निसर्गाच्या सानिध्यात उलगडे आरती प्रभूंच्या साहित्यातील गूढ

वायंगणी येथे आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे आरती प्रभू स्मृतिदिन साजरा

गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे,

माझ्या पास आता कळ्या

आणि थोडी ओली पाने,

आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला,

होते कळ्यांचे निर्माल्य

आणि पानांचा पाचोळा…!

         चिंतामणी त्र्यंबक खानोलकर अर्थात आरती प्रभू यांची कविता म्हणजे मानवी भावनांची एक गहिरी उन्वेषणयात्रा आहे. त्यांच्या कवितेत वेदना, प्रेम, एकाकीपण, जीवनाचे गुढ अशा भावना अत्यंत सच्च्या आणि संवेदनशील पद्धतीने व्यक्त झालेल्या दिसतात. त्यांच्या कवितांमध्ये प्रेमाची उत्कटता असली तरी त्यातही एक प्रकारची अंतर्मुखता आणि सौम्यताही प्रकर्षाने जाणवते. आरती प्रभूंच्या कविता-कादंबरीतील गुढ आणि त्यांच्ाा एकूणच संघर्षमय जीवनप्रवास उलगडणारा ‌‘नक्षत्राचे देणे‌’ हा कार्यक्रम वायंगणी येथे उत्तरोत्तर अधिकच बहरत गेला.

      तेंडोली-बागलाचीराई येथे जन्माला आलेले आणि वेंगुर्ल्याच्या वायंगणी, कोंडुरा, खवणे समुद्र किनारपट्ट्यांवर सतत भ्रमंती करून साहित्य निर्मितीत गढून गेलेल्या या मनस्वी साहित्यिकाचा स्मृतीदिन वेंगुर्ल्यातील आनंदयात्री वाङ्मय मंडळाने वायंगणी समुद्रकिनारपट्टीनजीक निसर्गाच्या सानिध्यात नक्षत्राचे देणे कार्यक्रमाद्वारे यादगार केला. वायंगणीतील आनंदयात्रीचे सदस्य वासुदेव पेडणेकर यांच्या घराच्या अंगणात अस्सल मालवणी मंडपात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सुमारे 50 हून अधिक साहित्यप्रेमींनी उपस्थिती दर्शवून आरती प्रभूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

लोळ आला अन्‌‍‍ विजेचा रान सारे पेटले,

भूत जन्मापूवचे त्या तेथ त्याला भेटले,

वादळापूवच झाला तो निनावी एकला,

दाटलेल्या अंतरीचा सूर झाला मोकळा!

       अनेकदा माणूस जीवनातील सर्व दुःख संकटे, संघर्ष स्वतःशीच लढत असतो. तो न राहता, न बोलता, न तक्रार करता फक्त आतून जळत असतो आणि तरीही पुढे चालत राहतो. मनामध्ये असंख्य प्रश्नचिन्हांचे काहूर चालू असताना पुढे चालणे तसे धाडसाचेच. आरती प्रभू मराठी साहित्यक्षेत्रातील अग्रणी नाव असले तरी त्यांचा एकूणच जीवनप्रवास अत्यंत खडतर होता. अगदी लहान वयातच कुटुंबांचा चरितार्थ चालविण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर पेलली होती. चरितार्थासाठी सातत्याने स्थलांतर आणि विद्रोहाकडे झुकणारे त्यांचे साहित्य यामुळे ते सातत्याने अस्थिर राहिले. आपले जगणे, आपले विचार आणि आपल्या तत्वांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. त्यामुळेच मराठी साहित्याच्या संवेदनशील आणि तल्लख वाटचालीचा एक अत्यंत मौलवान दागिना म्हणून आरती प्रभूंचे नाव घेता येते. त्यांच्या साहित्यातून वाचकाला स्वतःशी संवाद साधण्याची संधी मिळते आणि हीच खरी ताकद त्यांच्या साहित्याची आहे.

      समईच्या शुभ्रकळा, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, ती येते आणिक जाते, मी म्हणावे सांजतारा, दिवे लागण, नक्षत्राचे देणे या त्यांच्या अतिशय प्रतिभासंपन्न कवितांचे या कार्यक्रमात सादरीकरण झाले. सुधाकर ठाकुर, नंदकिशोर परब, अजित परब, पांडुरंग कौलापुरे, श्यामल मांजरेकर, प्रीतम ओगले, विशाखा वेंगुर्लेकर यांनी त्यांच्या विविध साहित्याला स्पर्श करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरही प्रकाश टाकला.

तुझे गीत गातो तुझे गीत गातो,

जिथे शब्द थकती तिथे सूर येतो,

तुझ्या नादामथली अशी गुंज लोभस.

      प्रेम, भक्ती आणि समर्पणाचे गहिरं भावविश्व उलगडणारे मौन शब्दांच्या रुपाने कवितेतून व्यक्त होते तेव्हा त्यातील क्षणभंगुरता वाचकाला अंतर्मुख करून सोडते. आरती प्रभूंचे साहित्य अतिशय सहज प्रवाही आणि नजाकतीने भारलेले आहे. त्यांच्या कवितेत संगितातील लय आपसुकच गवतसे. शब्दांची नाजूक मांडणी आणि अर्थवाही प्रतिकांचा वापर ही त्यांच्या साहित्याची बलस्थाने आहेत. त्यांच्या कविता-कादंबरीमध्ये निसर्गचित्रणही सुक्ष्म आणि प्रवाही आहे. त्यामुळे कोकणच्या लाल मातीत जन्माला येऊन मराठी साहित्य जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या आरती प्रभूंचे योगादान पुढील अनेक वर्षे अबाधितच राहणार आहे, अशा भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त झाल्या.

      असंख्य नररत्नांनी जन्म घेतला व या भूमीला खऱ्याअर्थाने पावन केले. प्रतिभावंत साहित्यिकांची मंदियाळी तळकोकणात आहे. त्यामुळे कोकणाचा मनस्वी निसर्ग, तांबड्या मातीचा रंग आणि येथील स्वच्छ वातावरणाच्या गंधाचा स्पर्श मराठी साहित्याला झाला आहे. या साहित्यिकांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मराठी साहित्य विश्वात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या थोर व्यक्तिमत्त्वांची महती अबाधित रहावी यासाठी साहित्यिकांचा स्मृतीदिन त्यांच्या जन्मगावी साजरा करावा असा उपक्रम आनंदयात्रीने सुरू केला आहे. याच मालिकेतील हा कार्यक्रम तप्त वैशाखातही मनाला गारवा देणारा ठरला, असे प्रतिपादन यावेळी अध्यक्षीय मनोगतात वृंदा कांबळी यांनी केले.

      आनंदयात्री मंडळाच्या अध्यक्ष वृंदा कांबळी, अजित राऊळ, पेडणेकर गुरुजी, अवधूत नाईक, वासुदेव पेडणेकर, विशाखा वेंगुर्लेकर, महेंद्र मातोंडकर, प्रीतम ओगले, विनयश्री पेडणेकर, पांडुरंग कौलापुरे, कुडाळ येथील योगीश कुलकण, प्रसाद खानोलकर, वास्को येथील शलती काळे, पाट येथील सॅम्युअल काळे, सोमा गावडे, नंदकिशोर परब, पी. के. कुबल, आणि कत्री डॉ. सुधाकर ठाकुर आदींनी आरती प्रभू यांच्या साहित्याचे रसग्रहण करताना त्यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलू उलगडून दाखविले. पेडणेकर गुरुजींनी भैरवी गाऊन या कार्यक्रमाची सांगता केली. निवेदन महेंद्र मातोंडकर यांनी केले तर आभार पांडुरंग कौलापुरे यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu