केंद्रीय पर्यटनमंत्री गजेेंद्रसिंग शेखावत यांनी पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील 23 राज्यांमधील 40 प्रकल्पांना मंजुरी देत निधीची घोषणा केली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या बहुचर्चित पाणबुडी, आर्टिफिशियल रिफ अंडरवॉटर म्युझियमचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 46.91 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
महत्त्वाकांक्षी पाणबुडी प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. अमेरिका, युरोप आदी प्रगत देशांमधील प्रकल्पांचा बारकाव्याने अभ्यास करून पाणबुडी केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. पर्यटकांना यामुळे समुद्राच्या अंतरंगातील जग प्रत्यक्ष समुद्रात जाऊन पाहता येणार आहे. सर्वच वयोगटातील पर्यटकांना याचा आनंद लुटता येणार आहे. पाणबुडी प्रकल्पामुळे हा आतापर्यंत पिछाडीवर राहिलेला वेंगुर्ले तालुका पर्यटन विकासाच्या बाबतीत आघाडीवर येणार आहे. वेंगुर्ले बंदर भागात याचे केंद्र निर्माण केले जाणार आहे.
पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे बहुचर्चित आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी आर्टिफिशल रिफ अंडरवॉटर म्युझियम प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातच तोही वेंगुर्ले व मालवण दरम्यानच्या समुद्रात होणार यावर आता पुन्हा एकदा शिक्का मोर्तब झाले आहे.
माजी मंत्री दीपक भाई केसरकर यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट येत्या काही दिवसातच प्रत्यक्षात साकार होणार आहे. त्यामुळे वेंगुर्ले ते मालवण पर्यंतच्या समुद्रात पर्यटनाच्या अनेक शाखा विस्तारल्या जाणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता संपता संपताच नवीन सरकार स्थापन होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेल्या या खुशखबरीमुळे केंद्र सरकारचे सिंधुदुर्ग जिल्हावासीयांतर्फे आभार अशी प्रतिक्रिया दीपकभाई केसरकर यांचे सहकारी सचिन वालावलकर यांनी व्यक्त केली.