सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण तालुक्यात अतिशय शांततेत मतदान झाले. वेंगुर्ला तालुक्यात ६७ हजार ९८५ मतदार मतदानासाठी प्रविष्ठ होते. सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत एकूण २३ हजार २६० पुरूष आणि २२ हजार १४४ स्त्रीया असे मिळून एकूण ४५ हजार ४०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची एकूण टक्केवारी ६६.७९ टक्के एवढी आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील एकूण ९३ मतदान केंद्रांवर आज सकाळपासून मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी ७ ते ११ या वेळेपर्यंत २०.५८ टक्के मतदान झाले होते. वेंगुर्ला शहरातील भटवाडी शाळा नं.१, वेंगुर्ला शाळा नं.३ आणि उभादांडा नं.३ या शाळेतील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने बराचवेळ मतदारांचा खोळंबा झाला. त्यामुळे मतदारांमधून नाराजी दिसून आली. या किरकोळ घटना वगळता तालुक्यात सर्वत्र अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. सर्वच मतदान केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यातील ९३ ही मतदान केंद्रावर महायुती व महाविकास आघाडीतर्फे बुथ लावण्यात आले होते. अपक्ष उमेदवार विशाल परब व अर्चना घारे-परब यांचेही बुथ बहुसंख्य मतदान केंद्रांवर दिसून आले. माजी आमदार शंकर कांबळी यांनी शिरोडा-खर्डेवाडी शाळेत मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी होडावडा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
दुपारी १ वाजेपर्यंत १३ हजार ७०० पुरूष तर ११ हजार ८८७ स्त्रीया अशा मिळून २५ हजार ६०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी ३ पर्यंत १८ हजार २४२ पुरूष तर १७ हजार १४० स्त्रीया अशा मिळून ३५ हजार ३८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेंगुर्ला तालुक्यातील मतदानाची ६६.७९ टक्के एवढी होती. यात २३ हजार २६० पुरूष तर २२ हजार १४४ स्त्रीया अशा मिळून एकूण ४५ हजार ४०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मतदानाची अंतिम वेळ ६ वाजेपर्यंत होती. परंतु पुढील आकडेवारी मिळण्यास विलंब असल्याने एकूण आकडेवारीमध्ये आणखी २ ते ३ टक्के वाढण्याची शक्यता आहे.