हायहोल्टेज सावंतवाडी मतदारसंघात बंडखोर उमेदवारांमुळे रंगत
सावंतवाडी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चरणसीमेवर पोहोचली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी धडाडत आहेत. प्रचाराच्या रणांगणात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर याचे अंदाज बांधले जात आहेत. गेली पंधरा वर्षे आमदार असलेले विद्यमान मंत्री दीपक केसरकरांना ही निवडणूक सोपी की कठीण हे सांगणे अवघड आहे. राजन तेली यांच्या ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारीमुळे सामना तर रंगणारच. बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले विशाल परब आणि अर्चना घारे-परब यांनी प्रचारात घेतलेली आघाडी पाहता येथे ‘काँटे की टक्कर‘ निश्चित आहे. आता केसरकर विजयाचा चौकार लगावणार की राजन तेली यांना पराभवाच्या दुर्दैवी हॅट्ट्रिकचा सामना करावा लागणार? की अपक्ष उमेदवार विजयाचा मार्ग चोखाळणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
जसजसा मतदानाचा दिवस जवळ येतोय तसतसे समर्थक, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची धावपळ वाढत आहे. दिवसरात्र प्रचारकार्यात मग्न असलेले उमेदवारांचे समर्थक दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री दुसऱ्या दिवशीच्या नियोजनात व्यस्त होऊ लागले आहेत. ‘रात्र वैऱ्याची आहे जागते रहो’ म्हणत मतदारांना आमिष तर दिले जात नाही ना? या संशयाने उमेदवारांची अस्वस्थताही शिगेला पोहोचली आहे. नेहमी प्रमाणे ‘इकडे पॅक तिकडे पॅक’च्या चर्चा रंगात येऊ लागल्या आहेत. कोणाकडून कोणत्या ऑफर्स चालू आहेत याच्याही गुप्तवार्ता हळूहळू पसरू लागल्या आहेत. तगड्या उमेदवारांमुळे यावेळी आपल्या हातात काय पडणार असे विचार मतदारांच्या डोक्यात घोळू लागले आहेत. चौरंगी लढतीमुळे हायहोल्टेज बनलेल्या या मतदारसंघात पैशाचा पाऊस पडेल, मतांसाठी घोडाबाजार लागेल असे अंदाज मतदारांतूनच बांधले जात आहेत. त्यामुळे तगड्या उमेदवारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्नही काही मंडळी करताना दिसत आहेत.
दीपक केसरकर यांचा सावध पावित्रा
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी धडधडू लागल्या असताना नैतिकतेला वेशीवर टांगले जावू लागले आहे. सत्ताधारी आमदाराने कसे जनतेला फसविले हे पोटतिडकीने मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विरोधी उमेदवार जीवाचे रान करत आहेत, तर सत्ताधारी गटातील आमदारकीची हॅट्ट्रिक यापूर्वीच साधलेल्या दीपक केसरकर यांनी आपण किती निधी आणला, कोणता विकास केला, भविष्यात कसा कायापालट होणार हे मतदारांना पटवून देण्यासाठी कंबर कसली आहे. यापूर्वीची निवडणूक त्यांनी धनुष्यबाण या निशाणीवर जिंकली होती. याहीवेळी ते याच निशाणीसह रिंगणात उतरले आहेत. गत निवडणुकीत ते राजन तेली या भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला भिडले होते. याहीवेळी ते तेलींशीच दोन हात करणार आहेत. तेलींना ठाकरे शिवसेनेच्या मशालीचे बळ मिळाले असल्याने आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदही त्यांच्यामागे आहे. महायुतीतील भाजपचे ताकदवान युवा नेते विशाल परब यांनी बंडखोरी केल्याने केसरकरांसमोरील निवडणूक जिंकण्याचा अत्यंत सोपा वाटणारा पेपर मात्र आत्ता कठीण होऊन बसला आहे. त्यामुळेच महायुतीची ताकद पाठिशी असूनही केसरकर यांनी ही निवडणूक हलक्यात न घेता आता प्रतिष्ठेची केली आहे.
विशाल परबांमुळे तगडे आव्हान
महायुतीचा महत्त्वाचा घटक असलेल्या भाजपचे दोन तगडे नेते आपल्या विरोधात गेल्याने केसरकर यांची चिंता वाढली आहे. भाजपच्या माध्यमातून मिळणारी मते याच दोन उमेदवारांमध्ये विभागली गेल्यास अडचणीत भर पडेल या भीतीने शिंदे शिवसेनेच्या गोटात खळबळ वाढली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सज्जड दम भरला असला तरी शंकेची पाल मतदारांच्या मनातही चुकचुकत आहे. कोण कोणासोबत आहे याचे गणीत गुंतागुंतीचे बनले आहे. भाजपचे बंडखोर विशाल परब यांनी आपल्याला मिळालेली शेगडी निशाणी घराघरात पोहोचविण्यासाठी हायटेक प्रचारावर भर दिला आहे. त्यांच्या प्रचाराची गती पाहता महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे.
पुन्हा एकदा केसरकर विरुद्ध तेली
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपल्यालाच महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल या भरवशावर गेल्या आठ वर्षापासून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा कोपरान्कोपरा पालथा घालणाऱ्या अर्चना घारे-परब यांच्या पाठिशी सध्या सहानुभूतीची मजबूत भिंत उभी झाली आहे. केसरकर यांना तगडी फाईट करण्यासाठी त्यांनी फरफेक्ट नियोजन केले होते. महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांना जवळजवळ निश्चित होती, पण अचानकपणे भाजपशी फारकत घेऊन केसरकरांचे पूर्वीचे प्रतिस्पर्धी राजन तेली ठाकरे शिवसेनेशी संधान बांधत निवडणूक रिंगणात डेरेदाखल झाले आणि त्यांचे स्वप्न भंग झाले. अनेकांना ही खेळी रुचली नसली तरी केसरकर विरुद्ध तेली हा सामना पुन्हा एकदा रंगतदार होणार यावर शिक्कामोर्तब झाले.
प्रबळ लढतीचे चित्र पालटले
जसजसे दिवस सरकू लागले तसतसे प्रबळ उमेदवारांचे चित्र बदलू लागले आहे विशाल परब यांची धमाकेदार इंट्री युवा मतदारांना प्रभावित करत आहे. त्यांना समर्थन देणाऱ्या मतदारांच्या संख्येतही वाढ होताना दिसू लागली आहे. भाजपचे कोणीही पदाधिकारी त्यांच्या मागे प्रत्यक्षपणे दिसत नसले तरी त्यांना छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. केसरकर यांच्यासाठी महायुतीने जोरदार कंबर कसली आहे. अनेक ठिकाणी खळा बैठका व मतदारांच्या गाठीभेटींवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. राजन तेली आणि त्यांची महाविकास आघाडी सध्या शांत दिसत असली तरी परिस्थितीवर लक्ष ठेवून पुढच्या रणनिती आखण्यावर भर देताना दिसत आहे.
संवेदनशील मतदारांचा अर्चना घारे-परबांना पाठिंबा
अर्चना घारेे-परब यांच्यामागे संवेदनशील मतदारांचा ओढा वाढू लागला आहे. कोणावरही टीका न करता शांतपणे एक एक गाव गाठत मतदारांशी भावनिक संवाद साधण्याची त्यांची स्टाईल मतदारांना भावू लागली आहे. महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावनाही तीव्र होऊ लागली आहे. त्यामुळे सहानुभूतीची एक भलीमोठी भिंत त्यांच्यामागे खंबीरणपे उभी होऊ लागली आहे.
चौरंगी लढतीकडे मतदारांचे लक्ष
प्रत्यक्ष निवडणुकीला आता अवघा एक आठवडा उरला आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे प्रत्यक्ष निकालानंतरच कळणार आहे. सध्या तरी कोणाचेही पारडे जड नाही किंवा कुणालाही कमजोर म्हणता येणार नाही. 20 नोव्हेंबरला या चारही उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये सीलबद्ध होणार आहे. तोपर्यंत केसरकर विजयाचा चौकार ठोकतील का? राजन तेलींना पराभवाच्या हॅट्ट्रिकचा दुर्दैवी सामना करावा लागणार का? अपक्ष उमेदवार विशाल परब निवडणूक जिंकण्याचा भिष्मपराक्रम गाजवतील का? सहानुभूतीची लाट अर्चना घारे-परब यांच्या आमदारकीची स्वप्नपूर्ती करेल का? असे प्रश्न मतदारराजाच्या मनात रुंजी घालू लागले आहेत. – महेंद्र मातोंडकर, वेंगुर्ले 9158881618