वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील परूळेकर दत्त मंदिराला लागून असलेली व्हाळी मोडकळीस आल्यामुळे ती नविन बांधावी, अशी मागणी नागरिकांकडून गेली दोन ते तीन वर्षे नगरपरिषद प्रशासनाकडे होत होती. व्हाळी जीर्ण झाल्यामुळे व्हाळीमधून वाहणारे सांडपाणी झिरपून विहिरीत जात होते. परंतु, नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे याचा फटका मडकईकर कुटुंबाला बसला आहे. बाथरूमची भित कोसळल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. या घटनेची माहिती मिळताच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी भेट देत पहाणी केली आणि मुख्यधिकारी परितोष कंकाळ यांच्याशी संफ साधून बांधकाम अधिका-यांना घटनास्थळी पाठवण्याची मागणी केली. त्यानुसार बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता गणेश कांबळी व वॉटर सप्लायचे सागर चौधरी यांनी घटनास्थळी पहाणी करून संबंधित कर्मचा-यांना झालेली पडझड बाजूला करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी मडईकर कुटुंबाने केली आहे.