीय पक्ष निवडणुकीच्या लाटेवर स्वार झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर झारखंड आणि महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका लागल्यानंतर राजकारणापलिकडे देशातील जनतेचे प्रश्न आहेत, याचा जणू विसर पडावा, अशी स्थिती आहे. दुस-या बाजूला पेट्रोल-डिझेल खाद्यतेले, जीवनावश्यक वस्तू यांची भाववाढ सामान्य माणसाला कमालीची अडचणीची ठरली आहे. जगायचे कसे? असाच प्रश्न यातून निर्माण झाला आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे भाव ८०० रूपयांच्या पुढे गेले आहेत. सामान्य माणसाला हे दर परवडणारे नाहीत. महागाई, बेकारी यामुळे जगण्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या सर्व प्रश्नांबाबत शासनाच्या स्तरावर गांभीर्याने नियोजन करून जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. परंतु कोणत्याच स्तरावर सामान्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य पहायला मिळत नाही. यातूनच एक प्रकारची अस्वस्थता ठळकपणे जाणवत आहे. लोकशाहीमध्ये जनतेतील असंतोषाची दखल वेळेत घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकयांचे प्रश्न, त्याची कोंडी तातडीने फुटली पाहिजे. महागाईला नियंत्रित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. परंतु याची अपेक्षा करायची काय? असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. राजकारणापलिकडच्या या प्रश्नाकडे राजकीय व्यवस्था गांभीर्याने पाहत नाही,
महिला मतदारांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अशा विविध स्तरातील नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या विविध योजना गेल्या वर्षभरात जाहीर झाल्या आहेत. योजनेनुसार रोख रकमेचे हप्ते देखील पात्र नागरिकांच्या बचत खात्यावर जमा झाले आहेत. अशा वैयक्तिक लाभाच्या योजना कमी उत्पन्न असणाया गटाला निश्चितच लाभदायक ठरतात. अशा स्वरूपाच्या योजना दीर्घकाळ चालू ठेवण्यासाठी आर्थिक तरतूद करून ठेवणे महत्त्वाचे आणि आव्हानात्मक असते. निवडून येणाया सरकारला एकदा जाहीर केलेल्या योजना कोणत्याही परिस्थितीत चालू ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मतदारांना देखील अशा योजनांची सवय लागल्यावर प्रत्येक निवडणुकीआधी मतदार देखील विकासात्मक अगर रचनात्मक कामावर बोलण्यापेक्षा अशा व्यक्तिगत लाभाच्या योजनांचीच अपेक्षा करू लागतात. या सर्वांमुळे दीर्घकालीन विकासाच्या योजनांकडे दुर्लक्ष होण्याची भीती असते.
निवडून येणाया कोणत्याही पक्षाच्या सरकारकडे सर्वसामान्यांसाठी दळणवळणाच्या मूलभूत सुविधांची निर्मिती, सर्वांना मोफत आणि गुणवत्ता पूर्ण प्राथमिक शिक्षण आणि परवडणारे उच्च शिक्षण, सर्वांच्या हाताला काम मिळेल असे रोजगार धोरण अशा गोष्टी निवडून येणाया सरकारने करणे अपेक्षित असते.
निवडणुकांपूर्वी विविध व्यासपीठांवरून आपापल्या भागातील समस्यांची चर्चा होत असते. परंतु आजचे चित्र काहीसे वेगळे झाले आहे. समस्या कोणत्या आहेत हे जाणून घेण्यापेक्षा महायुती, महाविकास आघाडी कोण कुठून कुठून कुठल्या गटात जाणार याच चर्चा प्रसार माध्यमामधून चवीने वारंवार दाखवल्या जातात. या सर्व गदारोळात ‘कॉमन मॅन‘ चा पत्ता काय? असा एक थेट प्रश्न मनामध्ये निर्माण होऊन जातो.