अन्यथा वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा

आकाश फिश मिल लि. केळुस कंपनीच्या बेकायदेशीर समुद्रातील पाईपलाईनचे काम न थांबवल्यास व सदर कंपनीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी समुद्रात सोडण्यास बंदी न घातल्यास स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यवसायीक यांच्या संयुक्त सहभागाने दि.१९ डिसेंबर रोजी वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढणार आहोत. तरी प्रशासनाने याची योग्य दखल घेवून त्वरीत कंपनीवर कारवाई करावी व सदर पाईपलाईनचे काम थांबवावे, अशी मागणी केळूस मच्छीमार सहकारी संस्था, ग्रामस्थ, मच्छीमार यांनी वेंगुर्ल तहसीलदार यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

      वेंगुर्ला तहसीलदार यांना, केळूस मच्छीमार सहकारी संस्था, ग्रामस्थ व मच्छीमार यांनी दिलेल्या लेखी निवेदनात, सन २०१५ ते २०१६ पासून आजमितीस केळुस पंचक्रोशी ग्रामस्थांच्यावतीने सातत्याने या कंपनीच्या गैरपक्रिया व सांडपाणी निचरा होत नसलेबाबत आजही वरिष्ठ प्रशासनाला कळवूनदेखील शासनस्तरावर कंपनीवर योग्य कारवाईबाबत दखल घेतली जात नाही. आज कंपनी ९ वर्षे सातत्याने माशांवर प्रक्रिया करताना सांडपाणी व दुर्गंधीयुक्त हवा याबाबतचे योग्य निकष पाळत नसल्याने संपूर्ण पंचक्रोशीत स्थानिकांना आरोग्याशी संबंधीत समस्येला सामोरे जावे लागत आहे. सदर परिसरातील बागायतदार, मच्छिमार, शेतकरी, पर्यटन व्यवसायिक व ग्रामस्थांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढाकाराने प्रदूषण महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदीत करुनदेखील व कंपनीवर सदर प्रकल्प बंद करण्याबाबत आदेश असताना देखील कंपनीची मनमानी आजही चालूच आहे. या कंपनीला प्रदूषण मंडळाने सांडपाणी प्रक्रियेबाबत योग्य ती विल्हेवाट लावताना जे निकष व अटी शर्थी घातलेल्या आहेत. त्याचे योग्य पालन होत नसल्याचे आम्ही वारंवार शासनाच्या लक्षात आणून दिलेले आहे.

      प्रशासनाने जुलै २०२४ पासून कंपनीच्या मासे पक्रियेवर बंदी लादली व कंपनी बंद ठेवण्यास नोटीस बजावली असता आजही आर्थिक व राजकीय वरदहस्ताने कंपनी माशांवर पक्रिया करत आहे. याबाबत प्रशासनाकडून येत्या ८ दिवसात सदर कंपनीच्या समुद्रातील पाईपलाईनचे काम न थांबवल्यास व सदर कंपनीचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी समुद्रात सोडण्यास बंदी न घातल्यास स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यवसायीक यांच्या संयुक्त सहभागाने दि.१९ डिसेंबर रोजी वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढणार आहोत, अशा आशयाचे १५२ ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन केळुस मच्छिमार सहकारी सोसायटीचे चेअरमन गोविद केळूसकर व माजी सरपंच योगेश शेटये यांनी तहसिलदार यांना सादर केले. यावेळी ग्रामस्थ महेश राऊळ, रामदास कुबल, कालिदास केरकर, महेश नागवेकर, नामदेव नागवेकर, श्रीकृष्ण ताम्हणकर, दीपक राऊळ उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu