8 फेब्रुवारी शनिवार जया एकादशी, हे व्रत करण शुभ मानलं जातं. या व्रतामुळे पाप शुद्ध होतात, आत्मा शुद्ध होतो आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी वारकऱ्यांची धारणा आहे. या दिवशी पंढरपुरात मोठी यात्रा भरते. जया एकादशी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. या व्रतामुळे मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो आणि विष्णूकडून आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं.
जया एकादशी निमित्ताने कलेच्या निर्मात्या निसर्गाची मदत घेत सावंतवाडी येथील ऋतिका पालकर-नाईक हिने ही सुंदर कलाकृती साकारली आहे. तिने नदीपात्रातील आणि समुद्र किनाऱ्यावरील दगडांना आपल्या ह्या कलाकृतीचं माध्यम म्हणून निवडलंय. तिने केलेली प्रत्येक कलाकृती युनिक आहे. कारण निसर्ग सुद्धा एक दगड जशास तसा पुन्हा बनवत नसेल.
हे विठ्ठल रखुमाईची कलाकृती साकारायला साधारणतः 6 महिन्यांचा कालावधी गेलाय. कारण ह्या कलाकृतीसाठी जे दगड वापरलेत ते नैसर्गिक आकारातील आहेत आणि हे दगड शोधणं हाच मोठा टास्क होता असे ऋतिका सांगते. ही कलाकृती साकारण्यासाठी 124 दगडांचा वापर करावा लागला. दगडांचा नैसर्गिक रंग अबाधित ठेवून व दगडांचा आकारही कायम ठेवून ही सुंदर कलाकृती साकारण्यात आली आहे.
विठ्ठल रखुमाई आणि विठ्ठलाच्या भजनात तल्लीन होऊन जाणारी वारकऱ्यांची दिंडी ही कलाकृती लक्ष वेधून घेते.
मूळची माणगाव येथील व विवाह पश्चात सावंतवाडी येथे स्थायिक झालेली ऋतिका पालकर-नाईक ही संपूर्ण महाराष्ट्रात उभरती स्टोन आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. निसर्गात सापडणाऱ्या म्हणजेच नदी आणि समुद्र किनारी वाहून येऊन पडलेल्या विविध आकार आणि रंगांच्या दगड गोट्यांमधून अतिशय सुंदर-सुंदर प्रकारच्या कलाकृती सादर करण्यात ऋतिका ही माहिर समजली जाते.
आतापर्यंत अशाच दगड गोट्यांच्या सहाय्याने तिने अनेक कलाकृती साकारल्या आहेत. तिच्या या कलाकृतींची प्रदर्शनेही मुंबई, दिल्लीसारख्या शहरातील मोठमोठ्या आर्ट गॅलऱ्यांमध्ये यापूव भरलेली आहेत. अनेक नामवंत कलाकारांनी तिच्या या कलाकृतींना व अनोख्या कलेला भरभरून दाद दिली आहे.