‘घराणेशाही (परिवारवाद)…‘ हा शब्द अगदी परवलीचा झालेला आहे. ही राजकारणी मंडळी एवढी धूर्त असतात की, प्रत्येकवेळी सोयीनुसार अर्थ लावून भूमिका मांडत असतात.
मुळात ‘घराणेशाही‘ हा शब्द रूढ होण्याचे मुळ कारण गांधी घराणं.. सुरूवातीला स्व. पंडित नेहरू, त्यानंतर त्यांच्या कन्या स्व.इंदिराजी. त्यावेळच्या परिस्थितीमुळे मनात नसताना आणि सोनिया गांधीचा सक्त विरोध असताना पायलट म्हणून कार्यरत असलेल्या सरळमार्गी राजीव गांधींना राजकारणात ओढून आणल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दुर्दैवाने त्यांचाही देशासाठीच बळी गेला. त्यानंतर त्यांच्या वारसदार म्हणून पुढे आल्या श्रीमती सोनिया गांधी. अर्थात त्या पंतप्रधान नसल्या तरी दहा वर्षे यूपीएचे नेतृत्व त्याच करत होत्या. त्यांच्या हयातीत आता काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत श्री.राहुल गांधी आणि राजीवजींची कन्या प्रियांका. भविष्यात या दोंघाचीही मुलं पुढचा वारसा चालवतील की नाही? हे येणारा काळ ठरवेल.
काँग्रेसच्या या घराणेशाहीवर विरोधी पक्षात असताना भाजपा तुटून पडायचा. गेल्या साडे दहा वर्षातील देशाचे मा.पंतप्रधान व देशाचे मा. गृहमंत्री आणि इतर जेष्ठ नेते गांधी घराण्याच्या या परिवार वादावर तुटून पडतात. मा. पंतप्रधानांची निवडणूकीच्या काळातील अशी एकही सभा नाही की ज्यात गांधी घराण्याच्या परिवार वादावर ते बोलले नाहीत.
स्वांतत्र्यानंतर देशाचे पोलादी पुरूष आणि पहिले गृहमंत्री मा. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील सर्व संस्थाने बरखास्त केली. त्यामागचा शुद्ध हेतु हा होता की, जनतेला त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत आणि सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. जनतेचा पैसा जनकल्याणासाठी वापरला गेला पाहिजे. संस्थानच्या काळात आम्ही जन्मालाच आलो नव्हतो. पण सावंतवाडी सारख्या संस्थानचा इतिहास जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा, राष्ट्रपिता महात्मा गांधींनी या संस्थानचा ‘कारभार म्हणजे रामराज्य होय.‘ असे गौरवोद्गागार काढले होते. आज मात्र रामाच्या नावाने राजकारण जोरात सुरू आहे.
संस्थाने विलीन झाली. पण देशभरात नवीन संस्थाने उदयास आली आणि या संस्थानांनी विकासाच्या नावाखाली जनतेचा पैसा लुटण्याचं काम जोरात सुरू केलं. विशेषतः महाराष्ट्रात तर प्रत्येक जिल्ह्यात ही राजकीय संस्थानं कार्यरत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तर कळसचं गाठलेला आहे. काँग्रेस किवा नंतरच्या राष्ट्रवादीत असलेले अनेक घराणी राजकीय आश्रयासाठी किवा सत्तेसाठी भाजपात आली आणि भाजपानेही त्यांचे वाजत गाजत स्वागत करून त्या सगळ्यांना पावन करून घेतले. साखर कारखाने, दुधसंघ, सोसायट्या, स्थानिक स्वराज्य संस्था, बँका ह्या वर्षानुवर्षे आपल्याच ताब्यात राहिल्या पाहिजेत याची काळजी ही मंडळी घेत असते. कारण या सगळ्या सहकारातचं त्यांच्या सत्तेचा श्वास अडकलेला असतो.
एखादा साखर कारखाना आर्थिक भ्रष्टाचारामुळे संकटात सापडला तर अशा साखर कारखान्यांना शिखर बँकेतून कोट्यावधी रूपयांचे कर्ज द्यायचं. तर कधी सरकारी तिजोरीतून मदत करायची. हे कर्ज बुडलं तर पुन्हा कर्ज द्यायचं या बदल्यात सत्ता टिकवण्यासाठी त्या संबंधित आमदार, खासदाराने मदत करायची हे दुष्टचक्र काँग्रेसच्या काळातही होत आता तर भाजपाने सरसकट हा विषय सुरू केलेला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा उमेदवारीचं चित्र स्पष्ट झालेले आहे. सगळ्याच पक्षात घराणेशाही आहे हे सिद्ध झालेले आहे. जो भाजपा परिवारवाद आणि घराणेशाहीवर सातत्याने टिका करतो तोच पक्ष या विषयात आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील ठराविक घराण्यांच्या हातात एकवटलेली सत्ताकेंद्र हातातून निसटून जावू नये यासाठीचा खटाटोप सगळेच करताना दिसतात. त्यामुळे या देशातील कष्टकरी, शेतकरी, गोरगरीब जनतेने आयुष्यभर या घराण्यांची पालखी वहायची आणि कार्यकर्त्यांनीही आयुष्यभर संतरंज्या उचलायच्या व झिंदाबादचे नारे द्यायचे…
संस्थानं विलीन झाली. पण देशात जनतेचं शोषण करणारी शेकडो संस्थानं उदयास आली हे खरं कटू सत्य आहे. त्यामुळे देशात फक्त गांधी घराण्याचाचं परिवारवाद आहे. आणि बाकी सगळे सोवळे आहेत हे न पटणारं आहे.. लोकशाहीच्या आवरणाखाली प्रत्येक पक्ष छुप्या घराणेशाहीला उघडपणे प्रोत्साहन देत आहेत. हे चित्र प्रामाणिक कार्यकर्ता आणि मतदाराला अस्वस्थ करणारं आहे.
– अॅड. नकुल पार्सेकर (७७९८७१३४७५)