वेंगुर्ला साहित्य संमेलन निमित्ताने

निसर्गसंपन्न अशा वेंगुर्ला तालुक्याला साहित्य परंपरा लाभली आहे. चि.त्र्यं.खानोलकर (आरती प्रभू), वि.स.खांडेकर, जयवंत दळवी, मंगेश पाडगांवकर हे दिग्गज साहित्यकार याच तालुक्यातले. ही साहित्य परंपरा पुढील पिढीमध्ये जागृत व्हावी, त्यांना साहित्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने आनंदयात्री वाङ्मय मंडळाने वेंगुर्ला तालुक्यात साहित्यविषयक चळवळ उभी केली आहे.

      सातेरी प्रासादिक संघाच्या जनसेवा हॉलमध्ये संघाचे तत्कालीन अध्यक्ष भास्कर परब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रा.पि.के.पाटील व कविवर्य दादा मडकईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 फेब्रुवारी 1999 रोजी आनंदयात्री वाङ्मय मंडळाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मंडळाच्या शुभारंभ प्रसंगी दादा मडकईकर यांच्या गायनाचा बहारदार कार्यक्रमही झाला. प्रसिद्ध लेखिका व वेंगुर्ला हायस्कूलच्या माजी शिक्षिका वृंदा कांबळी यांनी सातेरी प्रासादिक संघाची एक शाखा म्हणून आनंदयात्री वाङ्मय मंडळ सुरू करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. मंडळाच्या प्रारंभानंतर कांबळी मॅडम व त्यांचे माजी विद्यार्थी जे त्यावेळी महाविद्यालयात शिक्षण घेत होते, या सर्वांनी मिळून साहित्याचे छोटे छोटे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. यामध्ये दिवंगत साहित्यिकांचे स्मृतिदिन, कवी संमेलन, कथाकथन, नाट्याभिनय, प्रसिद्ध लेखक व कवी घेऊन त्यांच्या साहित्यावर विविधांगी कार्यक्रम, चर्चा, परिसंवाद, व्याख्याने आदी कार्यक्रमांना प्राधान्य दिले. मंडळाचे कल्पक उपक्रम, नेटके आयोजन यामुळे मंडळाची लोकप्रियता वाढत गेली. या लोकप्रियतेमुळे साहित्याशी संबंध नसलेले विद्यार्थी सुद्धा मंडळाशी जोडले गेले.

      मंडळाची कार्यपद्धतीही नेहमीच्या चाकोरीबाहेरील अशी आहे. मंडळात कोणतेही पद नाही. पदांची उतरंड नसल्याने कोणतेही हेवेदावे नाही. मंडळ हे एक कुटुंब आहे. कुटुंबप्रमुख या नात्याने वृंदा कांबळी या विविध कार्यक्रमाची कल्पना, रुपरेषा, कामाची विभागणी आखून देतात. त्यानुसार मंडळाची प्रत्येक व्यक्ती आपल्याला जमेल तशी जबाबदारी स्विकारतात आणि कांबळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाने ती यशस्वी पारही पाडतात. जबाबदारी वाटून दिली म्हणजे आपले काम झाले, असे न समजता कांबळी मॅडमही प्रत्येक उपक्रमात स्वतःला झोकून घेतात. गुरु-शिष्यांच्या या अथक परिश्रमाने प्रत्येक कार्यक्रम किंवा उपक्रम यादगार ठरतोच.

      मंडळाच्या कार्यक्रमांमधून तालुक्यातील नवोदितांना व्यासपिठ देण्याबरोबरच लिहिणाऱ्यांनाही प्रोत्साहन दिले जाते. ग्रामीण भागातील नवोदितांना प्रेरणा व दिशा देण्याचे कार्य मंडळाकडून केले जाते. त्यामुळे कांबळी मॅडम यांची ही साहित्याची संकल्पना ग्रामीण भागातही रुजू होत आहे. आनंदयात्रीने केवळ मोठ्या माणसांसाठीच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांसाठीही शांता शेळके यांच्या ‘झोपेचा गाव‘ या बालकाव्य संग्रहावर आधारित ‘कवितेचा गाव‘, पाऊस या विषयावर ‘आला झिम्माड पाऊस‘,  असे कवितांचे आणि काव्यवाचनाचे कार्यक्रमही घेतले. मंडळाच्या माध्यमातून ‘साने गुरुजींचा श्‍याम‘ या नावाचा कथाकथनाचा उपक्रम वृंदा कांबळी यांनी शाळांमध्ये राबविला. तसेच मंडळांतील सदस्यांना सोबत घेत कविता वाचन कसे करावे, कोणत्या कविता वाचाव्यात, त्या कवितांचा गभितार्थ काय आहे हे समजावून सांगत शालेय मुलांना कविता वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून आठवणीतील कवितांचा विद्यार्थ्यांच्या भावविश्‍वाला स्पर्श करणाऱ्या ‘चला जाऊ कवितांच्या गावा‘ सुंदर कार्यक्रम शाळांशाळांमधून सादर केले आहेत.

      दिवसेंदिवस हे मंडळ साहित्य क्षेत्रात कार्यरत होत असताना वृंदा कांबळी यांनी ‘तालुकास्तरीय साहित्य संमेलन‘ घेण्याचा मानस सर्वांसमोर बोलून दाखविला. या त्यांच्या प्रस्तावाला सर्वांनीच होकार दिला. परंतु, सदरचे संमेलन दरवर्षी घेणे खर्चाच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. त्यामुळे ‘त्रैवार्षिक साहित्य संमेलन‘ घेण्याचा ठराव करण्यात आला आणि वेंगुर्ला तालुक्याचे पहिले ‘त्रैवार्षिक साहित्य संमेलन‘ 2015 साली ज्येष्ठ, नवोदित साहित्यिकांच्या उपस्थितीत संपन्नही झाले.

      या संमेलनाला किरात ट्रस्ट, बॅ.खर्डेकर महाविद्यालय, सातेरी प्रासादिक संघ, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा वेंगुर्ला, शिक्षक वाङ्मय चर्चा मंडळ वेंगुर्ला, मराठी अध्यापक संघ वेंगुर्ला, कलावलय वेंगुर्ला, वेताळ प्रतिष्ठान तुळस, सिधुदुर्ग यांनी सहयोगी संस्था म्हणून जबाबदारी उचचली. त्यानंतर दुसरे साहित्य संमेलन 16 व 17 फेब्रुवारी 2018 रोजी संपन्न झाले. दुसऱ्या साहित्य संमेलनावेळी ‘शब्दगंध‘ ही स्मरणिकाही प्रकाशित झाली. तर 10 व 11 डिसेंबर 2022 मध्ये तिसरे साहित्य संमेलन अनेक अडचणींवर मात करीत संपन्न झाले.

      आनंदयात्री मंडळाची उद्दिष्ट्ये साहित्य विश्‍वाला धरुनच आहेत. वाचनाची आवड व साहित्याची अभिरुची निर्माण करणे,  नवोदितांना व्यासपिठ देणे, संत विचारांचा प्रसार करणे, साहित्यिकांबद्दल आदराची भावना जतन करणे, साहित्यातील सौंदर्याचा आस्वाद घेणे, मराठी साहित्यातील विचारधन वेगवेगळ्या मार्गांनी लोकांपर्यंत पोहचविणे, परिसरातील लोकांमधील सुप्त साहित्य गुणांना जागृत करणे, भाषा साहित्य संस्कृतींबद्दलचा अभिमान निर्माण करणे अशाप्रकारची अनेक उद्दिष्टे घेऊन त्यांची वाटचाल यशस्वीपणे सुरु आहे.

      माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्या अनुवादित कवितांच्या कार्यक्रमातून त्यांना या मंडळाने श्रद्धांजली वाहिली. प्रसिद्ध साहित्यिक आरती प्रभू यांच्या कोंडूरा (वेंगुर्ला-खानोली) गावातील समुद्रकिनारी त्यांच्या स्मृतिदिनी प्रभूंच्या कवितांचे, कथा व नाट्य उताराऱ्यांचे वाचन, साहित्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे कार्यक्रम घेण्यात आले. हे सर्व कार्यक्रम घेण्यासाठी गरज असते ती निधी संकलनाची. यासाठी कोणतीही निधीची योजना नसल्याने येणारा खर्च एकमेकांच्या सहकार्याने केला जातो.

      कोरोना काळात आनंदयात्री वाङ्मय मंडळ एकत्र येत कार्यक्रम घेऊ शकत नसले तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हाटस्ॲप ग्रुपवर एकत्र येत ऑडिओ, व्हिडिओद्वारे आपली लेखणी सक्रीय ठेवली. मराठी भाषा दिन, साहित्यिकांची जयंती, स्मृतीदिन साजरे करण्याबरोबरच सण-उत्सवानिमित्त वेगवेगळ्या विषयांवर तसेच एखाद्या पुस्तकाच्या परीक्षणावर चर्चा त्यामुळे लिहित्या हातांमध्ये खंड न पडता व्यक्त होण्याची संधी सोशल मिडियाच्या व्यासपिठावर सातत्याने मिळत होती.

      22 व 23 डिसेंबर 2023 रोजी नवांकुर बालसाहित्य संमेलन तुळस येथे संपन्न झाले होते. त्यावेळी मिळालेला मुलांचा, शाळांचा उदंड प्रतिसाद हा आनंदयात्री परिवारासाठी अभिमानास्पद असाच आहे. कशाला हवीत साहित्य संमेलने? कशाला हवा पैशाचा अपव्यय? असे प्रश्‍न उपस्थित करणाऱ्यांसाठी या मुलांनी त्या दोन दिवसात उत्स्फूर्त दिलेला प्रतिसाद हे त्याचं उत्तर आहे.

      स्पर्धा कशासाठी आयोजित केल्या जातात? परीक्षा कशासाठी असतात? याचे उत्तर जसं आपण त्या त्या टप्प्यातून जातो तसं तसं आपल्याला कळत जातं त्याप्रमाणेच हे गावातील साहित्य संमेलन का असतं? याची अनुभूती अनुभव घेतल्याशिवाय येणारच नाही. आपण भाग्यवान समजलं पाहिजे की आपणाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. या व्यासपीठाचा मान सन्मान आपल्याला देता तसेच घेताही आला पाहिजे. आपल्या गावातील साहित्य संमेलन हे आपणाला शिकवते.

      खरंतर काहीजण असाही सूर लावतात काय गरज आहे कांबळी मॅडम यांना हे सर्व करण्याची? ज्येष्ठ साहित्यिक म्हणून प्रकाश झोतात आहेत. छान रिटायर्ड लाईफ जगाव. कशाला हव्यात या उठाठेवी? पण कस आहे ना. प्रत्येकाची आनंद घेण्याची परिभाषा वेगळी असते. तो आनंद कसा घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्‍न असतो. आपल्या मुलांमध्ये साहित्य अभिरुची सातत्याने तेवत राहावी, ती बहरावी यासाठी आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून त्या सातत्याने उपक्रम राबवत असतात. खरतर परिपूर्ण अशी व्यक्ती कधीच आपल्याला आजूबाजूला मिळत नाही. प्रत्येकाचे काही ना काही स्वभावदोष असतातच. तरीही त्या सगळ्यांची एक मोट बांधून कांबळी मॅडम घेत असलेले परिश्रम आणि सातत्याने त्यासाठी घेत असलेले कष्ट हे कोणा येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी एक व्हिजन असावेच लागते. साहित्य हा विषय अनेकजण फक्त लेखक, कवी थोडक्यात साहित्यिकांपुरता मर्यादित आहे असे मानतात. पण याच साहित्यातील ओव्या, वासुदेव, भजन, भारुड, लावणी, पोवाडा, नाटक, कथाकथन, कवितांचे सादरीकरण आदी मनोरंजनात्मक उद्देशाने साहित्य या विषयाकडे पाहिले तर याची व्याप्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे लक्षात येईल. म्हणूनच साहित्य संमेलनामध्ये प्रत्येक व्यक्तीने सहभागी झाले पाहिजे. कथा, कविता यातील सूत्र ही आपल्या आजूबाजूच्या घटनांमधूनच आलेली असतात. म्हणजे साहित्य हे समाजमनाचा आरसा असते.

      ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे यांच्या मते कोट्यावधी रुपये खर्च करून होणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरच्या संमेलनापेक्षा तालुका पातळीवरील होणारी संमेलने नवीन लेखकांना व्यासपीठ देतात. वाचक लेखकांचा संवाद वाढवितात. जगात भेडसावणारे स्थानिक प्रश्‍न प्रकर्षाने मांडले जातात. याच धर्तीवर साहित्यिक वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने वेंगुर्ला तालुक्यात आनंदयात्री वाङ्मय मंडळ आयोजित त्रैवार्षिक अशी तीन वर्षे मराठी साहित्य संमेलने यशस्वीरित्या संपन्न झाली. यावर्षी मराठी साहित्य संमेलनाचे हे चौथे वर्ष आहे. 7 व 8 डिसेंबर रोजी वेंगुर्ल्यातील ग्रामीण भागातील लिहित्या हातांना व्यासपीठ व दिशा मिळावी, तालुक्याचा समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीतून जतन करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, साहित्य विषय उच्च अभिरुची निर्माण करून ती जतन करण्यासाठी वातावरण निर्मिती व्हावी, वाचक, रसिक, लेखक, कवी, साहित्यप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी अशा सर्वांनी एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करावी, नवोदितांना तज्ज्ञ अभ्यासकांचे मार्गदर्शन लाभावे अशा अनेक उद्देशाने वेंगुर्ला तालुका साहित्य संमेलनाचे आयोजन वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे.

      सर्वसाधारणपणे जिल्हास्तरावर संमलने होतात. ही संमेलने साहित्यिक चळवळीची मुहूर्त रोवणारी असतात. साहित्याविषयी जनजागृती वाढविणारे असतात. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वाचन संस्कृतीची पाळेमुळे बदललेली दिसत आहेत. फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर यासारखी अत्याधुनिक माध्यमे खेडापाड्यातही जाऊन पोहोचली आहेत. या माध्यमांमुळे वाचकांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. पण त्याचबरोबर व्यक्त होणारे ही कितीतरी पटीने वाढले आहेत; हा सोशल मिडियाचा एक फायदा म्हणता येईल. वाचकांची वाचनाची साधने बदलत गेली असल्याचे चित्र आज समाजात आहे.

      सामाजिक कार्यकर्ता लेखक म्हणून समोर येतो तेव्हा त्यांच्याकडून मन रिझवणारे साहित्य, कथा, कादंबरीची अपेक्षा फोल ठरते. समाजातील जळजळीत सत्य त्यांच्या लेखनातून येत असते. कारण ते त्यांनी तळागाळातील भटकंतीतून प्रत्यक्ष अनुभवलेले असते. स्त्री पुरुष संबंधांवर सीमित अशा विषयांवर आधारित साहित्य लिहिण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला नानाविध समस्या तसेच सुखद क्षण देणारे विषयही त्यामुळे प्रकाशझोतात येतात. यांचीही दखल या संमेलनामध्ये घेतली जावी ही भूमिका मराठी साहित्य संमेलने भरविताना असावी असा सर्वसामान्य निकष आहे. आजच्या चंगळवादी व एवढ्या तेवढ्या कारणांवरून नैराश्‍याच्या गर्तेत जाणाऱ्या तरुणाईला अशी साहित्य संमेलने संजीवनी ठरतील अशी आशा वाटते. तरुणाईला साहित्याकडे वळविण्यासाठी वास्तवतेचे भान आणणारी साहित्यकृती निर्माण करणे हे आजच्या साहित्यिकांसमोर तितकेच मोठे आव्हान आहे आणि हे आव्हान पेलण्यासाठी युवकांबरोबरच नवोदित लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी समाजातील सर्व स्तरावरील लोकांनी या साहित्य संमेलन चळवळीला हातभार लावला पाहिजे हे तितकेच महत्त्वाचे ठरते. आज काल्पनिक लिहिण्यापेक्षा जे वास्तव आहे ते प्रखरपणे सडेतोड भूमिका घेत मांडणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. मूलभूत प्रश्‍नांना बगल देणाऱ्या आपल्या राजकीय पुढाऱ्यांनाही आपल्या लेखणी द्वारेच त्याची जाणीव करून दिली पाहिजे. प्रतिभावंतांसमोर आज हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी बॅ. नाथ पै यांनी अशाच एका साहित्य संमेलनात सांगितल्याप्रमाणे साहित्यिकांनी केवळ हस्तीदंती मनोऱ्यात न रहाता त्यातून बाहेर पडलं पाहिजे. स्वप्नाळू दुनियेत न रमता जे सत्य आहे ते प्रखरपणे मांडत राहिले पाहिजे. त्यादृष्टीने समाजमनाचा आरसा म्हणून काम करताना समाजातील संवेदनशीलता कशी वाढीला लागेल यासाठी काम करणे आवश्‍यक आहे. वर्तमान हा इतिहास जमा होताना तो एकांगी होऊ नये, त्याचा सर्वसमावेशक असा विचार साहित्यिकांनी आपल्या लेखनातून मांडायला हवा. याची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा इतिहासाची अनेक पाने अशीच काळाच्या पडद्याआड जातील. हे होऊ नये यासाठी सजगतेने निर्भयपणे आपले मत लिहीताना लेखन कौशल्यातील स्ट्रॅटजीचा वापर करायला हवा. यासारख्या विषयांची चर्चा, परिसंवाद तालुकास्तरीय साहित्य संमेलनातून होणे ही काळाची गरज आहे.

      शासनाने महाबळेश्‍वर जवळील भिलार येथे पुस्तकांचे गाव वसविले आहे. शासन दरबारी ‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती सार्थ करण्यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न. गावातील एकजुटीमुळे हे करणे शासनाला शक्य झाले. वाचन संस्कृती टिकविणे आगामी पिढीला समाजाचा प्रगतशीर आयुष्याचा मूलमंत्र वाचन चळवळीत आहे, याची जाणीव करून देणे यासाठी गाव पातळीवर असे छोटे छोटे प्रयत्न युवकांना दिशा देणारे ठरत असतात. वेंगुर्ला तालुकास्तरीय साहित्य संमेलनाची वैशिष्ट्यपूर्ण अशी प्रथा आनंदयात्री वाङ्मय मंडळाने सुरू केली आहे. वाङ्मयीन अभिरुची वृद्धिंगत करणारी वातावरण निर्मिती या संमेलनाच्या निमित्ताने होणार आहे. या संमेलनात अभ्यासपूर्ण अशा विविध अभिनव कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. साहित्यप्रेमींची दिंडी सोबत साहित्यविषयक वचने, काव्यपंक्ती यांचे फलक हे सर्व मोठ्या संमेलनाची आठवण करून देणाऱ्या असतील. तालुक्यातील रसिकांचा उत्स्फूर्त व उत्साहपूर्ण सहभाग पहिल्या तीन साहित्य संमेलनाप्रमाणे याही वर्षी असेल यात शंका नाही. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे ग्रामीण साहित्य संमेलनाची उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखीत केली जाईल. तेव्हा येताय ना…!

 

सीमा मराठे, ९६८९९०२३६७

 

Leave a Reply

Close Menu