ए, आपण रंगीत कोंबड्याची पिल्ले मिळतात त्या पिल्लाचे केलेलं बारस आठवते का? आम्ही मुलांनी काढलेली कावळ्याची प्रेतयात्रा.. आठवतेय? आणि हो, आजोबांचे भिक्षुकीचे सामान घेऊन एक जण पुढे आला आणि त्यांच्या घरात जाऊन ते सामान ठेवलं तेव्हा घराचा दरवाजा नुसताच लोटला होता. घरात कोणीही नव्हते. अनोळखी माणूस घरात गेल्याचे लक्षात येताच आजीने बाहेरून दरवाजाला कडी घातली आणि त्यामुळं गोंधळ उडाला .. आठवते ना.. चाळीत त्यावेळी असणाऱ्या उपवर वधू आणि वरांची लग्ने कशी झाली.. त्याच्या आठवणी..
असा आठवणींचा महापुर 28 डिसेंबर रोजी जड्ये चाळ स्नेहमेळाव्यात आला होता. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. सन 2015 मध्ये जड्ये कुटुंबियांनी चाळ पाडून नवीन कॉम्प्लेक्स बांधण्याचा निर्णय घेतला आणि तेथून पुढे सन 2023 मध्ये या नवीन कॉम्प्लेक्सचे बांधकाम पूर्णही झाले. लौकिक अर्थाने चाळीच अस्तित्व संपलं. पण चाळीच्या आठवणी मात्र या चाळीत वास्तव्य करून गेलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात आहेत. या रम्य आठवणीनी प्रत्येकाच्या मनात घर केलेलं आहे. या चाळीतल्या रम्य आठवणी प्रत्येकालाच साद घालीत असतात. त्या रम्य आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलताना या चाळीतला सर्व प्रवास आठवतो आणि आपोआपच मन मोहरून जातं. या चाळीतल्या आठवणी मात्र नेहमीच जगण्याचं बळ आणि सकारात्मक ऊर्जा देतात.
या आठवणी अँड्रॉइड फोनमुळे पुन्हा एकदा जागृत झाल्या. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अनेक ग्रुप तयार झाले. त्यात आमचा जड्ये चाळ हा ग्रुप उदयाला आला. गुड मॉर्निंग, गुड नाईट सोबत अक्षरशः आठवणींचा पाऊस त्यात पडू लागला. कधीपासून सर्वजण एकत्र येऊया, भेटूया असे मेसेजवर चर्चा करत असत. पण तो योग काही जुळून येत नव्हता. आणि नोव्हेंबर महिन्यात अचानक एके दिवशी 28 डिसेंबर ही तारीख जाहीर केली गेली. आणि आपण सर्वजण भेटणार असल्याचे घोषित झाले. मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद, मुलांवरून पालकांमध्ये होणारे भांडणतंटे, रुसवे फुगवे यासाठीचे किस्से आपण सर्व आपल्या आजूबाजूला पाहतो पण अपवाद म्हणून ही जड्ये चाळ सर्वार्थाने वेगळी होती. त्याच्याच या गोड आठवणी..
व्हर्च्युअल जगातून बाहेर पडत जड्ये चाळीतल्या आठवणींचा पुन्हा जागर व्हावा यासाठी येथील रहिवासी आणि जड्ये कुटुंबियांनी या चाळीतल्या रहिवाशांचा पहिला स्नेहमेळावा 28 डिसेंबर 2024 रोजी हॉटेल अंकिता, नेरुर- कुडाळ येथे घेतला आणि या स्नेहमेळाव्याला बऱ्याच रहिवाशांनी उपस्थिती दर्शविली. मुलां नातवंडांसह, सूना जावयांसह माहेरवाशिणी उपस्थित होत्या. असा सोहळा बघायलाही भाग्य लागतं. या स्नेह मेळाव्याला आलेली रंगत आणि झालेला आठवणींचा गजर हे सर्वच विलक्षण होतं.
कुडाळमध्ये जड्ये चाळ ऐतिहासिक चाळ होती. ज्या चाळीने अविभक्त कुटुंबाचा नेहमीच सर्वांना फिल दिला. आणि सर्वांच्या मनावर अधिराज्य केलं. श्री. बाबाजी रामचंद्र जड्ये उर्फ तात्या जड्ये यांनी सन 1937 मध्ये पहिली इमारत बांधून चाळीची परंपरा सुरू केली. ते पोस्ट खात्यात मुंबईला नोकरीला होते आणि त्यानीच ह्या चाळीची बांधकामं केली. त्यांनी सन 1948 मध्ये पोस्ट ऑफिसची इमारत बांधली व तेथे पोस्ट ऑफिस झालं. आजही जड्ये यांच्याच कंपाऊंडमध्ये पोस्ट ऑफिस आहे. एकंदरीत जड्ये यांची जागा ही अतिशय मोक्याची, मध्यवत सर्व सोयींनी युक्त आणि अतिशय सात्विक व पवित्र असल्याने जड्ये चाळ एक आदर्श स्थान म्हणून येणाऱ्या भाडेकरूंच्या मनामध्ये भरत असे. या जागेत सदर श्री. बाबाजी रामचंद्र जड्ये उर्फ तात्या जड्ये यांनी विसवाटी नावाच्या देवतेची स्थापना केली व त्यापाठीमागे त्यांचा उद्देश स्थानामध्ये शुचिर्भुतता, सात्विकता, स्वच्छता व पावित्र्य कायम टिकून रहावे असा होता. जड्ये चाळीमध्ये एकंदर 75 वर्षे भाडेकरुंचे वास्तव्य होते. आता जरी चाळ नसली तरी नवीन कॉम्प्लेक्स त्याजागी बांधण्यात आले आहे. आता या सर्व मालमत्तेचं स्वामित्व आणि व्यवस्थापन कै. तात्या जड्ये यांचे नातू म्हणजेच त्यांच्या तिसऱ्या पिढीतील श्री. सुधीर जड्ये, श्री. हेमंत जड्ये यांचेकडे आहे.
जड्ये चाळ म्हणजे सुसंस्कृत लोकांचे वस्तीस्थान. ही जड्ये चाळ म्हणजे मालक, भाडेकरू असे संबंध न जोपासणारी एक अद्भूत कुटुंबव्यवस्था. चाळीतील सर्व माणसे एकमेकांशी आपल्याच कुटुंबातील एक घटक आहेत याच भावनेतून वागत. जड्ये आजींच्या आदरयुक्त धाकात सर्वजण असत. आपल्याकडील छोट्या छोट्या सणासमारंभात जड्ये आजी सर्व भाडेकरूना सामावून घेत असत. मग नवरात्र, गणपतीतील आरत्या असोत, कोजागिरी पौर्णिमा असो, दिवाळीचा फराळ, अगदी हळदी कुंकू समारंभ देखील सर्वांचा बऱ्याच वेळा एकत्रित साजरा होई. तेव्हा स्वतःच्या घरातील आईच्या साडी ऐवजी शेजारच्यांच्या कपाटातील साड्यांची नेहमी उलथापालथ बिनदिक्कत होत असे. आणि कोणाचीही त्याला हरकत नसे. त्यासाठी शेजारच्या काकूंकडून हक्काने ब्लाउज शिलाई ही एका रात्रीत घडत असे. इतके आपुलकीचं नातं या चाळीने जपलेलं होतं.
जवळजवळ पंधरा-वीस जण मुलं चाळीत होती. शाळेतून घरी आली की विस्तीर्ण तीन अंगणांचा ती पुरेपूर वापर करत असत. नुसता धिंगाणा. आरडाओरडा, विषामृत, भोज्जा, आबा दुबी, डोंगर का पाणी, चोर का पोलीस? या 15-20 जणांमध्ये एकटा चोर व्हायचा आणि बाकी सर्व पोलीस व्हायचे तरीही तो खेळ आठवडाभर संपत नसे. बैठ्या खेळांमध्ये कॅरम, अचीपची, पत्ते यासोबत घरात घर बांधणे हा उपक्रम असे. अर्थात पत्ते केवळ उन्हाळी सुट्टीतच खेळण्याची मुभा जड्ये आजींची होती. इतर वेळेला पत्ते खेळताना मुलं दिसली की पत्त्यांचा कॅट सरळ चुलीत रवाना होई. किल्ले बांधणी करताना डॉक्टरांकडे जाऊन जुन्या सलाईनच्या बाटल्या बालचमुच्या किल्ल्यांची शोभा वाढवत. रंगपंचमी तर पिचकारी सोबत निळीच्या बाटल्यांचाही पुरेपूर वापर केला जाई. अंगण सारवताना सर्व मुलं हौशेने पुढाकार घेऊन सारवत असत. त्यात एका अंगणाच्या बाजूला रिठांचे झाड होते. त्यामुळे तो मौसम सुरू झाला की पूर्णपणे फेस-युक्त सारवणे होई. त्याचाही आनंद ही सर्व मंडळी घेत असत.
या चाळीतील रहिवाशी नेहमीच एकत्र येऊन काही ना काही उपक्रम केले आहेत. त्यामध्ये कोजागिरी पौर्णिमा, होळी हे प्रमुख सण कार्यक्रम होते आणि यात चाळातील सर्व आबालवृद्ध मंडळी सहभागी होत आणि भरपूर मौजमजा करीत असत. त्यामुळे चाळीतल्या रहिवाश्यांमध्ये एकोपा होता. देव डोंगरावर एकत्रित चालत जात, तेथील कोकणी मेव्याचा आनंद लुटत. तेथे जाऊन भेळ किंवा तत्सम पदार्थ करणे हे ठरलेले. घराच्या मागेही चुलीची मांडावळ करीत कधी मातीच्या भांड्यामध्ये चहा, बटाटेवडे, असे वेगवेगळे प्रयोग मुलांचे होत असत. आंब्याच्या सीझनमध्ये कैरीचे कर्मट करण्यासाठी घरातून गुळ, मीठ, मसाला, तेल असे ठरवून वेगवेगळ्या घरातून मुलं घेऊन येत असत. आणि कोणी वडीलधारी व्यक्तीने पाहिलं तर त्यालाही आपल्या गोटात सामावून घेण्याचे कौशल्य या मुलांनी आत्मसात केले होते. चाळीमध्ये लहान मुलांबरोबर क्रिकेट, लगोरी, बॅडमिंटन सारखे खेळ खेळण्यात मोठेही सहभागी होत आणि खेळाचा आनंद लुटत.
चाळ म्हटल्यावर दरवाजा बंद संस्कृती मुळात नव्हतीच, त्यामुळे प्रत्येकाकडे येणारे पाहुणे देखील प्रत्येकाच्या घरचे व्हायचे. सहाजिकच सुखदुःख वाटली जायची. चाळीचा मनमोकळ्या गप्पा गोष्टी हा स्थायीभाव बनला होता. डॉक्टर रवी जोशी, वकील महेश कुंटे, आणि सीए केशव फाटक यांच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ याच चाळीतली. त्यामुळे त्यांच्याकडे येणारे पेशंट, पक्षकार यांची चाळीत राहणारी मुलं, ज्येष्ठ नागरिक नकळतपणे जबाबदारी घेत असत. त्यांचे निरोप, ते कधी येतील, येणार आहेत, जाणार आहेत त्याबद्दलचा तपशील त्यांना सांगितला जाई.
सुमारे 75 वर्षात ह्या चाळीत अनेक बिऱ्हाडे येऊन राहून गेली. अनेक प्रकारची, अनेक स्वभावाची बहुरंगी, बहुढंगी, बहुआयामी व्यक्तीमत्वाची माणसं इथं वास्तव्य करून गेली. इथे बिऱ्हाडाला आलेल्या अनेक माणसांनी ह्या चाळीत असताना आपआपली घरे बांधली. ही जागा भरभराट करणारी, यशाप्रत नेणारी अशी होती. या जागेने सर्वांना भरभरून दिलं.
एकूणच जड्ये चाळीचा इतिहास आणि आठवणी यांना उजाळा या स्नेहमेळाव्यात बहरल्या. अशी ही जड्ये चाळ म्हणजे खरोखरच एक अविभक्त कुटुंब होतं आणि भविष्यातही आठवणींच्या रूपाने ते सदैव राहील यात तीळमात्र ही संदेह नाही. आपले मनोगत व्यक्त करताना ॲड. कुंटे यांनी हा शेर सांगितलेला –
“आठवणींना कारण नसते, आठवणींना मरण नसते,
आणि त्या इतक्या तुडुंब भरून वाहतात की त्यांना अडविणारे धरण नसते”, असा हा शेर या स्नेह मेळाव्यात उपस्थितांनी अनुभवला.
सुप्रसिद्ध नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या गाजलेल्या वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातल्या काव्यपंक्ती प्रमाणे
बालपणीचे दिवस सुखाचे आठवती घडी घडी
आठवणींच्या आठवणींना वाहतो ही दुर्वांची जुडी
अशी भावना प्रत्येकाच्या ठायी होती. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने श्री सुधीर जड्ये यांना 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, आशीर्वाद फोटो स्टुडिओ या व्यवसायाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उपस्थित रहिवाशांनी सन्मानित केले. असा स्नेहमेळावा घेऊन आठवणींना उजाळा देण्याची साखळी अशीच पुढे राहावी यासाठी श्री. भवानीशंकर गोविंद पाध्ये यांनी पुढील स्नेहमेळावा 25 डिसेंबर 2025 रोजी आपल्या राहत्या घरी वेरळ येथे घेण्याचे घोषित केले. हा आठवणींचा स्मृतीगंध जपून ठेवताना सुधीर जड्ये यांच्या सुन आर्या श्रीराम जड्ये यांनी या काव्यपंक्ती लिहीत आभार मानले-
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने
जुन्या आठवांना मिळाला ऊजाळा
जड्ये परिवारास सदैव लाभो
आपणा साऱ्यांचा असाच जिव्हाळा
आठवणी ज्या ठेवल्यात जपूनी
आपण हृदयाच्या कोंदणात
आनंदाने सदैव राहू आम्ही
आपल्या आत्मियतेच्या ऋणात
शब्दांकन – ॲड. महेश कुंटे (9422379784)
आणि सीमा मराठे (9689902367)