‘आयएनएस गुलदार’ या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेत पाण्याखालील संग्रहालय आणि या जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळ हा प्रकल्प होणार असून याचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी 10 जून रोजी करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे, मुख्य सचिव सुजाता सैनिक आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
भारतातील या पहिल्याच उपक्रमामुळे सागरी संवर्धन होऊन पर्यटनाला चालना मिळणार आहे. समुद्रात विराजमान होणाऱ्या जहाजाभोवती प्रवाळ निर्मिती करून त्याद्वारे ‘स्कुबा डायव्हिंग’ व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटन करता येणे शक्य होणार आहे. केंद्र शासनाने ऐतिहासिक पाऊल उचलत भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज ‘आयएनएस गुलदार’ हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केले आहे. जगातील अनेक देशात असे प्रकल्प तयार केले आहेत. हा प्रकल्प तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या मान्यतेने भारतीय नौदलाने निवृत युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास विना मोबदला उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.माणिक दिवे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर सहभागी झाले.
या जहाजाचे 1,120 टन वजन आहे. जहाजाची लांबी 83.9 मीटर, रुंदी 9.7 मीटर व खोली 5.2 मीटर इतकी आहे. हे जहाज 12 जानेवारी 2024 रोजी सेवानिवृत्त झाले आहे.
केंद्र शासनाच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांचा विकास करणे’ या योजनेखाली स्पेशल असिस्टंट्स टू स्टेटस फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट (भाग 3) अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची आयएनएस गुलदार सेवानिवृत्त युद्धनौका निवती रॉकजवळ समुद्रात संग्रहालय आणि कृत्रिम रीफमध्ये रूपांतरित करणे या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 27 डिसेंबर 2024 रोजी रु. 46.91 कोटींस मान्यता दिली आहे. भारतीय नौदलाने सदरचे निवृत्त जहाज पोर्टब्लेअर, अंदमान येथून कारवार नेव्हल बेस, कर्नाटक याठिकाणी स्वखर्चाने पोहोच करण्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची विनंती मान्य केली, ज्यामुळे राज्य शासनाची आर्थिक बचत झाली आहे.
महाराष्ट सागरी मंडळाच्या विजयदुर्ग येथील जेटीला विना मोबदला साधारणपणे सहा ते सात महिने हे जहाज सुरक्षितरित्या ठेवण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे. जहाजाची पर्यावरणीय साफसफाई करण्याकरिता नियुक्त केलेल्या संस्थेने या जहाजाची 15 एप्रिल 2025 रोजी पूर्णपणे पर्यावरणीयदृष्ट्या साफसफाई केली आहे. आयएनएस गुलदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्राच्या तळाशी निवती रॉक येथे विराजमान करण्याकरिता माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांना 16 एप्रिल2025 रोजी कार्यादेश देण्यात आला आहे. वातावरण अनुकूल असेल त्यादिवशी प्रत्यक्षपणे ही कार्यवाही पार पाडली जाणार आहे. समुद्रात विराजमान होणाऱ्या जहाजाभोवती प्रवाळनिर्मिती करुन त्याद्वारे स्कुबा डायव्हिंग उपक्रम व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटकांना या प्रवाळाची व समुद्रतळाशी विराजमान जहाजाची सफर करण्याचे नियोजित आहे.