होडावडे गावात गरजू रुग्णासाठी आणि अत्यावश्यक सेवेसाठी बरीच वर्षे रूग्णवाहिका सेवा उपलब्ध नव्हती. बयाचवेळा रूग्णवाहिकेसाठी गावातील ग्रामस्थांना आजूबाजूच्या गावातील रुग्णवाहिकेंवर अवलंबून राहावे लागत असे. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रूग्णाला तात्काळ उपचारासाठी विलंब होऊन अनेकदा रूग्ण दगावण्याचेही प्रकार घडले आहेत. अशा अत्यावश्यक सेवेचे भान राखून गावातील होतकरू तरुण ग्रामपंचायत सदस्य अरविंद नाईक, सामाजिक कार्यकर्ते रवी केळुसकर, सतीश तांबोसकर यांनी आपल्या गावात सुद्धा आपली हक्काची रूग्णवाहिका आणण्यासाठी प्रयत्न केले. गावातील ‘शेतकरी मंडळ होडावडा‘ यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी विविध शेतीविषयक वस्तूंचा लकी ड्राॅ ठेवला. तसेच लोकसहभागातून व दानशूर व्यक्ती ग्रामस्थ यांच्या सहकार्याने रुग्णवाहिका गावात आणली. या रूग्णवाहिकेचे लोकार्पण १६ नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्रपाळेश्वर व श्री देवी सातेरीला श्रीफळ ठेवून तसेच सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते फित कापून व ज्येष्ठ नागरिक शशिकांत होडावडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जि.प.माजी सदस्य नितीन शिरोडकर, बाळा दळवी, संजय परब, अभिषेक झांटये यांच्यासह गावातील दानशूर व्यक्ती व ग्रामस्थ उपस्थित होते.