कर्नाटकात धर्म कला महोत्सवाचा जागर!

कर्नाटकात उडुपी जिल्ह्यातील डेब्री तालुक्यात गर्द वनराईतील तिंगळे या गावी धर्म-कला-साहित्य महोत्सवाचा शाही जागर दरवर्षी साजरा केला जातो. अत्यंत दिमाखात व वैभवसंपन्नतेत झालेल्या या महोत्सवातील मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले हे खास निमंत्रित होते. यावेळी चंडे, तुतारी, सनई व चौघडे या वाद्यांच्या निनादात राजेसाहेबांचे महोत्सवस्थळी केलेले शाही स्वागत अभूतपूर्व होते. साडेतीनशे वर्षांहूनही अधिक काळ एक स्वतंत्र संस्थान म्हणून आपली उज्ज्वल परंपरा व वैशिष्ट्य राखलेल्या संस्थानचे राजे म्हणून श्रीमंत खेमसावंत भोसले यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जनसमुदाय लोटला होता.

      गेल्यावर्षी ११ मे रोजी राजवाड्याच्या पटांगणात राजघराण्यातील सन्माननीय व्यक्तींच्या उपस्थितीत रंगलेला ‘यक्षगान‘चा खेळ सावंतवाडीतील रसिकांनी पाहिला होता. उडुपीच्या कानडी कलाकारांनी मराठी संवाद आणि गीतांसह सादर केलेला ‘यक्षगान‘चा खेळ यादगार ठरला होता. त्यावेळी श्रीमंत राजेसाहेबांनी त्या खेळाचा घेतलेला आनंद व त्यासाठी घेतलेली मेहनत त्या यक्षगान मंडळींचे कर्नाटकातील प्रमुख गुरू संजीव सुवर्णा यांनी पाहिली होती. तसेच गेली तीन वर्षे राजवाड्याच्या परिसरात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैशिष्ट्य व वैभव असलेला दशावतार कलेचा महोत्सव ते राबवत असल्याची माहिती गुरू संजीव सुवर्णा यांना होती. असे कला व साहित्याला प्रोत्साहन देणारे, गुणीजनांचा गौरव करणारे व्यक्तिमत्व म्हणून कर्नाटकातील ही मंडळी राजेसाहेबांना ओळखत होती. त्यामुळेच उडुपी जवळच्या या गावातील सुप्रसिद्ध धर्म-कला-साहित्य महोत्सवाचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी विक्रमार्जुन हेग्गडे व त्यांच्या सहका­यांनी सावंतवाडीत राजवाड्यात येऊन राजेसाहेबांना खास आमंत्रित केले होते. या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन तिंगळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रमार्जुन डेग्गडे आणि त्यांच्या सहका­यांनी शाही परंपरेला साजेल असे केले होते.

    या महोत्सवात वैवाराधना, यक्षगानाचे सादरीकरण तसेच साहित्यिक चर्चा करण्यात आली. या महोत्सवातून दोन भिन्न प्रदेश, भिन्न भाषा, सगळीच नसली तरी काहीशी भिन्न संस्कृती असूनदेखील महाराष्ट्र-कर्नाटकातील माणसे अधिक जोडली जाऊन सौदार्याचे वातावरण अधिक दृढ झाले, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. खेमसावंत भोसले यांनी अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र-कर्नाटक अनुबंधाविषयी विस्तृत विवेचन केले. यापुढेही महाराष्ट्र-कर्नाटक संबंध अधिक दृढ होऊन ही परंपरा सुरू राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  उडुपी जवळील कार्कळ येथील एक अभ्यासक श्रीकांत शेट्टी यांनी सावंतवाडी संस्थानचा इतिहास विषद केला. यातून कर्नाटकाच्या उडुपी मंगळुरू या भागात सावंतवाडी आणि परिसरातील लोकांचा परिचय उपस्थित जनसमुदायाला झाला.

    दरम्यान, या महोत्सवाला चौसष्ट वर्षांची गौरवशाली परंपरा असून सुपसिद्ध साहित्यिक कलावंत डॉ. कोटा शिवराम कारंच, म्हैसूरचे महाराज अशा अनेक मान्यवरांनी या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविले आहे. यात आता सावंतवाडी संस्थानचाही आवर्जून उल्लेख केला जाईल. या समारंभाला गौरव अतिथी म्हणून सावंतवाडीचे निवृत्त प्रा.विजय फातर्पेकर तर विशेष अतिथी म्हणून अॅड. शामराव सावंत यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी प्रा.फातर्पेकर यांनी भाषा-कला आणि साहित्याच्या माध्यमातून महाराष्ट्र-कर्नाटकमधील अनुबंध कसा घट्ट होत जातो, याविषयी विवेचन करतानाच सिंधुदुर्गातील स्वतंत्र, प्राचीन व स्वतःचे वेगळे अस्तित्व असलेल्या दशावतार या कलेविषयी माहिती दिली. तसेच २००६ साली उडुपी येथे डॉ. कारंथ यांच्या जन्मदिनी आमचा मराठी दशावतार केला होता, असे नमूद केले. त्यावेळी उडुपीच्या रसिक प्रेक्षकांनी या दशावतार प्रयोगास कसा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

Leave a Reply

Close Menu