रुपाली पाटील यांना आधुनिक सावित्री पुरस्कार

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आधुनिक सावित्री पुरस्कार सिंधुदुर्गच्या साहस प्रतिष्ठानच्या संस्थापक, अध्यक्षा रुपाली पाटील यांना भारतीय जमीन बंदर प्राधिकरण दिल्लीच्या प्रशासकीय अधिकारी रेखा रायकर कुमार यांच्या हस्ते बारामती येथे वितरित करण्यात आला.

      महाराष्ट्र राज्य व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राच्यावतीने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत आधुनिक सावित्री पुरस्काराचे वितरण बारामती येथील दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी करिअर संसद राज्यस्तरीय समिती अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, दिल्लीचे भारतीय जमीन बंदर प्राधिकरण प्रशासकीय अधिकारी रेखा रायकर कुमार, यशवंत शितोळे, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकुमार महामुनी, बारामतीच्या आर्टस्‌‍, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेजच्या प्राचार्य शारदाबाई पवार उपस्थित होते.

      या कार्यक्रमादरम्यान दोन दिवसीय अधिवेशनात विविध वक्त्यांची चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध शिबिरे झाली. या अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कुडाळ व कणकवलीतून तीन कॉलेजचे विद्याथ व प्राध्यापक सहभागी झाले होते. राज्यातील 110 कॉलेज सहभागी होते. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा आणि वारसा आजच्या युगात अविरतपणे चालवून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीत भरीव कामगिरी करणाऱ्या विविध जिल्ह्यातील 17 महिलांना पुरस्कार वितरित करण्यात आले.

      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहस प्रतिष्ठान ही संस्था दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या न्याय व हक्कासाठी सेवाभावी काम करते. या प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा रुपाली पाटील यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu