जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४-२५चा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्यात आला. या आराखड्यास राज्य शासनाकडून उत्कृष्ट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा म्हणून गौरविण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांच्या स्वाक्षरीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व जिल्ह्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून प्राप्त झालेले होते. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन आराखड्याच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांचे अभिनंदन केले.