विद्युत महावितरणच्यावतीने पावसाळ्यापूव करायची 33 कामे सुचवण्यात आली होती. परंतु, त्यातील 3 कामे सुद्धा वेंगुर्ला तालुक्यात न झाल्याने नागरिकांना वारंवार विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच वीज बिल एजन्सीबद्दल बऱ्याच वीज ग्राहकांच्या तक्रारी आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटना यांच्यावतीने मंगळवारी वीज वितरण कंपनीच्या वेंगुर्ला कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी वीज वितरण कंपनीचे कुडाळ सहाय्यक अभियंता गुरूदास भुजबळ यांच्याशी विविध समस्यांवर चर्चा केली.
यावेळी तालुका वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे, जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते बाळा दळवी, जयराम वायंगणकर, सौरभ कुबल, अशोक गवंडे, पल्लवी गावडे, दीपाली पेडणेकर, आशु फर्नांडिस आदी उपस्थित होते.
झाडी तोडणे, खराब साहित्य बदलणे, पोल बदलणे अशी कामे मार्चनंतर व्हायला हवी होती ती झालीच नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 80 कोटीची तरतूद हे सर्व करण्यासाठी होणे गरजेचे होते. मात्र असे न झाल्यामुळे ही सर्व कामे रखडली. त्यामुळे हे पैसे शासनाने तातडीने त्यांना द्यावेत जेणेकरून चतुथपूव ही सर्व कामे पूर्ण होतील व विद्युत पुरवठा सुरळीत सुरू होईल असे संजय गावडे म्हणाले. बिलिंग एजन्सीची माणसे कार्यालयात बसून लोकांची रिडींग उपलब्ध नाहीत असा शेरा मारतात. ज्याचे प्रत्यक्षात 40 युनिट वापर आहे त्याला 150 ते 200 युनिट काढून देतात. बिलांच्या वसुलीवर एजन्सीचे कमिशन ठरलेले असते. यामुळे महावितरण व महाराष्ट्र सरकार हे विज ग्राहकांची लूट करतात असा आरोप नंदन वेंगुर्लेकर यांनी केला.
संपूर्ण महाराष्ट्रात विद्युत तारांवर आलेली झाडे कटिंगचा दर प्रति किमी 900 रु. एवढा आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे हा दर सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागू करून चालणार नाही. या जिल्ह्यात किलो मीटरला भरपूर झाडे आहेत. बाकी ठिकाणी तशी परिस्थिती नाही. यावर मार्ग निघणे गरजेचे असल्याचे महावितरण विभागाचे कुडाळ सहाय्यक अभियंता श्री.भुजबळ म्हणाले.