वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ७ डिसेंबर रोजी चार फिरत्या पथकांद्वारे शहरातील स्थानिक व्यापारी, फळविक्रेते, फुलविक्रेते, मच्छविक्रेते, किराणा दुकाने, बेकरी, पानपट्टी स्टॉल अशा २६ जणांवर प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यात ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या अंदाजे ५ किलो एवढ्या वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून प्रती ५०० रूपये याप्रमाणे १२ हजार ७०० एवढी दंडात्मक रक्कम वसुल करण्यात आली.
शहरातील सर्व व्यापारी व नागरीकांनी ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी व ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या विक्री करणा-या व्यक्तींची माहिती नगरपरिषद प्रशासनास देवून सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.