बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील महिला विकास कक्ष आणि जिल्हा महिला व बाल विकास विभाग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ६ मार्च रोजी विद्यार्थ्यांसाठी महिला व बाल विकास विभागातील योजनांवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी महिला व बालविकास विभाग, कुडाळ शाखेमार्फत संरक्षण अधिकारी मिलिंद कांबळे, सहाय्यक संरक्षण अधिकारी अक्षय कानविंदे, प्रा.वामन गावडे, महिला विकास कक्षाच्या चेअरमन डॉ.मनीषा मुजुमदार उपस्थित होते. महिला दिनानिमित्त आमच्या विभागातर्फे महिला दिन विशेष जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ‘ या पथनाट्याच्या माध्यमातून विभागामार्फत महिलांना देण्यात येणाया सुविधा आणि योजनांची माहिती जनमानसात देण्याचा आमचा उद्देश असल्याचे मिलिद कांबळे यांनी सांगितले. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ‘ या घोषवाक्याला अनुसरून स्त्रीभ्रूण हत्या करू नका असा संदेश देणारे पथनाट्य सादर करून, गरोदर मातेच्या सुदृढ आरोग्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या पथनाट्यात शर्मिष्ठा सामंत, अंगणवाडी सेविका नेत्रा होडावडेकर, समिक्षा येरम, प्रतिमा जाधव, चंद्रकांता पेडणेकर, गौतमी पेडणेकर, प्राची वाघे, माधुरी वाघे आणि सुप्रिया गावडे यांचा सहभाग होता. प्रा.जे.वाय. नाईक यांनी आभार मानले.